जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:39 IST2025-08-26T15:32:40+5:302025-08-26T15:39:55+5:30

Shreepad Shree Vallabh Jayanti 2025 Charitramrut Parayan: गणेश चतुर्थीच्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते. यानिमित्ताने शक्य झाल्यास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे अवश्य पठण करावे, असे सांगितले जाते.

shripad shri vallabh jayanti 2025 should recite shripad shrivallabh charitramrut and get virtue lifetime | जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा

जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा

Shreepad Shree Vallabh Jayanti 2025 Charitramrut Parayan: कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन:। द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ:॥ भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभ या अवताराचे कार्य केवळ ३० वर्षांचे आहे. परंतु, या काळात केलेल्या लीला, लोकोद्धार आणि समाजभान टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य झालेले पाहायला मिळते. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीला झाला. यंदा बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा प्रकट दिन आहे. 

पीठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला झाला. तर, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतारकार्याची सांगता केली. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्राचे सार आलेला अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. श्रीपाद श्रीवल्लभ जयंती निमित्ताने चरित्रामृत पारायण करणे अतिशय पुण्य फलदायी मानले गेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात पारायण पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे. याचे यथोचित पालन करून, संकल्प करून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करावे, असे सांगितले जाते.

गुरुचरित्राप्रमाणे फळ देणारा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ

गुरुचरित्राप्रमाणे फळ देणारा ग्रंथ म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे पाहिले जाते. श्रीपाद स्वामींच्या चरित्रातील फार थोडा भाग श्रीगुरुचरित्रात आला आहे. पण, त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांचे समकालीन असलेले श्री शंकर भट्ट यांनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिले. तेव्हाच त्याचे तेलगु भाषांतर झाले होते. पण, हा ग्रंथ श्रीपाद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे आजोबा श्री बापन्नाचार्युलु यांच्या ३३ व्या पिढीत उदयास आला. त्यानंतर हा ग्रंथ अन्य अनेक भाषांमध्ये उपलब्ध झाला. प.पू. हरिभाऊ जोशी निटुरकर हे दत्तसंप्रदायिक सत्पुरूष आहेत. त्यांना श्रीगुरूंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मराठी भाषेत भाषांतरीत केले. 

ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य

श्रीपाद प्रभूंनी या ग्रंथात सांगितले की, जो अनन्यभावाने शरण आला व श्री गुरु शरणम्... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... या नावाने स्वामींना अंतर्मनाने हाक मारेल, त्याचे स्वामी रक्षण करतील. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे. तेथून भक्तांना शुभ स्पंदनांची प्राप्ती होते. त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. कणाद महर्षींच्या कणसिद्धांत, सूक्ष्म परमाणुंमध्ये परिवर्तन होऊन सृष्टीची निर्मिती, ब्रह्मांड कसे तयार झाले, याबाबतचा खगोलशास्त्रीय विचार या ग्रंथात सविस्तर आल्याचे म्हटले जाते.

शनि प्रदोष महात्म्य, शिव महात्म्य, नवनाथ महात्म्य

भगवान दत्तात्रेयांना अत्यंत प्रिय असलेले औदुंबर वृक्षाचे महत्त्व तसेच अत्यंत पवित्र सर्व शक्ती संपन्न असलेल्या गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सामर्थ्य यांची माहिती हा ग्रंथ देतो. मुमुक्षु साधकांसाठी हा ग्रंथ अमूल्य ठेवा आहे. सायुज्य, सालोक्य, सामीप्य, स्वारुप्य ह्या मुक्तींची माहिती, साधक व अवतारी पुरुष, सद्गुरु यांच्यातील भेद तसेच साधकांच्या सात अवस्था यांचे वर्णन या ग्रंथात असल्याचे सांगितले जाते. दत्ततत्त्वात शिवतत्त्व कसे सामावले आहे, शिवभक्तांना शिवमहिमा, रुद्राक्ष महिमा तसे शिवपूजा कशी करावी, त्याचे महत्त्व व अर्थ व फायदे, शनि प्रदोष महात्म या ग्रंथात आले आहे. यात शिव महात्म्य, नवनाथ महात्म्य, दशमहाविद्या याबाबत विस्तृत माहिती आहे. अनेक शक्ती देवता व शक्तीपीठे यांचेही वर्णन आहे. 

सिद्धमंगल स्तोत्र, श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत, ज्ञानाने परिपूर्ण ग्रंथ

या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची, समाधानाची प्राप्ती होते एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असूनसुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाटत नाही. हा ग्रंथ कोणीही कोठेही व केव्हाही वाचू शकतो. ह्याच्या वाचनाला स्त्री-पुरुष असा भेद नाही. आंतरिक व बाह्य शुचिता पळून या ग्रंथाचे पठण केले तरी चालते. जेथे या ग्रंथाचे पारायण व श्री दत्तात्रयांचे नामस्मरण होत राहील तेथे हे श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने नेहमी वास्तव्य करतात, अशी मान्यता आहे. या ग्रंथात त्यांनी भक्तांना दिलेली बारा अभय वचने आहेत. सिद्धमंगल स्तोत्र तसेच श्रीदत्त अनघालक्ष्मी व्रत याबाबतही माहिती आलेली आहे.

पीठापूर, कुरवपूर येथील श्रीपाद स्वामींच्या लीलांचे अद्भूत वर्णन 

पीठापूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभूमी तर, कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभूमी मानली जाते. आपल्या अवतारकार्यात श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक लीला केल्याचे सांगितले जाते. याच सर्व लीलांचे अद्भूत वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात आढळते. श्रीशंकर भट्ट यांनी लिहिलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगु भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला, अशी मान्यता आहे. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभुना वाचून दाखविला. ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले.

श्रीपाद श्रीवल्लभ चारितामृत पारायण फलश्रुती

एका व्यक्तीच्या जन्म पत्रिकेप्रमाणे २७ नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त 'मंडल' दीक्षा घेतात. एका 'मंडला'मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडत असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या चाळीस दिशांमध्ये  प्रसरण पावतात. या चाळीस दिशामधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बद्ल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्या नंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण  होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आशिर्वचन

माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. कायावाचामनेन मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.

॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥

॥ श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: shripad shri vallabh jayanti 2025 should recite shripad shrivallabh charitramrut and get virtue lifetime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.