२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 16:35 IST2025-05-20T16:31:32+5:302025-05-20T16:35:21+5:30
Shani Jayanti 2025: शनी जयंती नेमके काय करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल? जाणून घ्या...

२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
Shani Jayanti 2025: हिंदू नववर्ष सुरू झाले असून, वर्षभर अनेकविध पद्धतीचे सण-उत्सव साजरे केले जातात. अनेक प्रकारची व्रत-वैकल्ये केली जातात. मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून, लवकरच या महिन्याची सांगता होत आहे. वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते. २०२५ मध्ये शनी जयंती कधी आहे? या दिवशी नेमके काय करावे? शनैश्चर जयंतीचे महात्म्य, महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...
वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. शनी हा नवग्रहांपैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानला जातो. यंदा २०२५ मध्ये सोमवार, २६ मे रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे. शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही, असे सांगितले जाते.
शनी जयंतीच्या दिवशी काय करावे?
शनैश्चर जयंतीला आवर्जून शनि मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. या वेळेस शनी महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि जयंतीला शनिदेवाशी संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल यांचे दान करावे. या दिवशी शनिदेवासह हनुमानाचे पूजन, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. शनी मंत्राचा जप करावा. शनैश्चर स्तोत्र, शनी चालीसा यांचे पठण करावे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. शनि न्यायाधीश आहे. शनि साडेसाती आणि शनि महादशा असणाऱ्या व्यक्तींनी शनैश्चय जयंतीचा सुवर्ण योग सोडू नये. ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनि सेवा करावी. या दिवशी शनि उपासना, नामस्मरण, आराधना, जपजाप करावेत. यामुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. याशिवाय शनी जयंती दिनी महादेव शिवशंकर, हनुमान, श्रीकृष्ण यांचे केलेले पूजन, नामस्मरण शनि प्रभावापासून दूर ठेवण्यास सहाय्यभूत होते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.