Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:33 IST2025-10-31T12:31:27+5:302025-10-31T12:33:38+5:30
Shri Swami Samartha Upasana: देवघरातील देव हे केवळ मूर्ती किंवा प्रतिमा नसून त्यात दैवी अस्तित्त्व असते, ते तुम्हाला जाणवते का? कसे ओळखावे ते जाणून घ्या.

Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
रोजचे जीवन जगताना विचार केला तर क्षणोक्षणी महाराज आपल्या सोबत आहेत हे जाणवते. भक्तांचे रक्षण करत आहेत आणि कुठून कुठून अंधारातून आपल्याला बाहेर काढून जगण्याचे बळ देत आहेत हे लक्षात येईल. अनेकदा त्याचे विस्मरण होते. पण लक्षात ठेवा, २४ तास महाराज आपल्या सोबत आहेत. प्रश्न हा आहे की, आपण किती क्षण त्यांची सोबत करतो? किती भक्त महाराजांची खरच काळजी वाहतात? बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे!
डहाणूला समुद्राच्या जवळ संत गजानन महाराजांचे मंदिर आहे. महाराजांचे परमभक्त तपस्वी साधक दादा पवार हे थंडीत, पावसाळ्यात, समुद्रासमोर मंदिर असल्यामुळे थंडी असते, म्हणून दादा रात्री एका वाटीत खोबरेल तेल गरम करून महाराजांच्या पायाला लावत असत. काय ही परमोच्च सेवा, भक्ती आहे. आहे का हा भाव आपल्याजवळ? विचार तरी करतो का आपण असा हा कधी? थंडी वाजली की मस्त पांघरुणे घेऊन घोरत झोपतो, पण महाराजांना नाही का पांघरूण? ते नसतील का कुडकुडत? त्यांना आपले मानतो ना? ती मूर्ती नाही ते खरेच आहेत आणि मग ते खरेच असतील तर त्यांना थंडी नाही का वाजणार? ह्या हृदयीचे त्या हृदयी इतके अतूट नाते महाराजांच्या सोबत आपले जेव्हा होईल, तो क्षण म्हणजे आपल्याला अध्यात्माची झालेली खरी ओळख असेल.
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
असे झाले तर आयुष्यात कशाचीही भीती वाटणार नाही. कारण आपण महाराजांच्या कृपा प्रसादाखाली वावरत असू. मी तर २४ तास स्वामी स्वामी करते, का? मला काही नकोय त्यांच्याकडून, पण आजवर जे जे दिले आहे तेही माझी पात्रता नसताना त्यासाठी मी कृतकृत्य आहे. महाराजांच्यामुळे आज मी आहे आणि माझी ओळख अस्तित्व आणि श्वाससुद्धा! त्यामुळे त्यांचा वरदहस्त शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहावा म्हणून जीवाचे रान करून स्वामी स्वामी करत असते.
त्यांच्या कृपेसाठी आणि त्यांच्या एका कटाक्षासाठी जीवाची जेव्हा तडफड होते तो क्षण त्यांच्या समीप नेणारा असतो. शंका आणि कुशंकेने भरलेले आपले मन निराशेच्या वाटेवर कधीही जाऊ नये म्हणून स्वामी नामाची लक्ष्मण रेषा आहे. त्याच्या आतच राहायचे. अहंका, माज आणि षड्रिपू ह्यानाही जवळ येऊ न देण्याचे काम “नामस्मरण“ करत असते.
आपल्याही नकळत आपल्यात बदल घडवण्याचे काम नाम करते आणि आपल्याला अंतर्बाह्य अनुभूती मिळते. सगळे कसे अगदी स्वप्नवत आखीवरेखीव होत आहे हे जेव्हा समजते तेव्हा मनोमन खात्री पटते की हे सर्व त्यांचे काम आहे.
महाराज हा आपल्या जगण्याचा मोठा आधार आहे. त्यांचे आपल्याकडे लक्ष आहेच, त्याशिवाय आपले जगणे हे जगणे नाहीच. दांभिकता त्यांना आवडत नाही, कुणाला कमी लेखणे, कारण नसताना त्रास देणाऱ्या व्यक्तीची भक्ती ते कधीच मान्य करणार नाहीत. नुसते प्रसाद वाटणे आणि तीर्थाटन करणे म्हणजे झाले नाही तर त्याप्रमाणे आपले कर्म करणे हे अध्यात्म आहे.
