Utpanna Ekadashi 2022: गत जन्मातील पापे नष्ट करणारी एकादशी अशी उत्पत्ती एकादशीची ओळख; वाचा कथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 07:00 IST2022-11-19T07:00:00+5:302022-11-19T07:00:01+5:30
Utpanna Ekadashi 2022: रविवारी २० नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, या एकादशीचे महत्त्व आणि तिची पौराणिक पार्श्वभूमी जाणून घेऊ.

Utpanna Ekadashi 2022: गत जन्मातील पापे नष्ट करणारी एकादशी अशी उत्पत्ती एकादशीची ओळख; वाचा कथा!
सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरु करू शकतात. या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असेही म्हणतात. जाणून घेऊ एकादशीचे महत्त्व आणि कथा.
पौराणिक कथा :
सत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याच्या मुलाचे नाव मुर होते. पराक्रमी आणि बलवान राक्षस मुरने इंद्र, वरुण, यम, अग्नि, वायू, ईश, चंद्रमा, नैरुत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता. आपले दु:ख घेऊन सर्वजण कैलाशपती शिवाच्या आश्रयाला पोहोचले आणि सर्व हकीकत सांगितली. या समस्येच्या निराकरणासाठी देवांचा देव महादेवाने देवांना जगाचा रक्षक, दुःखाचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्याकडे जाण्यास सांगितले.
मुर-हरी यांच्यातील युद्ध दहा हजार वर्षे चालले
मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता, सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भोलेनाथांच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री हरी विष्णू यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी आपले दुःख इंद्राला तपशीलवार सांगितले. देवतांना वाचवण्याचे वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले. येथे मुर सैन्यासह देवांशी लढत होते. विष्णूना पाहताच त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. असे म्हणतात की मुर-श्री हरी यांच्यातील हे युद्ध 10 हजार वर्षे चालले, विष्णूंच्या बाणाने मुरचे शरीर छिन्नभिन्न झाले परंतु वराचा पराभव झाला नाही.
उत्पन्ना देवीचा जन्म :
भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. भगवान विष्णूच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली तेव्हा तो श्रीहरीवर हल्ला करणार होता.त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला. भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की, तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे, म्हणून आजपासून तुझे नाव उत्पन्ना एकादशी असे होईल.तिच्यामुळे राक्षसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला. म्हणून ही एकादशी पापक्षालन करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली.
एकादशीचे व्रत :
या एकादशीला दोन्ही वेळेस उपास करावा. शक्यतो फलाहार करावा. दैनंदिन काम करावे. मुखाने 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्रोच्चार करावा. विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, देवदर्शन झाले की एकादशीचा उपास सोडावा.