Swami Samartha: स्वामींना नावडणार्या गोष्टी आजपासून आयुष्यातून काढून टाका; स्वामीकृपा होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:05 IST2025-03-31T15:04:52+5:302025-03-31T15:05:20+5:30
Swami Samartha: 'अशक्यही शक्य करतील स्वामी' हे स्वामींनी आपल्याला वचन दिले आहे, त्याबरोबरच त्यांनी एक वचन आपल्याकडूनही घेतले आहे, कोणते ते जाणून घ्या.

Swami Samartha: स्वामींना नावडणार्या गोष्टी आजपासून आयुष्यातून काढून टाका; स्वामीकृपा होईल!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
'जिथे स्वामी पाय, तिथे न्यून काय?' स्वामींच्या तारक मंत्रातील या ओळींची प्रतीची आपण अनेकदा घेतली असेल, अर्थाचं ज्याची श्रद्धा, विश्वास अढळ आहे, त्यांना स्वामीकृपा पदोपदी जाणवते. जसे की, दवाखान्यात हव्या असलेल्या रक्तगटाचे रक्त नाही, हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश नाही, विवाह जमत नाही, मुलाच्या शाळेची फी भरायला पैसे नाही, राहायला घर नाही की खायला भाकर नाही, घरातील समस्या असो अथवा घराबाहेरील, महाराज सदैव भक्तांना सांभाळत आहेत. जीवन कसे जगावे ह्यासाठी वेळोवेळी अनेक लीला करून भक्तांना भक्तीचा मार्गच कसा उत्तम आहे ह्याची जाणीव करून देत आहेत.
आज स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त अनेक घरांत, वसाहतीत, मंदिरात स्वामींचा उत्सव रंगेल, त्यात आपल्या आग्रहावरून स्वामी येतीलही, त्या भेटीची जाणीव होण्याआधी स्वामींच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा कोणकोणत्या, ते जाणून घेऊ आणि स्वामी कृपेस पात्र होऊ.
परमार्थ करावा पण प्रपंच वेशीला टांगून नाही ही महाराजांची शिकवण आहे.आपले जीवन, महाराजांचे आपल्या आयुष्यात पदार्पण झाले त्याआधी कसे होते ह्याचा विचार केला तर हसू येईल. दिशाहीन आयुष्य मार्गस्थ करणारे आपले स्वामी आज लेकी सुनांना भरभरून आशीर्वाद देणार आहेत, आपल्या नातवंडाना आशीर्वाद देणार आहेत आणि आपल्या संसारावर कृपेचा कटाक्ष टाकणार आहेत .
आपण आपला संसार संपूर्ण दिनक्रम त्यांच्या चरणी आज वाहून निर्धास्त राहायचे आहे . आपले काम एकच नाम घेत सेवा करणे .सेवा करण्यास सुद्धा त्यांची कृपा लागते . त्यालाही पूर्व सुकृत असावे लागते . आज महाराजांची कृपा होण्यासाठी आपण सुद्धा तसे वागले पाहिजे. प्रत्येकाला अध्यात्माच्या मार्गात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोजच्या जीवनात खरे अगदी खरे वागले पाहिजे . ज्याने आपल्याला जन्माला घातले आहे त्याच्याच नावाचा वापर करून कुणाला लुबाडले, नको ते राजकारण खेळत राहिले, कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, कुणाची निंदा केली तर मग महाराजांना त्यांचा सोटा आपल्या हाती घ्यावा लागेल आणि पुढे काय होईल त्याची जबाबदारी आपली असेल.
वाट्टेल तसे वागाल आणि स्वामी स्वामी कराल तर ते त्यांना चालणार नाही. उगीचच शिक्षेस पात्र ठरावे असे वर्तनच मुळात का करावे? महाराजांच्या डोळ्याच्या धाकात आपण असावे हेच आपल्यासाठी उत्तम! कारण, कलियुगात अगिणत प्रलोभने आहेत. आपण क्षणोक्षणी त्या प्रलोभनाना बळी पडत आहोत. त्यापासून परावृत्त होण्याचा मार्ग म्हणे अखंड नामस्मरण. राहू केतू आहेत तसा पत्रिकेत गुरु ही आहे आणि त्याची साथ असेल तर काहीच अशक्य नाही.
आयुष्यात आलेल्या असंख्य प्रचीती, ह्यामुळे आता माझे आयुष्य स्वामीमय झाले आहे. त्यांचे नाम घेण्यासाठीच आपला जन्म आहे हे मी समजून आहे आणि त्या नामाची गोडी वेळोवेळी प्रचीती देऊन त्यांनीच लावली आहे. दिवसातील तासंतास आपण सोशल मिडीयावर पडीक असतो. वेळीच सावरुया आणि वेळ निघून जायच्या आत ह्या नामस्मरणाची गोडी चाखूया. आपणच नाही तर आपला परिवार आपल्या आजूबाजूची असंख्य माणसे ह्यात नामाचे वलय आणि त्याची ओळख करून देऊया. आपल्या वास्तुत नामस्मरणाचे कार्यक्रम , आपल्या whatsapp गृप वरती नामस्मरण करून जीवन पुढे नेत राहूया.
