आज माघ मासारंभ; पाहिल्याच दिवशी बाप्पाला स्मरून करा 'हे' व्रत; मुलांचा होईल उत्कर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:00 IST2025-01-30T07:00:00+5:302025-01-30T07:00:01+5:30

माघ मास सुरू होताच माघी गणेश जयंतीचे वेध लागतात, मात्र खरी उपासना सुरू होते ती पहिल्या दिवसापासून; कशी ते पहा!

Today is the beginning of the month of Magh; on the first day, remember Bappa and observe this fast; your children will prosper! | आज माघ मासारंभ; पाहिल्याच दिवशी बाप्पाला स्मरून करा 'हे' व्रत; मुलांचा होईल उत्कर्ष!

आज माघ मासारंभ; पाहिल्याच दिवशी बाप्पाला स्मरून करा 'हे' व्रत; मुलांचा होईल उत्कर्ष!

माघ मासात मुख्यत्वे साजरा केला जाणारा उत्सव असतो, तो म्हणजे गणेशजन्माचा. गणपती, ही बुद्धीची देवता. तिच्याकडे ऐश्वर्य, आरोग्य, संपत्ती मागण्याऐवजी चांगल्या बुद्धीचे दान मागावे आणि त्याच्या आशीर्वादाने विद्यार्जन करावे, या हेतूने माघ मासाच्या पहिल्या दिवशी अर्थात माघ शुद्ध प्रतिपदेला विद्यावाप्ति व्रत केले जाते. 

विद्यावाप्ति व्रताचा विधी : 
माघ महिन्याच्या प्रारंभापासून म्हणजे प्रतिपदेपासून या व्रताचा आरंभ करावा. पूर्ण महिन्याभराचे हे व्रत आहे. व्रतकर्त्याने प्रतिपदेपासून तीन दिवस उपास करावा. रोज तीळ अर्पण करून हयग्रीवाची पूजा करावी. हयग्रीव ही देखील बुद्धीची देवता मानली जाते. मधू कैटभ नावाच्या राक्षसांनी ब्रह्मदेवांकडून वेद पळवले होते. ते परत मिळवण्यासाठी भगवान विष्णूंनी घोड्याचे शीर आणि मनुष्य देह असे हयग्रीव रूप धारण केले होते. हा अवतार दशावतारापैकी एक मानला जातो. तसेच त्यांनी वेदाचे रक्षण केले म्हणून बुद्धीदाता म्हणून त्यांचे पूजन केले जाते. त्यानुसार तीळ अर्पण करून हयग्रीवाची पूजा करावी आणि तिळाचा होम करावा असे सांगितले जाते. विद्वत्ताप्राप्तीसाठी या व्रताचे आयोजन केले असावे. 

आजच्या काळात या व्रताचे महत्त्व :
सद्यस्थिती पाहता, विद्यार्जनाची ओढ कमी होत चालली आहे. अर्थार्जनास आवश्यक तेवढ ज्ञान गाठीशी असले की निभावून नेता येते, हे कळल्यावर कष्टसाध्य ज्ञानप्राप्ती आणि त्याअनुषंगाने येणारी व्रत वैकल्ये करणारे लोक फार कमी बघायला मिळतात. सगळे ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध असल्यामुळे आपण काही शिकावे, अशी इच्छा निर्माण न होता, इंटरनेटवर अवलंबून राहणे पसंत केले जाते. परंतु, कितीही झाले, तरी अजूनही नेटवरील उपलब्ध माहितीच्या तुलनेत पुस्तकांना प्राधान्य दिले जाते. त्यातील माहिती विश्वासार्ह समजली जाते. ऑडिओ बुक्स श्रवणीय असूनही ते ऐकताना पुस्तक वाचल्याचे समाधान मिळत नाही, असे मत वाचक व्यक्त करतात. याचाच अर्थ ज्ञानार्जनाला शॉर्ट कट नाही. त्यासाठी खडतर परिश्रमाची शारीरिक, मानसिक तयारी असायला हवी. जो हे परिश्रम घेतो, तो आजन्म मानसन्मानाचा धनी होतो. म्हणून विद्यार्थीदशेत असताना मुलांना सक्तीने अभ्यास करायला सांगितला जातो. 

लक्ष्मी जेवढी चंचल समजली जाते, तेवढीच सरस्वती स्थिर राहते. याची प्रचीती आपण सर्वच घेत असतो. विद्या, ज्ञान हे दिल्याने कमी होत नाही, उलट ते वाढते असे आपण मानतो. विद्वानाला सर्वकाल सर्वत्र मानाने, सन्मानाने वागवले जाते. आजच्या काळात `राईट मॅन राईट जॉब' चा अभाव दिसून आला, तरी प्रसंगी राईट मॅन शोधून त्याच्यावर राईट जॉब सोपवला जातो. अर्थात कुशलतेची, बुद्धीची, कलाकुसरीची कामे करण्यासाठी गाढा अभ्यासकच लागतो. तो मान सारस्वतांकडे आपणहून येतो. त्यासाठी संधीची वाट न पाहता आपली शस्त्रे निपजून तयार ठेवली पाहिजेत. तरच संधीचे सोने करता येऊ शकेल.

यासाठी एकवेळ व्रत विधी केले नाहीत, तरी चालेल; परंतु बाप्पाला साक्षी ठेवून आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित सर्वोच्च स्थान, सर्वोच्च ज्ञान आणि सर्वोच्च मान मिळवण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी कष्टाची तयारी दर्शवली पाहिजे. हेच विद्यावाप्ति व्रताचे सार आहे.

Web Title: Today is the beginning of the month of Magh; on the first day, remember Bappa and observe this fast; your children will prosper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.