Shani Pradosh 2025: नवीन वर्षातले पहिले प्रदोष व्रत, संसार सुखासाठी 'असे' करा व्रताचरण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:27 IST2025-01-10T15:26:33+5:302025-01-10T15:27:20+5:30
Shani Pradosh 2025: वैवाहिक अडचणी दूर करण्यासाठी आणि संसार सुखाच्या प्राप्तीसाठी प्रदोष व्रत सुचवले जाते, ११ जानेवारी रोजी हे व्रत करण्यासाठी विधी जाणून घ्या.

Shani Pradosh 2025: नवीन वर्षातले पहिले प्रदोष व्रत, संसार सुखासाठी 'असे' करा व्रताचरण!
११ जानेवारी रोजी रोजी शनी प्रदोष (Shani Pradosh 2025) आहे. या योगावर शनी व शिव उपासना केली जाते. प्रदोष दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येते. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शनिवारी येत आहे. म्हणून शनी देवाचे दर्शन, जप, दान धर्म अशा पद्धतीने उपासना करावी. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते. केवळ फळे, फुले, धूप-दीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात, असे शास्त्रात सांगितले आहे.
प्रदोषाच्या वेळेस भगवान शंकराची पूजा करा असे शास्त्राचे सांगणे असले तरी या पूजेने शनी देवदेखील प्रसन्न होतात. असा हा शनी प्रदोषाचा मुहूर्त चुकवू नका आणि शनी देवाची तसेच महादेवाची कृपादृष्टी प्राप्त करा.
प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. हा प्रदोष काळ ज्या वारी येतो त्या नावे ओळखला जातो.
प्रदोषकाळ:
प्रदोष काळ अर्थात सायंकाळचा संधिप्रकाश काळ. सूर्यास्त झाल्यानंतरचा साधारण अर्धा तास प्रदोष काळ मानला जातो. त्या काळात प्रदोष व्रत करायचे असते. ते कसे करायचे तेही जाणून घेऊ-
प्रदोष व्रताचा विधी:
प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. उत्तरायण मकर संक्रांति नंतर सुरु होते. आताचा काळ हा उत्तरायणाचा काळ आहे. त्यामुळे प्रदोष व्रत सुरु करण्यास हरकत नाही. आजचे प्रदोष व्रत शनिवारी आले असल्याने हे शनी प्रदोष म्हटले जाईल. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा.
प्रदोषव्रताचे लाभ :
प्रदोषव्रताचा अधिकार सर्व जातिधर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्रीपुरुषांना आहे. विशेषत: संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोषव्रत करावे. जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे व्रत केले जाते, तितके त्याचे अधिकाधिक फळ मिळते.