आपल्या जीवनात सद्गुरूंचे पदार्पण होणे आणि त्यांची सेवा करण्याचे अहोभाग्य आपल्याला लाभणे ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण . सेवा करा आणि आपला प्रपंच त्यांच्या चरणी वाहा. मी हे केले मी ते केले मी आज मठात गेले मी प्रसाद केला ..चुकूनही ह्यापुढे ह्याचा उच्चार सुद्धा नको कारण आपल्या ह्या बापाला आपण अंतर्बाह्य कसे आहोत ते माहित आहे . महाराजांची सेवा करायची आहे ना? नक्की ? खरे ना? मग आपली व्यसने, आपल्या चुकीच्या सवयी? आपल्यातील जे जे चुकीचे आणि वाईट आहे ते ते सर्व काही काही त्यांच्या चरणी समर्पित करुया आणि आयुष्यात पुन्हा आपण तसे पुन्हा वागणार नाही ह्यासाठी वचनबद्ध राहूया. जमणार आहे का आज हे आपल्याला? जमवायचे आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मला नैराश्य आले असे सुखासुखी AC लावून म्हणायचे नाही. रस्त्यावर पण लोक आहेत, पाण्यासाठी अन्नाच्या एका घासासाठी तडफडत आहेत . चुकीच्या गोष्टीत व्यसनात जाणारा आपल्या पैसा त्या गरिबांच्या मुखीचा घास होउदे. अन्न दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सरकारला कसा टॅक्स भरतो तसा अध्यात्मिक टॅक्स पण भराव लागतो आणि तोही स्वखुशीने!
आपल्या सर्वत्र , चराचरात आपले गुरु आहेत , गुरु हे एक तत्व आहे, त्याची नावे अनेक असतील नावात काय आहे? शेवटी गुरुतत्व समजले पाहिजे. खडकाळ विहिरीला एका क्षणात जलमय करणाऱ्या आपल्या महाराजांना काय अशक्य आहे पण लोकांनी त्यांना दगड सुद्धा मारले आहेत , त्यांच्या ह्या लीलांचा खोल अर्थ आपल्याला समजेल तो सुदिन म्हणायचं नाहीतर असे कित्येक प्रगट दिन आले आणि गेले आम्ही अहो तिथेच आहोत असे व्ह्यायला नको.
सतत कुणाचीतरी निर्भत्सना करणे, खुशामती करणे , लाचलुचपत , द्वेष मत्सर करत आपल्याच लोकांना पाण्यात पाहत राहणे ह्याने आपली अधोगतीच होणार आहे. आपल्या अहंकाराच्या टिमक्या वाजवणे बंद करा , क्षणभंगुर अस्तित्व आहे आपले. आपल्या वागण्या बोलणे , चालणे सर्वातील माज आणि मिजास आज कात टाकल्यासारखी समर्पणाची भावना मनात ठेवून सोडून देवूया . संकुचित वृत्ती उपयोगाची नसते खुल्या दिलाने ह्या मोकळ्या आकाशाखाली आनंदाने आपले जीवन व्यतीत करणे हेच साधकाकडून अपेक्षित आहे. आपल्या अशा वागण्याने स्वामी सुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जातील म्हणूनच आज ह्या सर्व गोष्टीना तिलांजली देवूया.
मी मी मी सोडून देवूया , इथे लाखो लोकांना जेवायला नाही आणि आपण घरातील अन्न , फळे फुकट घालवतो , विचार केला तर रोज अनाठायी कितीतरी पैसा आपला खर्च होत आहे. नुसत्या झोपा काढायच्या, व्यायाम नाही समोर दिसेल ते खायचे आणि मग आजारी पडले की स्वामी स्वामी . अरे बटाटे वाडे खाताना त्यांना विचारले होते का? नाही ना . कारल्याची भाजी नको मटार पनीर लगेच हवे असे आहे आपले. काही नवीन शिकायला नको , सतत दुसरा काय करतो तिथे सगळे लक्ष. आयुष्यातील किती वेळ फुकट जातोय आपला, त्याचे भान ठेवण्यासाठी हा प्रगट दिन आहे.
मोहमाया आणि त्याने भ्रमित करणारा राहू त्याच्या विळख्यात आज अखंड जग असताना आपण आपल्याला २४ तास नामस्मरणाची अंघोळ घालायला हवी तर आणि तरच आपला निभाव लागणार आहे . डोळे उघडा आणि ते उघडेच ठेवा . सदैव शत्रुत्व , नीच वृत्ती चालणार नाही . जीवन जगण्याची कला आत्मसात करुया आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या. कुणाच्या दुःखाला आणि डोळ्यातील पाण्याला आपण जबाबदार ठरू नये इतकेच पाहिले तर प्रगट दिन खऱ्या अर्थाने आपल्याला समजला असे म्हणायला हरकत नाही.
आज महाराज प्रत्येक भक्ताच्या घरी हजेरी लावणार आहेत तीही आपल्या नकळत, आपण केलेल्या सेवेने प्रसन्न होवून आपल्या सर्वाना आशीर्वाद देणार आहेत. तत्पूर्वी आपल्या कर्माची तपासणी करूया स्वामीरुप होऊया.
संपर्क : 8104639230