शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

श्रीराम आख्यान: एक भाऊ होता रामाची ‘उजळ सावली’, एकाने विनम्रपणे अयोध्या सांभाळली! रामायणातील ‘बंधुप्रेमा’ची बातच न्यारी

By देवेश फडके | Published: April 11, 2024 7:41 AM

Shriram Aakhyan: श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या भावंडांकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. जे आजच्या काळातही लागू पडू शकते. रामायणाची बंधुप्रेमाची शिकवण कालातीत आहे.

Shriram Aakhyan: श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही चार भावंडे कायमच आदर्श राहिली आहेत. एकमेकांना धरून राहणे, एकमेकांचा आदर करणे, आपापल्या मर्यादा ओळखणे आणि कधी न ओलांडणे यांसह अनेक गोष्टी आयुष्यभर पाळल्याही आणि सांभाळल्याही. रामायण घडून युगे लोटली तरी आजही भावंडांना उपमा देताना राम-लक्ष्मणाची जोडी असे म्हटले जाते. यावरून राम आणि लक्ष्मण या बंधू जोडीचा प्रभाव किती कालातीत आहे, याची प्रचिती येते. 

काही मान्यतांनुसार, प्रभू श्रीराम जसे श्रीविष्णूंचे सातवे अवतार होते. तसे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांपासून रामकार्यात सहभागी झालेली अनेक मंडळी ही देवता, गंधर्व यांची पुढील पिढी किंवा कोणाचे ना कुणाचे अवतार होते, असे सांगितले जाते. लक्ष्मण हाही शेषनागाचा अवतार होता, अशी मान्यता आहे. हिंदी साहित्यातील दिग्गज नाव असलेल्या उमाकांतजी यांनी लक्ष्मणाला उजळ सावलीची उपमा दिली आहे. ते म्हणतात की, पृथ्वीवर प्रत्येकाची सावली ही काळी असते. मात्र, राम एकच असे होऊन गेले त्यांची सावली उजळ होती, ती म्हणजे लक्ष्मण. रामायणाचा एकंदरीत आढावा घेतल्यास लक्ष्मण कायम श्रीरामांसोबत होता, असेच दिसते. अगदी बालवयात गुरुकुलात जाऊन धर्म, शस्त्र-शास्त्राचे शिक्षण घेण्यापासून ते श्रीरामांची अवतारसमाप्ती होण्यापर्यंत लक्ष्मण सोबत होता. वास्तविक रामाने अवताराची सांगता करण्यापूर्वी लक्ष्मणाची अवतारसमाप्ती झाली. 

श्रीराम जेवढे शांत, संयमी तेवढेच लक्ष्मण आक्रमक होते. गुरुकुलात शिक्षण झाल्यानंतर लगेचच विश्वामित्रांनी अयोध्या गाठून, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ असे वचन मागितले आणि रामाला घेऊन जाण्याचा हट्ट धरला. तेव्हा रामासोबत लक्ष्मणही जाईल, असे ठरले. या प्रवासात रामासह लक्ष्मणालाही अनेक ज्ञानांची माहिती झाली. अनेकदा लक्ष्मण आक्रमक होत असे. मात्र, राम अगदी शांतपणे आणि शंकांचे यथायोग्य पद्धतीने निरसन करून लक्ष्मणाची समजूत काढत असे. सीतास्वयंवराच्या येथील एक प्रसंगही सांगितला जातो. सीतास्वयंवर सुरू असताना अनेक राजे-महाराजे, शक्तिशाली योद्धे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते कुणालाही शक्य होत नाही. त्या सभेत उपस्थित असलेल्या श्रीरामांची कुणी दखल घेत नाही, हे पाहून लक्ष्मणाची चलबिचल होते आणि याबाबत तो नापसंतीही व्यक्त करतो. तेव्हाही श्रीराम आणि गुरुजन समजूत काढतात. रामावर होत असलेला अन्याय किंवा पुढील अनेक प्रसंगात जिथे चुकीचे जे काही घडत असते, त्याबाबत लक्ष्मणाने त्या त्या वेळी नाराजी, नापसंती, आक्रमकता दाखवल्याचे दिसून येते.

