Shravan Sankashti Chaturthi Angarak Yog 2025: मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. श्रावण पौर्णिमेनंतर संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे वैशिष्ट्य म्हणजे ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली असून, अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. श्रावण संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. बाळकृष्णासाठी यशोदामातेनेही या संकष्ट चतुर्थीचे व्रत केले होते, अशी मान्यता आहे. श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अन् काही मान्यता जाणून घेऊया...
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
श्रावण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की, सर्वांनाच वेध लागतात ते लाडक्या गणरायाच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या अगदी काही दिवस आधी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत येते. त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनन्य साधारण मानले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५
अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ४० मिनिटे.
संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त: बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे. यंदा २०२५ च्या श्रावण संकष्ट चतुर्थीचे विशेष म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्गल पुराणात एक कथा सांगितली जाते.
यशोदामातेने श्रीकृष्णासाठी केले होते संकष्ट चतुर्थीचे व्रत
हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते, असा भाविकांचा अनुभव असल्याचे म्हटले जाते. या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. आपली इच्छा देवासमोर प्रगट करावी. इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही, असे सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते.
मुलांचे कष्ट होतात दूर, लाभते दीर्घायुष्य
या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