Somavati Amavasya 2023: पितरांना आणि मरणोत्तर आपल्याला शिवधामाची प्राप्ती हवी असेल तर सोमवती अमावस्येला करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:04 IST2023-02-18T13:03:34+5:302023-02-18T13:04:04+5:30
Somavati Amavasya 2023: अमावस्येची तिथी पितरांच्या पूजेसाठी राखीव ठेवली आहे, त्यात सोमवती अमावस्या म्हणजे शिवधामाचा मार्ग, त्यासाठी हे उपाय!

Somavati Amavasya 2023: पितरांना आणि मरणोत्तर आपल्याला शिवधामाची प्राप्ती हवी असेल तर सोमवती अमावस्येला करा 'हे' उपाय!
हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला चंद्र दर्शन होत नाही. तिलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात. २० फेब्रूवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. त्यादिवशी पितरांना आणि मरणोत्तर आपल्याला शिवधामाच्या प्राप्तीसाठी नियमावली दिली आहे. म्हणजेच आपल्या धर्मसंस्कृतीने केवळ आपलाच नाही तर होऊन गेलेल्या व्यक्तींचा परलोकीचा प्रवासही सुखरूप व्हावा, याचा दूरदृष्टीने विचार केला आहे.
सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :
सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते.
सोमवती अमावस्येचे महत्त्व :
सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
पूजेचा विधी:
सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करून शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे.
पांढरे फुल आणि बेलाचे महत्त्व :
महादेवाला पांढरे फुल आणि बेलाचे पान आवडते. पांढरे फुल शांततेचे प्रतीक आहे. महादेवाला शांतता आवडते. एकांत आवडतो. म्हणून ते स्मशानात नाहीतर कैलासावर राहणे पसंत करतात. बेल हा अत्यंत गुणकारी आणि औषधी आहे. महादेवांनी हलाहल प्राशन केले होते तेव्हा बेलाच्या पानांचा रस त्यांना औषध म्हणून देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह कमी झाला म्हणून महादेवांना बेलाची पाने आवडू लागली. म्हणजेच जो गुणकारी आहे, मग ती वस्तू असो नाहीतर व्यक्ती, जी समाजपोगी आहे तिला भगवंत आपलेसे करतो, हे यावरून लक्षात येते. म्हणून महादेवाला पूजेत दूध, पाणी, बेलाचे पान आणि पांढरे फुल वाहिले जाते.