नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ; नेमकी कोणती भक्ती खरी? महाराजांनी दिले कालातीत ज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:53 IST2025-03-12T12:51:57+5:302025-03-12T12:53:33+5:30

Shree Swami Samarth Maharaj Preaching: स्वामी समर्थ महाराज यांनी खरी भक्ती कोणती? याबाबत भाविकांना कालातीत ज्ञान दिले.

swami samarth is the nrusimha saraswati maharaj which devotion is true maharaj teach timeless knowledge | नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ; नेमकी कोणती भक्ती खरी? महाराजांनी दिले कालातीत ज्ञान

नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ; नेमकी कोणती भक्ती खरी? महाराजांनी दिले कालातीत ज्ञान

Shree Swami Samarth Maharaj Preaching: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' आणि 'अशक्यही शक्य करतील स्वामी' ही दोन वचने स्वामीभक्तांसाठी एखाद्या दिव्यमंत्रांशिवाय कमी नाहीत. हे दोन आश्वासक मंत्र स्वामीभक्तांचे तारणहार बनतात, अशी सर्वसामान्य स्वामीभक्तांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा भक्तपरिवार खूप मोठा आहे. अगदी ठिकठिकाणी स्वामींचे मठ स्थापन करण्यात आले आहेत. अनेक जण स्वामी समर्थांचे सकारात्मक अनुभव आल्याचे आवर्जुन सांगत असतात. स्वामी दत्तावतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनीच स्वतःची ओळख सांगितली आहे. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी आपणच नृसिंह सरस्वती असल्याचे सांगितले. तसेच खरी भक्ती नेमकी कोणती, याचेही कालातीत ज्ञान दिले.

एके दिवस सर्वजण स्वामींसमोर बसले असताना अचानक स्वामींना लहर येते आणि स्वामी विचारतात की, आम्ही कोण आहोत? स्वामींच्या प्रश्नावर चोळप्पा उत्तर देतात की, आपण त्रिभुवन नायक आहात! या उत्तरावर स्वामी संतुष्ट होत नाहीत आणि चोळप्पांना उद्देशून म्हणतात की, बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. इकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. 

काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना?

अक्कलकोटला पोहोचल्यावर तत्क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तरतो की, श्रीनृसिंहसरस्वतीची! स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी नतमस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.

नेमकी कोणती भक्ती खरी? स्वामींनी भाविकांना दिले कालातीत ज्ञान

एकदा स्वामी विश्राम करत असताना, बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की, भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून, तन, मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती.

 

Web Title: swami samarth is the nrusimha saraswati maharaj which devotion is true maharaj teach timeless knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.