२०२३ चा पहिला आठवडा संपला, मात्र तुमच्या संकल्पांनी आताच मान टाकली असेल तर करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:23 PM2023-01-07T15:23:49+5:302023-01-07T15:24:16+5:30

संकल्प पूर्ण करण्याचाही आपण संकल्प करतो, त्यासाठी या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत!

The first week of 2023 is over, but if your resolutions have already given up, do 'this' solution! | २०२३ चा पहिला आठवडा संपला, मात्र तुमच्या संकल्पांनी आताच मान टाकली असेल तर करा 'हे' उपाय!

२०२३ चा पहिला आठवडा संपला, मात्र तुमच्या संकल्पांनी आताच मान टाकली असेल तर करा 'हे' उपाय!

googlenewsNext

२०२३ सुरु झालं. नवीन इंग्रजी वर्षात नव्या संकल्पांची आखणी झाली. पहिले दोन चार दिवस सातत्यही राहीलं. पण पुढे काय? यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, आपल्या यशात अडथळे आणण्यास आपणच जबाबदार आहोत, हे मात्र आपल्याला काही केल्या उमगत नाही. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोष देत राहतो. लेखक व. पु. काळे म्हणत, 'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण मिळाले नाही, तर तो अस्वस्थ होतो!' म्हणून स्वतःच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

१. आजचे काम उद्यावर ढकलू नका : जेव्हा एखादे काम आपल्याला मनापासून करावेसे वाटते, ते सुरू करण्यासाठी आपण नेहमी उद्यापासून सुरुवात करण्याची योजना आखतो. इंग्रजीत म्हण आहे, 'टुमॉरो नेव्हर कम' उद्या कधीच उगवत नाही. हिंदीतही म्हणतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' म्हणजेच कामाची चालढकल करू नका. जेव्हा आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणतो, तेव्हा आजची जबाबदारी झटकत असतो. कामाची टाळाटाळ करत असतो. आपले मन त्या कामाची जबाबदारी झटकत असते त्यामुळे मेंदूलाही ते काम न करण्याची सूचना मिळते आणि काम कधीच सुरू होत नाही. म्हणून जी गोष्ट मनात आहे, ती मनात आल्याबरोबर त्यावर लगेच काम सुरू करा. उदा. व्यायामाची सुरुवात करायची आहे. पण हा विचार रात्री मनात आला, तर सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल, परंतु रात्री प्रत्यक्ष व्यायाम शक्य नसला, तरी किमान शतपावलीने मी माझ्या ठरवलेल्या कामाची सुरुवात केली, याची जाणीव मेंदूला होते आणि दुसऱ्या दिवसापासून मेंदू स्वतः तुम्हाला तुमच्या नियोजित कामाची सूचना देतो. वेळ कधीच गेलेली नसते, तिचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो आणि कामाला उद्यापासून नाही, तर आजपासून सुरुवात करावी लागते. 

२. जे करेन ते चांगलेच करेन : व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होत असते. ज्याचे काम चांगले त्याला दाम अधिक मिळतो. दोन पैसे अधिक गेले तरी चालतील, पण काम चांगले झाले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. याचाच अर्थ चांगल्या कामाला चांगला मोबदला मिळतो आणि चांगल्या कामाची प्रत्येक जण दखल घेतो. म्हणून लहानात लहान काम करताना सुद्धा ते इतके पद्धतशीरपणे करा, की लोकांना तुमची दखल घ्यावीच लागेल. काम करताना प्रामाणिकपणे करा. आपल्याकडून १०० टक्के कसे देता येतील, याचा विचार करा. माणसांची पारख त्याच्या गुणांवरून होते. छोट्या छोट्या सवयीवरून होते. म्हणून उरकून टाकण्याची सवय सोडून द्या. स्वतःला बजावून सांगा, 'चलता है, नही चलेगा!' कोणी माझे काम पाहो न पाहो, मला माझे काम आवडले पाहिजे, मला माझ्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे. एवढी प्रामाणिकता अंगी बाणली, तरी यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. 

हे दोन्ही प्रयोग आजपासून सुरू करा. अगदी आतापासून...!

Web Title: The first week of 2023 is over, but if your resolutions have already given up, do 'this' solution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.