Shree Swami Samarth Prakat Din 2026: कोट्यवधी भाविक दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परिने स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीचा दिवस. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल, तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु, सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येते असे नाही. स्वामींचे महात्म्य वर्णन करणारी अनेक स्तोत्रे, मंत्र, ग्रंथ आहेत. यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरूलीलामृत या ग्रंथांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने या दोन ग्रंथांपैकी एका ग्रंथांचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे, असे सांगितले जाते. सविस्तर जाणून घेऊया...
शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात. पारायण करायची इच्छा असेल, तर सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार संकल्प बद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल, तर शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सुरू करावे लागेल, म्हणजे शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी स्वामींच्या प्रकट दिनी सांगता होऊ शकेल.
श्री स्वामी चरित्र सारामृत सप्ताह पारायण पद्धती
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण कुणीही करू शकते. या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पारायण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा.
गुरुलीलामृत पारायणाची योग्य पद्धत
श्रीगुरुलीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरुलीलामृताचे पारायण करावे. श्रीगुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. गुरुलीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. गुरुलीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप, दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे.
दररोजचे पारायण झाल्यावर काय करावे?
या दोन्ही पैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल, त्याचे दररोजचे वाचन झाल्यावर पोथीला मनोभावे नमस्कार करावा. वाचताना काही चुका होऊ शकतात. त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. सात दिवस अखंड दीप तेवत ठेवावा.
सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य करावा
स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरूलीलामृत सप्ताह सुरू करताना सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून करावा.
- पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे.
- वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे.
- शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचन करावे.
- पारायण काळात सदाचाराने राहावे.
- वादविवाद, भांडण, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे.
- स्वामींच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन चिंतन करावे.
- स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : Devotees can observe Shree Swami Samarth Prakat Din on March 20, 2026, by parayan of Swami Charitra Saramrut or Gurulilamrut. Start the week-long reading on March 14, 2026, following prescribed rituals with faith and devotion for fulfillment.
Web Summary : भक्त 20 मार्च, 2026 को श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, स्वामी चरित्र सारामृत या गुरुलीलामृत के परायण द्वारा मना सकते हैं। मनोकामना पूर्ति के लिए 14 मार्च, 2026 से निर्धारित अनुष्ठानों का पालन करते हुए सप्ताह भर का पाठ शुरू करें।