Skand Shashthi 2024: आज स्कंदषष्ठीनिमित्त भगवान कार्तिकेयाची पूजा केली असता मुलांना मिळते घवघवीत यश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 10:52 IST2024-07-11T10:50:10+5:302024-07-11T10:52:02+5:30
Skand Shashthi 2024: भगवान कार्तिकेय हा पार्वती मातेचा ज्येष्ठ पुत्र, त्याची पूजा केली असता पार्वती माता संतुष्ट होऊन भक्तांच्या अपत्याला यश, कीर्ती देते.

Skand Shashthi 2024: आज स्कंदषष्ठीनिमित्त भगवान कार्तिकेयाची पूजा केली असता मुलांना मिळते घवघवीत यश!
दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी व्रत केले जाते. कारण ही तिथी भगवान कार्तिकेय यांची जन्मतिथी आहे. या महिन्यात हे व्रत ११ जुलै रोजी येत आहे. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे व्रत केले जाते.
स्कंद षष्ठीच्या तिथीला भगवान शिवाच्या ज्येष्ठ पुत्राची अर्थात कार्तिकेयाची पूजा केली जाते. कार्तिकेयाचे एक नाव स्कंद कुमार आहे. म्हणून देवीचेही एक नाव स्कंद माता असे आहे. देवी पार्वती जसे आपल्या दोन्ही पुत्रांचे लाड करते त्यांचा प्रेमाने सांभाळ करते व त्यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद देते, त्याचप्रमाणे प्रत्येक मातेला आपल्या पाल्याचा विकास व्हावा व त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे वाटते. यासाठीच धर्मशास्त्राने स्कंद षष्ठी व्रत सांगितले आहे.
स्कंद षष्ठी व्रत पूजा पुढीलप्रमाणे :
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यासमोर अर्घ्य द्यावे. त्यानंतर कार्तिकेय स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करावे. फुले, फळे, तांदूळ, धूप, दीप, सुगंध, लाल चंदन, इत्यादी अर्पण करावे. असे मानले जाते की भगवान कार्तिकेयाला मोराचे पिसे अर्पण केल्यास ते खूप प्रसन्न होतात. कारण भगवान कार्तिकेयाला मोराची पिसे आवडतात. यातले काहीच करता आले नाही तरी कार्तिकेय स्तोत्राचे पठण अवश्य करावे. स्तोत्र पुढीलप्रमाणे -
स्कंद उवाच –
योगीश्वरो महासेनः कार्तिकेयोऽग्निनन्दनः।
स्कंदः कुमारः सेनानी स्वामी शंकरसंभवः॥१॥
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः।
तारकारिरुमापुत्रः क्रोधारिश्च षडाननः॥२॥
शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः।
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः॥३॥
शरजन्मा गणाधीशः पूर्वजो मुक्तिमार्गकृत्।
सर्वागमप्रणेता च वांछितार्थप्रदर्शनः ॥४॥
अष्टाविंशतिनामानि मदीयानीति यः पठेत्।
प्रत्यूषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ॥५॥
महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनात्।
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ॥६॥
ब्रह्मपुत्री देवसेना-षष्ठी देवीचे पती असल्याने भगवान कार्तिकेयांची पूजा संतती प्राप्तीसाठी तसेच संततीच्या प्रगतीसाठीदेखील केली जाते.