सुखाच्या अवास्तव कल्पना मानसिक आजारांचे मूळ आहे; त्यावर उपाय वाचा आणि अंमलात आणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 08:00 IST2022-03-04T08:00:00+5:302022-03-04T08:00:02+5:30
आजचे युग तणावयुग झाले आह़े जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे, म्हणजे विचार करा!

सुखाच्या अवास्तव कल्पना मानसिक आजारांचे मूळ आहे; त्यावर उपाय वाचा आणि अंमलात आणा!
अवास्तव अपेक्षा आणि भरमसाठ महत्त्वाकांक्षा मनुष्याला असमाधानी बनवतात. हेच कारण अनेक प्रकारच्या व्याधींना आणि मानसिक अस्वस्थतेला खतपाणी घालते. महत्त्वाकांक्षा आणि इच्छा यांचा त्याग केला, तर चिंता आपोआप मिटेल. परंतु या दोन्ही गोष्टी इतक्या सहज शक्य नाहीत. म्हणून त्यांचा त्याग नाही, पण त्या आटोक्यात नक्कीच ठेवता येतील.
सुख वेगळे आणि सुविधा वेगळ्या! आपण दोन्ही शब्द एकत्र जोडतो. परंतु त्या दोहोंमधील फरक लक्षात घेतला पाहिजे. धनप्राप्ती ही सुविधा आहे, सुख नाही. ती तात्कालिक सोय आहे, कायमस्वरूपी सुखाचा मार्ग नाही. जी गोष्ट चिरंतन आनंद देऊ शकत नाही, त्याला सुख म्हणता येणार नाही. ती केवळ सुविधा असते.
चूका सगळ्यांकडून होतात. त्यापासून आपण किती काळ दूर पळणार? प्रयत्नांनी चूका कमी करता येतात, परंतु आयुष्य पूर्णपणे अचूक बनवता येणे कोणालाही शक्य नाही. मग त्या गोष्टींचा अट्टाहास का? आपण सगळेच जण परिपूर्ण आयुष्याचा ध्यास घेऊन जगत आहोत. परंतु कोणालाच हे माहित नाही,की आपले सुख नक्की कशात आहे? असे काय केले, की आपल्याला समाधान लाभेल? श्रीमंती हेच जर सुख असते, तर आज गर्भश्रीमंत लोक अमर असते. पण तसे होत नाही, त्यांनाही नानाविध व्याधींनी ग्रासले आहे.
सुखाच्या अवास्तव कल्पनांमागे धावता धावता मन विविध प्रकारच्या काळजी, चिंता आणि भीतीने ग्रस्त होत चालले आहे. मन तणावाच्या ओझ्याने दबून गेलेले असते. आजाराचे मूळ मनोविकारात दडले आहे. भय, घृणा, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या हे षडरिपू आजाराला कारणीभूत आहेत. ते मनाची घुसमट करवतात आणि तीच घुसमट छोट्या मोठ्या आजारांपासून कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे रूप धारण करते.
सतत चिंताग्रस्त असणारी व्यक्ती क्षयरोगाची शिकार होते. शिघ्रकोपी व्यक्ती हृदयविकाराची समस्या मागे लावून घेते. अन्नाचे अतिसेवन कोलेस्ट्रॉलला आमंत्रण देते, तर रागाच्या, नैराश्याच्या भरात केलेला अन्नत्याग थायरॉईड, कुपोषणाला कारणीभूत ठरते. याचाच अर्थ, मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो.
आजचे युग तणावयुग झाले आह़े जागतिक आनंद दिवसाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणानुसार १४९ देशांच्या यादीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे. आपण आपला आनंद कुठे गमावून बसलो आहोत, याचे परीक्षण प्रत्येकाने केले पाहिजे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात न देता स्वत:च्या खिशात ठेवण्याची कला आत्मसात केली, तर आजार कुठल्या कुठे पळून जातील!