Shree Swami Samarth Maharaj Maha Parvani 2026: याहो सर्व तुम्ही, होऊनि सावचित्त। नाचू आनंदात, एकमेळी।। स्वामीसुत म्हणे उत्साहासि यावे। सर्व तुम्ही भावे, समर्थांच्या।। भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले. त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसुत. स्वामीसुत महाराजांनी गिरगाव मुंबईतील मठात एक मोठा उत्सव सुरू केला. यालाच स्वामी समर्थ महाराज महापर्वणी उत्सव म्हटले जाते.
आज सर्वत्र श्रीस्वामी महाराजांचा प्रकट दिन माहिती आहे. परंतु श्रीस्वामीसुतानी श्रींच्या या प्रकट दिन सोहळ्याची नांदी, श्रीस्वामी महापर्वणी उत्सव फारसा प्रचलित नाही. श्री ठाकूरदास बुवा स्थापित श्रीस्वामी समर्थ मठ, ठाकूरद्वार नाका, गिरगांव, मुंबई येथे हा उत्सव साजरा होतो. सन १८७० साली श्रीस्वामीसुतानी सर्वप्रथम श्री स्वामींचा प्रकट दिन साजरा केला. त्याअगोदर बरोबर एक महिना श्री स्वामी प्रकट दिन उत्सवाची स्वामीसुतांनी नांदी केली. फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच 'श्रीस्वामी महापर्वणी' होय. यंदा, गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हा दिवस येत आहे.
स्वामीसुतांनी सुरू केलेली अखंडित दिव्य परंपरा
'श्रीस्वामी महापर्वणी'च्या दिवशी भल्या पहाटे श्रीस्वामीसुत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडपचार पूजन करून समुद्रस्नानाकरिता गिरगांव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत. पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्रीस्वामी महाराजांना साजेसा असत. मिरवणुकीची वाट सेवेकरी कुंचल्याने झाडत. इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत. पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात. या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी गुढी व श्रीस्वामी महाराजांचे भव्य निशाण मिरवले जात. यामागे तेजरूपी अश्व (पांढरा शुभ्र घोडा), पाच नद्यांच्या पाण्याचे जलकुंभ डोक्यावर घेऊन महिला, आरत्या घेऊन महिला मंडळ आणि श्रींचा सुबक सजवलेला छबिना. हा थाट, जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे.
श्रीस्वामी नामाचा जल्लोष अन् स्वामीमय वातावरण
फुलांचा सडा, अत्तरांचा फवारे आणि श्रीस्वामी नामाचा जल्लोष. वातावरण कसे अगदी स्वामीमय होत. या मिरवणुकीत श्रीस्वामीसुत महाराज अभंग गाण्यात मग्न असत. अशा थाटात हा लवाजमा चौपाटीवर सागरतीर्थाकडे जात. येथे स्वतः श्रीस्वामीसुत महाराज समस्त श्रीभक्तजनांसह छबिण्यातील पादुका घेऊन श्रीस्वामी नामाच्या जयघोषात सागरतीर्थात प्रवेश करीत. शास्त्रोक्त समुद्रस्नान सोहळा संपन्न होत. नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत. गोड पोह्यांचा नैवेद्य अर्पण होत. मग आरती आणि पुन्हा श्रीस्वामीसुतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष. छबिण्याभोवती श्रीस्वामी नामाचा फेर धरला जात. श्रीस्वामीसुत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत. अशाच प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखीचा लवाजमा त्याच थाटात मठाकडे येण्यास माघारी फिरत. त्यानंतर श्रीस्वामीसुत महाराज श्रींना नैवेद्य अर्पण करीत. भक्तजनांना स्वतः मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढीत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओंजळी प्रसादाने भरीत.
एक महिना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव
या श्रीस्वामी महापर्वणीपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यास प्रारंभ होत. चैत्र शुद्ध द्वितीयेपर्यंत पूर्ण एक महिना कांदेवाडीच्या श्रीस्वामी मठात श्रीस्वामीसुत महाराज धुमधडाक्यात श्रींचा उत्सव साजरा करीत. श्रीस्वामीसुतांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी प्रस्थापित केलेला हा सोहळा त्याच थाटात साजरा होणे, ही मायमाऊली श्रीस्वामी महाराजांचीच कृपा असल्याचे म्हटले जाते. फाल्गुन शुद्ध द्वितीयेस श्रीस्वामी महापर्वणी उत्साहात साजरी होते. यंदा हा दिवस गुरुवारी आला आहे. गुरुवार हा स्वामीसेवा, स्वामी उपासना, स्वामी आराधना यासाठी सर्वोत्तम मानला जातो. हजारो भाविक या दिवशी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. १९ फेब्रुवारी २०२६ च्या गुरुवारी महापर्वणी निमित्ताने गिरगाव येथील स्वामींच्या मठात जाऊन अवश्य दर्शन घ्यावे, असे म्हटले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : The Shree Swami Samarth Maharaj Maha Parvani, initiated by Swami Sut, commemorates Swami Maharaj's divine presence. Celebrated at Girgaon's Thakurdas Math, the festival begins with a procession and sea bath, marking the start of a month-long celebration filled with devotion and joyous festivities. This year, it falls on Thursday, February 19, 2026.
Web Summary : श्री स्वामी समर्थ महाराज महा पर्वणी, स्वामी सुत द्वारा शुरू की गई, स्वामी महाराज की दिव्य उपस्थिति का स्मरण कराती है। गिरगाँव के ठाकुरदास मठ में मनाया जाने वाला यह उत्सव एक जुलूस और समुद्र स्नान के साथ शुरू होता है, जो भक्ति और आनंदमय उत्सवों से भरे एक महीने के उत्सव की शुरुआत का प्रतीक है। इस वर्ष, यह गुरुवार, 19 फरवरी, 2026 को है।