रामानेही लक्ष्मणासाठी अनेक गोष्टी कळत-नकळतपणे केल्या आहेत. रामही लक्ष्मणाचे म्हणणे आधी शांतपणे ऐकून घेत आणि तितक्याच शांतपणे लक्ष्मणाला उत्तरे देत. रामाने लक्ष्मणावर कधी दादागिरी केल्याचे पाहायला मिळत नाही. रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी मायाजाल टाकतो. बराच काळ राम येत नाही म्हटल्यावर सीता कासावीस होते आणि लक्ष्मणाला रामाला शोधून घेऊन यायला सांगते. लक्ष्मण काही जात नाही. कारण, रामाने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला तिथे थांबायला सांगितलेले असते. मात्र, इथे सीतेचा धीर सुटत चाललेला असतो. तेव्हा सीता लक्ष्मणाला नको-नको ते बोलते. बोल लावते. लक्ष्मण मात्र द्विधा मनःस्थिती अडकतो. सीतामाईचे ऐकायचे की रामाचे ऐकायचे अशा विचित्र कात्रीत सापडतो. अखेर लक्ष्मण रेषा आखून रामाचा शोध घ्यायला निघून जातो. सीताहरणानंतर दोघेही परतात, तेव्हा सीता दिसत नाही म्हटल्यावर कधी नव्हे ते रामाचा धीर किंचित सुटतो आणि राम हा लक्ष्मणाला तीव्र शब्दांत बोल लावतो. खरडपट्टी काढतो. मात्र, लक्ष्मण निमूटपणे सगळे ऐकून घेतो. 

इथे लक्षात घेण्यासाठी एक बाब म्हणजे सीता आणि राम दोघेही लक्ष्मणाला चांगलेच सुनावतात. पण लक्ष्मण कधीही कोणत्याच प्रकारची अढी मनात धरून बसत नाही. दोघांबाबत यत्किंचित नकारात्मकता मनात आणत नाही. पाहून घेईन पुढे, अशी बदला घ्यायची मानसिकता तयार करत नाही. उलट दोन्ही वेळेस आपलीच मोठी चूक झाली, अशी समजूत करून घेत स्वतःला वेदना करून घेतो. अपराधी समजतो. पण श्रीरामांची सावली कधी काळी होऊ देत नाही. पुढे सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केल्यानंतर सीताशोधार्थ काहीच घडत नाही. हे रामाला दिसत असते. मात्र, मर्यादा पुरुषोत्तम त्यावर काहीच बोलत नाही. ही गोष्टी सहन होत नाही आणि अखेरीस अधिक स्पष्टपणे जाऊन सुग्रीवाला रामकार्याची आठवण लक्ष्मण करून देतो. 

लक्ष्मणाबाबत रामाला नेमके काय वाटते, ही गोष्ट सर्वाधिक प्रकर्षाने राम-रावण युद्धात जाणवते. रावणाचा मुलगा इंद्रजित लक्ष्मणाला जखमी करतो. तेव्हा रामाची अवस्था अतिशय बिकट होते. बेशुद्ध लक्ष्मणाचे डोके मांडीवर घेऊन राम खिन्न मनाने बसलेला असतो. ज्याने कायम साथ दिली, तोच असा निश्चल पडलेला पाहून रामाचा जीव कासावीस होतो. प्रत्यक्ष रामाच्या डोळ्यात अश्रू तरळतात. काय करू आणि काय नको, असे रामाला होते. रामाची शक्तीच क्षीण झाल्यासारखी होते. अखेर हनुमंत संजीवनी घेऊन येतात आणि लक्ष्मणाला पुन्हा जीवनदान मिळते, तेव्हा सर्वाधिक आनंद रामालाच होतो. राम पुन्हा सगळी शक्ती एकवटून उभा राहतो आणि रावणवध करतो. पुढे रावण शेवटच्या घटका मोजत असतो, तेव्हा श्रीराम हे लक्ष्मणाला आज्ञा करतात की, रावणाकडून शक्य तेवढे ज्ञान पदरात पाडून घे. तेव्हा लक्ष्मण डोक्याजवळ जाऊन उभा राहतो. मात्र, राम त्याला सांगतात की, ज्ञान मिळवताना याचकाप्रमाणे मिळवावे. समोरच्याकडे माहितीरुपी ज्ञानाची याचना करावी. तेव्हा लक्ष्मण रावणाच्या चरणाशी जातो आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेतो. यावरून श्रीरामाचे मोठेपण आणि लक्ष्मणालाही ज्ञानप्राप्ती व्हावी, याची तळमळ दिसून येते. श्रीराम कधीच रावणाला कमी लेखत नाहीत. उलट रावणाकडे असलेल्या प्रचंड बुद्धिमत्तेचा, ज्ञानाचा आणि शक्तीचा आदरच करतात. लक्ष्मणालाही तसाच आदर करायला सांगतात. 

