Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:47 AM2023-07-04T11:47:14+5:302023-07-04T12:24:53+5:30

Sola Somwar Vrat 2023: महादेवाचे मफलदायी व्रत अशी सोळा सोमवार व्रताची ख्याती आहे, ज्यांना हे व्रत करायचे आहे त्यांनी आवर्जून वाचावी अशी संपूर्ण माहिती!

Shravan Somwar vrat 2023: Do you want to start the auspicious sixteen Monday fast? know when to start on adhik Shravan or Nij Shravan! | Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

googlenewsNext

सोळा सोमवार हा तसे म्हटले तर कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यापैकी कुणीही ते करू शकतात. हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यापैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ करतात आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करतात. 

सुरुवात कधी करावी? अधिक की निज श्रावणात?

सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. तर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत असून, निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. म्हणजेच अधिक आणि निज असे दोन महिने धरल्यास श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल, असे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता, अधिक मास असणार्‍या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्ये होणार नाहीत. सर्व धार्मिक व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील. मात्र, शिवशंकर महादेवांची आराधना, उपासना, नामस्मरण अधिक श्रावण महिन्यात केले जाऊ शकेल, असे सांगितले जाते. (Sawan 2023 Dates) त्यामुळे सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणात सुरू न करता निज श्रावण किंवा मुख्य श्रावणात म्हणजेच १७ ऑगस्टपासूनचे १६ सोमवार करावे. मात्र ज्यांनी यापूर्वीच व्रत सुरु केले असून अधिक मासात ज्यांच्या व्रताची पूर्तता होणार आहे त्यांनी त्या काळात उद्यापन करण्यास हरकत नाही. मात्र सुरुवात करायची असल्यास मुख्य श्रावणातच करावी!

शारीरिक किंवा प्रासंगिक अडचणी आल्यास?

व्रत अंगीकारणे सोपे नसते, ते पूर्ण करताना अनेक अडचणी, आव्हाने येतात. चुकून एखाद्या सोमवारी उपास तुटला तर नव्याने सोळा सोमवार व्रत सुरू करावे लागते, तेही दिलेल्या ठराविक महिन्यांमध्येच! मात्र त्याचप्रमाणे १६ सोमवारचे व्रत करतानाही एखाद्या सोमवारी महिलांना मासिक धर्म आल्यास किंवा तिसरा, चौथा दिवस असल्यास पूर्ण शरीर शुद्धी होईपर्यंत तो सोमवार व्रतामध्ये धरू नये. त्या दिवशी महादेवाच्या नावे उपास करावा, मनोमन उपासना करावी, मात्र तो सोमवार वगळून पुढचे सोमवार व्रत सुरू ठेवून १६ सोमवारचा टप्पा पूर्ण करावा आणि मगच उद्यापन करावे. 

सोळा सोमवार पूजा विधी व नैवेद्य : 

या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून शंकराची षोडशोपचाराने पूजा करतात. मग अळणी पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा रोटल्याचा नैवेद्य अर्पण करतात. नैवेद्यापूर्वी त्याचे तीन भाग करायचे असतात. एका भागाचा नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्याने सेवन करायचा अशी प्रथा आहे.

सतराव्या सोमवारी एखाद्या शिवालयात जाऊन व्रत करणाराने तिथे महापूजा करायची असते. त्यामद्ये सुवर्णचंपक, बेल, कमळ, बकुळ आणि पन्नग ही फुले आवश्यक असतात. यासाठी जो प्रसाद करावयाचा असतो त्यात पाच शेर कणीक, सव्वाशेर तूप आणि सव्वाशेर गूळ यांचे रोट करून ते गोवऱ्यांवर भाजतात. त्यातील एक भाग शिवालयातील शिवापुढे ठेवतात. एक भाग सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात आणि उरलेला तिसरा भाग आप्तेष्टांना भोजनप्रसंगी वाटतात, या वेळी सोळा ब्राह्मण मेहुणांनाही भोजन प्रसादास बोलवायचे असते. इष्टकामनापूर्ती व्हावी यासाठी हे व्रत करण्यात येत असते.

सोळा सोमवार व्रताची कथा :

विदर्भातील अमरावती नगरीच्या नजीक एक वन होते. तेथे एक शिवालय होते. बागबगीचा, तळे असा त्याचा सुंदर आसमंत होता. एकदा शिव पार्वती तेथून जात असतात त्यांना ते शिवालय पाहून आनंद वाटला व तेथे ते द्यूत खेळले. तयातील `पण' कुणी जिंकला असा वाद त्यांच्यात सुरू झाला. तेथे असलेल्या देवल नावाच्या शिवगणाला पार्वतीने त्याचा निर्णय देण्यास सांगितले. त्याने शिवाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पार्वती संतापली आणि तिने शाप दिला. त्यामुळे तो रोगी झाला.

पुढे एकदा शिवालयात आलेल्या इतर अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचे व्रत करण्यास सांगितले. देवलाने ते केले. त्यामुळे तो रोगमुक्त झाला.नंतर शिव पार्वती परत तेथे एकदा आले. देवल संपूर्ण बरा झाला असल्याचे पाहून पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने त्याला काय उपचार केला, असे विचारले तेव्हा त्याने केलेल्या सोळा सोमवार व्रताची हकीगत तिला सांगितली.

पुढे एकदा पार्वतीवर रागावून तिचा मुलगा षडानन निघून गेला. खूप शोध केला तरी तो सापडेना. तेव्हा पार्वतीने सोळा सोमवारचे व्रत केले. षडानन तिला येऊन भेटला. सोळा सोमवार व्रताच्या अशा आणखीन काही कथा आहेत. 

असे हे व्रत रोगातून, पापातून मुक्ती देणारे आहे, तसेच अनेक जण इच्छित मनोकामना पूर्ती होण्यासाठीदेखील हे व्रत करतात. तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला लागा... 

Web Title: Shravan Somwar vrat 2023: Do you want to start the auspicious sixteen Monday fast? know when to start on adhik Shravan or Nij Shravan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.