हर क्षेत्रात उच्च पदापर्यंत मजल मारणाऱ्या सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष लक्षात ठेवलाच पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 08:00 IST2022-03-10T08:00:00+5:302022-03-10T08:00:03+5:30

आज आपण सगळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर व्यक्त होण्याचा हक्क बजावतो. परंतु, एक काळ असा होता, जेव्हा व्यक्त होणे तर दूरच, परंतु विचार करायचा, तर त्यासाठीही ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत असे.

Savitribai Phule's struggle must be remembered by every girl who worked on a high position in every field! | हर क्षेत्रात उच्च पदापर्यंत मजल मारणाऱ्या सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष लक्षात ठेवलाच पाहिजे!

हर क्षेत्रात उच्च पदापर्यंत मजल मारणाऱ्या सावित्रीच्या लेकींना सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष लक्षात ठेवलाच पाहिजे!

'खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!' स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी! प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांचा १० मार्च रोजी स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरित्राचा धावत आढावा घेऊ. 

आज आपण सगळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर व्यक्त होण्याचा हक्क बजावतो. परंतु, एक काळ असा होता, जेव्हा व्यक्त होणे तर दूरच, परंतु विचार करायचा, तर त्यासाठीही ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत असे. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. परकीयांची दहशतच एवढी होती, की कोणीही बंड पुकारण्याचे साहस करत नसे. अशा पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेकी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची प्रगती करत आहेत. म्हणून जयंती तसेच पुण्यतिथी निमित्त अशा थोर विभूतींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही आपली जबाबदारी आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती. 

सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवियत्री होत्या. त्यांना भारताची पहिली महिला शिक्षिका मानले जाते. पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याजवळील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. जाती व लिंगावर आधारित भेदभाव व अन्याय दूर करण्यासाठी त्या आयुष्यभर झगडल्या, महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील त्या एक महत्वाची व्यक्ती होत्या. एक समाजसेवी आणि शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले ह्या एक उत्तम मराठी लेखिका सुद्धा होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळ पासून पाच किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते, सावित्रीबाई त्यांच्या थोरल्या मुलगी होत्या. वयाच्या १०व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुले (महात्मा ज्योतिबा फुले) यांच्याशी झाले. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना स्वतःचे मुल नव्हते, म्हणून त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले. 

सावित्रीबाईंच्या लग्नापर्यंत त्यांचे शिक्षण झाले नव्हते. त्याकाळात त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. तसेच ज्योतिराव फुलेंनाही जातीच्या कारणामुळे तात्पुरते शिक्षण थांबवावे लागले होते परंतु पुढे त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत सातवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.

लग्नानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले नंतर पुढील शिक्षण त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भावलकर यांनी दिले. त्यांनी पुढे जाऊन दोन शिक्षक कोर्स चा सुद्धा अभ्यास केला. त्यामध्ये पहिली संस्था अहमदनगर येथीलअमेरिकन मिशनरी सिंथिया फरार ने चालवलेली संस्था होती आणि दुसरी पुण्यातील एक शाळा होती. त्यांच्या या प्रशिक्षणामुळे त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या.

शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सावित्रीबाईंनी पुण्यातील एका पडक्या वास्तूत मुलींना शिकवायला सुरुवात केली. या कामांमध्ये त्यांना क्रांतिकारक स्त्रीवादी सगुणाबाई यांनी मदत केली. यानंतर काही काळानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी भिडे वाडा येथे स्वतःची मुलींची शाळा सुरू केली. भिडे वाडा म्हणजेच तात्यासाहेब भिडे यांचे घर. सावित्रीबाईंच्या या शाळेच्या अभ्यासक्रमात पारंपारिक विषयांसोबत पाशात्य विषयही होते; यात गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश होता.

१८५१ मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मुलींसाठी पुण्यामध्ये तीन शाळा चालू केल्या. या तीन शाळांमध्ये अंदाजे दीडशे विद्यार्थिनी होत्या. अभ्यासक्रमाप्रमाणे या तिन्ही शाळांमध्ये शिकवण्याची पद्धती ही सरकारी शाळांपेक्षा वेगळी होती आणि यांच्या पद्धतीमुळे फुलेंच्या शाळांमध्ये सरकारी शाळांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त होती.

सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना पुराणमतवादी मत असलेल्या समुदायाकडून बराच प्रतिकार झाला. शाळेत जात असताना त्यांच्यावर दगड,शेण फेकले जायचे; तसेच त्यांना शिवीगाळही केला जायचा. १८४९ पर्यंत सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले हे ज्योतिराव यांच्या वडिलांच्या घरीच राहत होते. १८४९ मध्ये जोतीरावांच्या वडिलांनी दोघांनाही घर सोडण्यास सांगितले.

ज्योतिरावांनी घर सोडल्यानंतर ते आपले मित्र उस्मान शेख यांच्या कुटुंबासोबत राहू लागले. तिथेच सावित्रीबाईंची भेट फातिमा बेगम शेख यांच्याशी झाली. फातिमा बेगम शेख या या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या आणि त्यांना अगोदरच थोडेफार लिहिणे वाचणे येत असे. उस्मान शेख यांनी आपली बहीण फातिमाला सावित्रीबाईं सोबत शिक्षिका प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. पुढे सावित्रीबाईं सोबत त्यांनीसुद्धा पदवी मिळवली आणि त्या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका झाल्या. फातिमा आणि सावित्रीबाई यांनी शेख यांच्या घरी १८४९ मध्ये एक शाळादेखील उघडली.

१९५० च्या दशकात सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी दोन शैक्षणिक ट्रस्टची स्थापना केली. त्यांना “नेटिव्ह फीमेल स्कूल” आणि “सोसायटी फोर प्रोमोटींग एज्युकेशन ऑफ महार्स, मान्ग्स आणि एक्ससेट्रा” असे नाव देण्यात आले. या ट्रस्ट अंतर्गत पुढे सावित्रीबाई फुले आणि नंतर फातिमा शेख यांच्या नेतृत्वात अनेक शाळा उघडण्यात आल्या. आपले पती ज्योतिबा फुले यांसोबत सावित्रीबाईंनी विविध जातीतील मुलांना शिकवले त्यांनी एकूण १८ शाळा उघडल्या.

सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी बुबोनिक प्लेगने त्रस्त रोग्यांवर उपचार करण्यासाठी क्लीनिक सुरू केले. हे क्लिनिक पुण्याच्या बाहेर संक्रमण मुक्त ठिकाणी होते. पुण्यातील मुंढवा येथील महार वस्तीत प्लेगचा संसर्ग झाला होता. तेथील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या प्लेगने संक्रमित मुलाला दवाखान्यात नेताना सावित्रीबाई ही प्लेगने संक्रमित झाल्या आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि कार्याला मनापासून अभिवादन!

Web Title: Savitribai Phule's struggle must be remembered by every girl who worked on a high position in every field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.