लक्ष्मणापेक्षा काकणभर जास्त प्रेम हे रामाचे भरतावर असते. अनेक प्रसंगांतून ते प्रेम अधोरेखित होते. भरत हा असा भाऊ आहे, ज्याचा काहीच दोष नसताना रामाला वनवास मिळाल्यानंतर तो स्वतःला दोषी मानतो. भरताची या सगळ्यात काहीच चूक नसते. त्याला माहितीही नसते की, आपण अयोध्येत नसताना नेमके काय घडले, कसे घडले. परंतु, त्याला सर्व समजते, तेव्हा अधिक अतिशय दुःखी होतो. आपणच चूक केली, आपणच दोषी आहोत, या भावनेमुळे रामांना सामोरे जाण्यासाठी भरत तयार नसतो. मात्र, अखेर गुरुजनांनी समजूत घातल्यानंतर भरत मोठ्या जड अंतःकरणाने श्रीरामांना सामोरा जातो. 

काही झाले तरी रामांना परत आणायचे, असे ठरवून भरत सर्व कुटुंबाला घेऊन निघतो. यावेळी सीतेचे वडील जनकराजा यांनाही सोबत घेतो. सीतेच्या बहिणीही सोबत जातात. कुमार विश्वास ‘अपने अपने राम’ ही रामकथा निरुपण करताना एक सुंदर गोष्ट सांगतात. यावरून रामाचे भरतावर असलेल्या प्रेमाची सुंदर प्रचिती येते. श्रीराम वनदेवीचे आवाहन करतात. वनदेवीला म्हणतात की, ज्या मार्गावरून मी आलो, त्याच मार्गावरून माझा धाकटा भाऊ भरत येणार आहे. त्यामुळे त्या मार्गावरील सर्व काटे तू दूर कर. मी येताना मला काटे लागले, ते मी सहन केले. मात्र, भरताला ते काटे लागता कामा नयेत. त्या मार्गावरील मातीही अधिक मृदू होऊ दे. जेणेकरून भरताला कोणताही त्रास होणार नाही. यावर वनदेवी रामाला विचारते की, तुमचा भाऊ इतका नाजूक आहे का? यावर राम वनदेवीला सांगतात की, भरताएवढा निश्चयी, सामर्थ्यवान कुणी नाही. पण जेव्हा त्याला कळेल की, याच मार्गावरून राम पुढे गेलेत आणि त्या मार्गावर काटे आहेत, रस्ता खडतर आहे, जमीन कठोर आहे, तेव्हा या अशा रस्त्यावरून जाताना रामाला किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील, किती यातना झाल्या असतील, अशा विचार मनात आणून तो अधिक दुःखी होईल, स्वतःला आणखी दोष देत राहील.

सर्व कुटुंब जेव्हा येते, तेव्हा श्रीराम पहिली भेट कैकयी मातेची घेतात. यामध्ये दोन उद्देश असतात. एक म्हणजे वनवासात पाठवल्यामुळे अयोध्यावासी आणि भरत कधीही कैकयीला मान देणार नाही, बोल लावत राहतील, ही गोष्ट रामाला ठाऊक असते. त्यामुळे कैकयी मातेची प्रतिमा मलिन राहू नये, तिचा दुस्वास केला जाऊ नये, यासाठी राम त्या रात्री भरताला उत्तम प्रकारे समजवतात. कैकयीला आईचा आणि राजमातेचा जो मान-सन्मान, आदर मिळायला हवा, तो कधीही कमी होता कामा नये, अशी अनुज्ञा भरताला देतात. राम कैकयीचा कधीही तिरस्कार करत नाही किंवा भरतासमोरही कैकयीबाबत अपशब्द उच्चारत नाही. उलट भरताला मनातील राग काढून टाकायला सांगतात. भरताचेही मोठेपण असे की, श्रीरामांच्या पादुका राजगादीवर ठेवून भरत १४ वर्षे रामराज्य सांभाळतो. स्वतः नंदीग्रामात राहून एखाद्या वनवासी मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतो आणि राज्यकारभार सांभाळतो. विशेष म्हणजे राम अयोध्येत नसताना रामराज्याला एक साधा डाग लागेल, असे कधीही भरत करत नाही. येथे भरताचे कौशल्य, व्यवस्थापन आणि उत्तम प्रशासक अशीच प्रतिमा अधिक अधोरेखित होते. पुढे राम वनवासातून परतल्यावर त्याला त्याचे राज्य मोठ्या आनंदाने परत करतो आणि रामासोबत कायम राहतो.

