Think Positive: आयुष्यात येणारे अपयश कसे पचवावे? गौर गोपाल दास सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 07:05 IST2025-04-23T07:00:00+5:302025-04-23T07:05:01+5:30

Think Positive: यश हवे असे प्रत्येकाला वाटते, पण त्याच वाटेवर येणार्‍या अपयशाला कसे सामोरे जायचे त्याचा कानमंत्र जाणून घ्या!

Think Positive: How to digest failures in life? Gaur Gopal Das tells... | Think Positive: आयुष्यात येणारे अपयश कसे पचवावे? गौर गोपाल दास सांगतात...

Think Positive: आयुष्यात येणारे अपयश कसे पचवावे? गौर गोपाल दास सांगतात...

सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडत आहेत, हा विचार करण्यात आयुष्याचा बराच वेळ वाया जातो. त्यापेक्षा, माझ्याशी घडत असलेल्या गोष्टींना मी कसा प्रतिसाद देऊ, हा विचार केला, तर अडचणी, संधी बनून समोर येतील...सांगत आहेत, योगी गौर गोपाल दास.

आपल्या सर्वांनाच प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते. काही जण तर पूर्ण ऐकून न घेताच प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. परंतु, हीच सवय अंगवळणी पडते आणि कोणत्याही गोष्टीचे आकलन होण्याआधीच त्यावर मत नोंदवले जाते. मात्र, ही बाब अत्यंत बेजाबदारपणाची आहे. परिस्थिती लक्षात न घेता त्यावर भाष्य करणे चुकीचे ठरते. 

एखादी गोष्ट पटत नसेल, तर क्षणभर थांबा, विचार करा. लक्ष परावर्तित करा, पण त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. त्यामुळे आपल्यालाच आपल्या विचारांवर विचार करण्याची संधी मिळते. बोलून झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. बोलून झाल्यावर, कृती घडून गेल्यावर सारवासारव करण्यात अर्थ नसतो. म्हणतात ना, बूँद से गयी, वह हौद से नही आती!

यशस्वी लोकांचे चरित्र वाचल्यावर लक्षात येईल, की ते प्रतिक्रिया देत नाहीत, तर प्रतिसाद देतात. या दोन्ही शब्दांत नेमका फरक काय, असे विचाराल तर एक उदा. पहा-

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर खेळत असताना लक्षावधी लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळून असतात. त्याक्षणी तो तटस्थ असतो. मन शांत ठेवतो. समोरून येणारा बॉल कसा असेल, हे त्याच्या हातात नसते, परंतु येणाऱ्या बॉलला कसा टोलवला, म्हणजे षटकार घेता येईल, याचे समीकरण त्याच्या मनात सुरू असते. त्या क्षणभरात त्याने घेतलेला निर्णय त्याला क्रिकेटचा देव बनवतो. कोट्यावधी लोकांकडून लोकप्रियता मिळवून देतो आणि मास्टर ब्लास्टर अशी उपाधी मिळवून देतो. हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. तर यामध्ये त्या असंख्य क्षणांची मेहनत आहे, जी त्याला प्रतिक्रियेकडून प्रतिसादाकडे घेऊन गेली. यासाठी आपला वैचारिक, आध्यात्मिक आणि मानसिक पाया पक्का असावा लागतो. 

आयुष्यात आपल्या मनाविरूद्ध असंख्य गोष्टी घडतात. त्या आपल्या नियंत्रणातही नसतात. त्याबद्दल त्रागा करून न घेता आपल्या नियंत्रणात काय आहे, त्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. शांत डोक्याने कृती केली पाहिजे. शांत चित्ताने विचार मांडले पाहिजे. या गोष्टींचा सराव आपल्याला प्रतिक्रिया टाळून प्रतिसाद द्यायला शिकवतो. ही सवय जडली, की आपण शांत राहतो आणि आपल्या सभोवतालचे वातावरण शांतपणे हाताळायला शिकतो. अशावेळी शांत कसे राहायचे, असे विचाराल, तर त्यावर उत्तर पुन्हा तेच... प्रतिक्रिया टाळा!

म्हणून आपल्या वाट्याला जे वाढून ठेवले आहे, त्या गोष्टींचा मनापासून स्वीकार करा. संकटातून संधी निर्माण करा. या सवयीमुळे संकटकाळातही तुम्ही न डगमगता धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना करू शकाल आणि सचिनप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात नक्कीच यशस्वी व्हाल.

Web Title: Think Positive: How to digest failures in life? Gaur Gopal Das tells...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.