प्रापंचिक माणसांचे आयुष्य अडचणी आणणारे असणारच, पण त्यात त्यांचे बोट धरले तर त्यातून मार्ग पण निघेल. २४ तासातील २४ मिनिटे जरी परमार्थ साधला तर पूर्ण दिवस चांगला जाईल. जे काही करू ते श्रद्धेने, मनापासून तरच यशाची महाद्वारे उघडतील. अनेक लोक अनेक उपाय करतात पण फळ नाही कारण मन भलतीकडेच असते. शरीर कुठेही असो मन त्यांच्या चरणी असावे.
नित्य उपासना सुद्धा महत्वाची आहे. आपल्या मनाप्रमाणे वाटेल त्या वेळी कशीही उपासना केली तर त्याला महत्व नाही आणि अर्थ त्याहून नाही पण जे करू त्यात सातत्य नित्य केली तर ती फळेल ह्यात दुमत नाही. जीवनाला शिस्त असणे महत्वाचे आहे. जसे वाटेल त्या वेळी वाटेल ते खाल्ले तर पचन निट होत नाही तसेच साधना उपासना सुद्धा थोडी करावी पण सातत्याने करावी. महाराजांचे अस्तित्व मान्य करणे ही सुद्धा एक मोठी साधना आहे. एक फोटो आणून ठेवलाय घरात , पुढे काय? नुसता फोटो नाही तो , त्यात त्यांचे अस्तित्व आहे आणि ते!
आपल्याला जाणवू लागते जसजशी आपण त्यांची पूजा करतो , फोटोतील महाराज जणू आपल्याशी बोलू लागल्याचा भास होतो , त्यांची कधी करडी नजर आपल्यावर रोखलेली असते तर कधी प्रेमाने डोळे भरून आलेले आपण बघतो. आपण चुकलो तर त्यांच्याकडे बघण्याची आपली हिम्मत जेव्हा होत नाही तेव्हा मनोमनी समजायचे, आपल्याला हळूहळू महाराज कळले आहेत. लहानपणी आपले प्रगतीपुस्तक नको ते आकडे दाखवू लागले की बाबांचा चेहरा आठवायचा तसेच आपल्या कर्माचे प्रगती पुस्तक महाराजांच्याकडे आहे आणि ते आहेच!
सद्गुरू सेवा आपल्यासाठी आहे. आपल्या हातून ह्या जन्मात काहीतरी चांगले घडावे, समाजासाठी उपयुक्त काम व्हावे, कुणाला तरी आपल्यामुळे मदत व्हावी आणि आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात आनंद बघायला मिळावा हीच खरी उपासना आहे .
रोजचे जीवन हीच साधना आहे आणि ती करत असताना आपली भक्ती त्यांच्यापर्यंत कधी पोहोचते आपले आपल्यालाही समजत नाही . त्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा नाही ह्याची जाणीव मनाला होते तो क्षण परमोच्च आनंदाचा समाधानाचा असतो आणि तो मिळवण्यासाठीच साधना आहे जी तेच आपल्याकडून करून घेतात. महाराज म्हणजे श्वास, आपले स्वतःचे अस्तित्व, दृष्टीकोन, आशावाद आणि कर्मयोग. जीवन जगण्याची कला अध्यात्माचा पाया भक्कम असेल तर लवकर अवगत होते. अध्यात्माचा मार्ग हा खरा राजमार्ग आहे आणि त्यावरून चालताना कितीही खडतर जीवन असेल तरी ते सुसह्य होते.
आपल्या गुरूंच्या चरणी आपले आयुष्य समर्पित करून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा आणि आयुष्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करुया. सर्व साधक , उपासकांना ज्यांनी आपल्या साधनेतून आपले जीवन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आणि अर्थात माझा प्राण असलेल्या महाराजांना माझा साष्टांग दंडवत .
आदी तूच अंती तूच ..तूच सर्व ठाई
कशापायी सांगू तुला ठावे सर्वकाही
ठेव हात डोईवरी शिणली रे काया
तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया
पुन्हा तेच येणे जाणे तीच वहिवाट
चार मुक्कामाच्या पाई जगण्याचा घाट
चिते आधी चिंता जाळी लागले कळाया
तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया
संपर्क : 8104639230