७ जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र (Shakambhari Navratri 2025) सुरू झाली असून १३ जानेवारी रोजी शाकंभरी तथा पौष पौर्णिमेला (Shakambhari Purnima 2025) या नवरात्रिची सांगता होईल. या कालावधीत भरपूर भाज्या, फळं, फुलं देणार्या देवीची उपासना तर आपण करणारच आहोत, शिवाय देवीच्या विविध रुपांचीहि पुजा करणार आहोत. त्यातलेच एक रूप म्हणजे अन्नपुर्णेचे! देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्न, धान्य, भाजी, पाला याची उणीव कधीच भासणार नाही. त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरुपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. कारण 'अशक्यही शक्य करतील स्वामी' हे स्वामींनी दिलेले ब्रीद आहे! चला तर पाहूया, स्वामी समर्थांनी(Swami Samartha) शनि रूप का धारण केले त्यामागची कथा!
अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप झाले.
कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले.
तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती. पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस आग्रह केला पण ती म्हणाली, ' तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.'
श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. ती वृद्ध स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही. यावरून श्रीपाद भटांना खात्री पटली, की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले! म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पुजले जाते.
यासाठीच स्वामींच्या चरणी अनन्य भावनेने शरण जावे, जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील, हे नक्की!