शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 01:47 IST2025-05-16T01:44:26+5:302025-05-16T01:47:49+5:30

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ-लाभदायी आणि पुण्य-फलदायी मानले गेले आहे.

vaishakh sankashti chaturthi may 2025 on friday perform lakshmi puja with ganpati and get prosperity happiness and prestige | शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा

शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा

Vaishakh Sankashti Chaturthi May 2025: मराठी नववर्षातील दुसरी संकष्ट चतुर्थी साजरी होत आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. काही मान्यतांनुसार, वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थी एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या व्रतात गणपतीच्या एकदंत स्वरुपाचे पूजन केले जाते. शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी वैशाख महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले जाणार आहे. 

लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. धन, संपत्ती, पैसा म्हणजे लक्ष्मी होय. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी. धनसंपत्ती मिळविणे हाच बहुतेकांचा उद्देश असतो. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येऊ शकते. परंतु लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही, असे म्हटले जाते. तर, भगवान गणेश बुद्धी देतात. तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे. एखाद्या व्यक्तीकडे निःसंशयपणे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही. यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते. म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. एकीकडे श्रीगणेश बुद्धी देतात, तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव देते, असे मानले जाते. गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले आहे.

शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला गणेशासह करावे लक्ष्मी देवीचे पूजन

आपापल्या कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन करावे. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेश पूजनासह लक्ष्मी देवीचीही पूजा करावी. पंचोपचार किंवा षोडषोपचार पद्धतीने पूजन करता येऊ शकते. संकष्टीला अनेक घरांत गणपती बाप्पावर अभिषेक केला जातो. यावेळी गणपती अथर्वशीर्षाची पारायणे केली जातात. यासोबतच शक्य असेल, तर लक्ष्मी देवीचे श्रीसूक्त स्तोत्र म्हणता येऊ शकेल. श्रीसूक्त पठण शक्य नसेल, तर लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्र, श्लोक आवर्जून म्हणावेत.  लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुले अर्पण करावीत. तसेच लक्ष्मी देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीसह लक्ष्मी देवीची आरती करावी. संकष्टीच्या दिवशी ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप केला जातो. यासह लक्ष्मी देवीच्या प्रभावी मंत्रांचा जप अवश्य करावा, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती करावा. मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा.

तिन्हीसांजेला आणि चंद्रोदय झाल्यावर काय करावे?

तिन्हीसांजेला दिवेलागणीची वेळ झाली की, लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशीसमोर दिवा लावावा. लक्ष्मी देवीचे मनोभावे नामस्मरण, जप करावा. एखादा गोड पदार्थ लक्ष्मी देवीला अर्पण करावा. यानंतर चंद्रोदयाची वाट पाहावी. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: vaishakh sankashti chaturthi may 2025 on friday perform lakshmi puja with ganpati and get prosperity happiness and prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.