दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:18 IST2025-10-17T11:14:03+5:302025-10-17T11:18:12+5:30
Diwali 2025 Shani Pradosh Vrat: दिवाळीत धनत्रयोदशीला शनि प्रदोष आहे. महादेवांसह शनि कृपा लाभावी म्हणून या दिवशी नेमके काय करावे, ते जाणून घ्या...

दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
Diwali 2025 Shani Pradosh Vrat: दिवाळीला सुरुवात होत आहे. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्त्व वेगळे आहे. आनंदाचा, सुख-समृद्धीचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, असे सांगितले जाते. याच दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी शनि प्रदोष व्रताचा उत्तम योग जुळून आला आहे. जाणून घेऊया...
दिवाळी हा समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. यंदा दिवाळीला विविध शुभ योग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ ते गुरुवार, २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दिवाळी आहे. शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी शनि प्रदोष असून, यमदीपदान केले जाणार आहे. याच दिवशी गुरुद्वादशी आहे. आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. तसेच धन्वंतरीचे पूजनही केले जाते. याच दिवशी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी शनि प्रदोष व्रत आचरले जात आहे.
शनि प्रदोष व्रत म्हणजे काय?
शनिप्रदोष व्रतात शनीदेव आणि महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात.
शनिप्रदोष व्रताचे महात्म्य
शिव पुराणानुसार, मनापासून श्रद्धेने प्रदोष व्रत केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात. भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. शनिदेवाला न्यायाचा देव मानले जाते, त्यामुळे यांचा आशीर्वाद मिळवणे आवश्यक आहे. शनि प्रदोष व्रताने शनि देवाची कृपा मिळते आणि जीवनातील सर्व अशुभ प्रभाव, शनि दोष, साडेसाती, ढैय्या, आणि कालसर्प दोष कमी होतात. जीवनात संकटे, आर्थिक समस्यांचा नाश होतो. सुख, आरोग्य, शांती व समृद्धी प्राप्तीसाठी शनि प्रदोष व्रत अत्यंत लाभदायक मानले जाते. शनि देव महादेवांना आपले गुरु मानतात, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांचे पूजन करणे विशेष लाभदायी मानले गेले आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशीही मान्यता आहे.
शनि प्रदोष व्रत कसे करावे?
सकाळी स्वच्छ स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा. व्रताचा संकल्प करून 'सांब सदाशिव' आणि 'शनैश्चराय नमः' या मंत्रांचा जितका जमेल तितका जप करा. कमीत कमी १०८ वेळा जरूर करावा. शिवलिंगावर जल, पंचामृत, बेलपत्र, धतुरा, चंदन लेपन, आणि फुले अर्पण करा. शनिदेवाला काळे तीळ, काळे वस्त्र आणि काली उडीद डाळ अर्पण करा. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा. अशा पद्धतीने शिव आणि शनि देवाचे पूजन करावे. यासह रुद्राष्टकम, शिव चालिसा, शिव मानस पूजा, शिवमहिम्न स्तोत्र म्हणावे. प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. प्रदोष काळातही शिवपूजन करावे. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते.
शिव मंत्रांचा जप करा
प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
शनिच्या कोणत्या मंत्रांचे जप करावे?
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात्॥, हा शनीचा गायत्री मंत्र आहे. ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