Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:58 IST2025-05-08T14:55:29+5:302025-05-08T14:58:37+5:30

Swami Samartha: एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण स्वामीभक्ती वाया जात नाही हे लक्षात ठेवा, त्याचे फळ उचित वेळी मिळणारच!

Swami Samartha: If you serve Swami unconditionally, you will get 'these' two things in life! | Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपण केलेल्या साधनेची, नामस्मरणाची, प्रदक्षिणा, महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचीती महाराजांना द्यावीच लागते, कारण प्रचीतीविना भक्ती नाही. पण ती प्रचीती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायचे असते. महाराज मी इतका जप केला, पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल  त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप करवून घेतला हे लक्षात घ्या. जितका वेळ जप केलात तितका वेळ मन शांत राहिले, एका जागेवर बसायची सवय लागली, तितका वेळ सोशल मिडीयावर उनाडक्या थांबल्या, चार सिगरेटी (पीत असाल तर ) कमी ओढल्या गेल्या. लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली, म्हणजे बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या!

मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरूंशी केलेला तो निव्वळ, उघड उघड व्यवहारच नाही का? आज कलीयुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते. घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्वच अनिश्चित असते, पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही . शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे, पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे. 

Swami Samartha: स्वामींना तुम्ही काय अर्पण करताय हे महत्त्वाचे नाही तर; वाचा एका स्वामी भक्ताचा अनुभव!

कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा, महाराज ओंजळ भरून वाहील इतके सुख देतील. त्यांना माहित आहे तुम्हाला कधी काय द्यायचे ते. दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही TV चे बटण नाही आणि अल्लाउद्दिनचा दिवा सुद्धा नाही. गेल्या कित्येक जन्मांची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होते मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो. म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या. करत राहा बस...ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका! मी हे केले, मी ते करणार आहे. कशासाठी सांगायचे? मोठेपणा मिरवायला?  विचारा हे प्रश्न स्वतःच्याच मनाला. महाराज आणि तुमच्यात टेलीपथी आहे. तुम्ही काय करता ते त्यांना माहित आहे, इतरांना माहित होण्याची गरजच काय? अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो. आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्ट चक्र आपल्या मागे लागते. अनुभव घेऊन बघा!

आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते, ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत. ती जे करते ते प्रेमाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही, तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का? नाही ना. कारण तिचे प्रेम अपेक्षाविरहित असते. 

त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा. मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केलीत तर आयुष्य बहरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे “ समाधान “ आणि रात्रीची शांत झोप. 

आजकाल सगळीकडे मध्यस्थ असतात, पण महाराजांशी आपला सरळ संपर्क टेलिपथीचा! ह्या हृदयीचे त्या हृदयी. अहो बाप आहे तो आपला त्यानेच जन्माला घातलय आपल्याला. त्याला काही नको, पाच नारळाचे तोरण किंवा अजून काही. तो प्रेमाचा भुकेला आहे. तो भाव सच्चा हवा, त्यात भेसळ नको. 

मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळते . गुरुचरण लाभणे आणि त्यांचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना अपोआप मागणे थांबते आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी मनाची अवस्था होते. काही नको वाटते. मी, माझे महाराज आणि माझे नामस्मरण हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही हे नक्की .आपण फार सामान्य माणसे आहोत, पण तरीही काहीही मागू नका. न मागताच सर्व मिळणार आहे हे ध्यान्यात ठेवा. महाराजांच्या सोबत व्यवहार नको . निदान त्यांना ह्यात ओढू नका. महाराजांना पैशाची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते. शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको. एका रात्रीत काहीच बदलणार नाही पण बदल होईल हे नक्की. संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने होईल. आपला संयम संपला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो .

महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या समजण्याच्या खूप बाहेर आहे असे श्री भाऊ पाटील( शेगाव) मला नेहमी सांगत असत .आता ते जरी नसले तरी त्यांनी अनुभवलेले आणि शब्दांकित केलेले महाराज मी विसरणार नाही. अध्यात्माचा खूप खोलवर अर्थ ह्या सर्वात दडलेला आहे.

Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

आपल्या मनात कुठलाही विचार यायच्या खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो किंबहुना तो त्यांनीच दिलेला असतो. त्यामुळे उठ सूट त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही. महाराज आपला जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल “टेलीपथी'' आहेत . त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव्हा होईल तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल ह्यात शंकाच नाही. आई जशी आपल्या मनातील सर्व न सांगताच ओळखते अगदी तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेवून ठेवणार हे त्रिवार सत्य आहे. 

महाराजांच्या सोबतीने जगायला शिका, कसलीच शंका, हाव, मागणे काहीही न करता त्यांच्यासोबत चालत राहा . इतकेच आपण करू शकतो किंबहुना भक्ताने  तेवढेच करणे त्यांना अपेक्षित आहे. 

संपर्क : 8104639230

Web Title: Swami Samartha: If you serve Swami unconditionally, you will get 'these' two things in life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.