'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या ओळींची आठवण करून देणारी भगवान बुद्धांची कथा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:58 AM2021-05-17T11:58:50+5:302021-05-17T11:59:12+5:30

माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.

The story of Lord Buddha reminding us of the lines 'Let's forget what happened, let's move on'. | 'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या ओळींची आठवण करून देणारी भगवान बुद्धांची कथा.

'झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या ओळींची आठवण करून देणारी भगवान बुद्धांची कथा.

Next

एकदा भगवान बुद्ध विहार करण्यासाठी निघाले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा शिष्यवर्ग जायला निघाला. भगवान म्हणाले, `मी मोठ्या परिक्रमेसाठी जात आहे, तुम्ही सर्वांनी येऊ नका, इथेच मठात राहून इथली व्यवस्था पहा. मी काही दिवसात परत येतो.'

भगवानांनी केलेल्या सूचनेनुसार शिष्यगण मठात राहिले आणि भगवान एकटेच भ्रमंतीसाठी निघाले. भगवानांना ओळखणारा अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणात गावोगावी होता. काही जण त्यांना प्रत्यक्ष ओळखत होते, तर काही जणांनी त्यांची केवळ ख्याती ऐकली होती. 

लोकांचे अभिवादन स्वीकारत भगवान जात होते. एका सकाळी एका गावातून जात असताना दारु प्यायलेला एक माणूस स्वत:च्याच घरासमोर उभा राहून घरच्यांना शिवीगाळ करत होता. भगवान तिथून जात होते. त्या व्यक्तीने भगवानांना पाहिले. हा कोण गोसावी भिक्षा मागायला आला, अशा विचाराने तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला. त्याने भगवानांना बरेच काही सुनावले. गाव गोळा झाले. भगवानांनी शांतपणे ऐकून घेतले व ते निघाले.

सायंकाळी त्याची नशा उतरल्यावर गावातल्या बुजूर्ग व्यक्तीने त्या व्यक्तीला चूक निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला, `पण मी ज्याला बोल सुनावले ते भगवान बुद्ध नव्हतेच, ते कायम आपल्या शिष्यांबरोबर असतात.' बुजूर्ग व्यक्ती म्हणाली, `यंदा, भगवान एकटेच निघाले होते, पण तू नशेत असल्यामुळे तू त्यांना ओळखू शकला नाहीस. तुझ्याकडून मोठे पाप घडले आहे. तू त्यांची क्षमा मागितली पाहिजे.'

दारुड्या माणसाला त्याची चूक उमगली. भविष्यात दारूला स्पर्शही करायचा नाही असा त्याने पण केला आणि भगवान बुद्धांचा शोध घेत तो निघाला. वाटेत लोकांना विचारत विचारत दुसऱ्या दिवशी तो जवळच्या गावात पोहोचला, तिथे एका वटवृक्षाखाली भगवान ध्यानस्थ बसले होते. ते समाधीतून बाहेर यायची वाट बघत तो मनुष्य जमीनिवर बसून राहीला.

भगवान बुद्धांनी डोळे उघडले. ते पुढच्या प्रवासाला जायला निघाले, तो समोर असलेला मनुष्य त्यांचे पाय धरत गयावया करू लागला. भगवान म्हणाले, `तू का रडतोस? कसली क्षमा मागतोस?'

तो म्हणाला, `काल सकाळी मी तुम्हाला नशेच्या भरात वाटेल ते बोललो. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझी चूक लक्षात घेऊन यापुढे नशा करणार नाही, असा पण मी केला आहे. पण माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मला माफ करा.'

भगवान बुद्धांनी त्याला उठून उभे केले आणि म्हणाले, `तू नशा सोडलीस हे चांगलेच झाले, परंतु तू सांगत असलेला प्रसंग मला आठवतही नाही. मी विसरलो, तसा तूही विसरून जा. चांगले आयुष्य जग. माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.'

Web Title: The story of Lord Buddha reminding us of the lines 'Let's forget what happened, let's move on'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.