शत्रुघ्नाविषयी अधिक गोष्टी कथन केल्या जात नाही. पण लक्ष्मण जसा रामाला साथ देतो. अगदी तसेच शत्रुघ्न हा भरताला कायम साथ देतो. शत्रुघ्न राजदरबार, राजमाता आणि घरातील व्यवस्था तसेच व्यवस्थापन अतिशय उत्तमपणे सांभाळतो, असे सांगितले जाते. इथे सर्वाधिक जास्त कौतुक हे सीतेच्या बहिणींचे करावे लागेल. सीता, मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला या चार बहिणी. कारण सर्व भाऊ रामाला जसे आदर्श मानतात, त्याच्या शब्दाबाहेर जात नाही, प्रेम करतात. अगदी त्याच पद्धतीने सीतेच्या बहिणी या सीतेला आदर्श मानत असतात. सीतेच्या शब्दाबाहेर जात नाहीत. सीता सांगेल ते आणि तसेच करतात. सीतेवर त्यांचा सर्वाधिक आणि मनापासून प्रेम असते. सीतेच्या अनुपस्थितीत मांडवी, श्रुतकीर्ती आणि उर्मिला सासरच्या मंडळींची आद्य कर्तव्याने सेवा करतात, काळजी घेतात.

उर्मिला सीतेची धाकटी बहीण आणि लक्ष्मणाची पत्नी. पुराणातील महान स्रियांमध्ये उर्मिलाची गणना केली जाते. सर्वश्रेष्ठ पतिव्रतांमध्येही उर्मिलाचा समावेश होतो. लक्ष्मणाने १४ वर्षांचा वनवास न झोपता व्यतित केला, असे म्हटले जाते. मात्र, ही गोष्ट उर्मिलामुळे शक्य झाली. कारण ती रात्री स्वतःसाठी व दिवसा लक्ष्मणासाठी झोप घ्यायची, असे सांगतात. उर्मिला या अतुलनीय त्यागासाठी प्रसिद्ध आहे. एका प्रसंगात लक्ष्मण उर्मिलेवर खूप रागावतो, तेव्हा सीता म्हणते की, उर्मिलाच्या त्यागाची बरोबरी १०० सीताही करू शकणार नाहीत. एका पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की, १४ वर्षांच्या वनवासात लक्ष्मण आपल्या श्रीराम आणि सीतामाईच्या रक्षणासाठी कधीही झोपला नाही. वनवासाच्या पहिल्या रात्री राम आणि सीता झोपले होते. तेव्हा लक्ष्मणाने निद्रा देवीचे आवाहन केले. निद्रा देवी प्रकट झाली. लक्ष्मणाने असा आशीर्वाद मागितला, जेणेकरून त्याला कधीही झोप येऊ नये. यावर निद्रा देवीने त्याला विचारले की, त्याच्या ऐवजी दुसरे कोणी झोपू शकेल का? लक्ष्मणाने त्याची पत्नी उर्मिला हे काम करू शकते, असे सांगितले. हे ऐकल्यानंतर निद्रा देवी उर्मिलाकडे जाऊन याबाबत विचारले. उर्मिलाही कोणतेही आढेवेढे न घेता आनंदाने ती गोष्ट स्वीकारते. उर्मिलाने केलेल्या या त्यागामुळे पुढे लक्ष्मणाला रावणपुत्र इंद्रजित याचा वध करणे शक्य होते. कारण, रावणपुत्र मेघनाथाला ब्रह्मदेवांकडून विशेष वरदान प्राप्त झालेले असते,  अशी एक कथा सांगतात. यावरून रामकार्यासाठी घरच्यांनीही किती त्रास भोगला, कष्ट सोसले, कोणतीही शंका-कुशंका मनात न आणता केवळ आपले कर्तव्य करत राहिले, ही दिव्यत्वाची प्रचिती येऊन आपोआप कर जुळतात आणि नतमस्तक व्हायला होते.

॥श्रीराम जय राम जय जय राम॥

- देवेश फडके.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीspiritualअध्यात्मिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीramayanरामायण