सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:17 IST2025-09-20T16:14:46+5:302025-09-20T16:17:07+5:30

Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध केले जाते? घरातील महिलांनी काय करायचे असते? जाणून घ्या...

sarva pitru amavasya 2025 know about shubh muhurat yog shradh tarpan vidhi and significance of sarvapitri amavasya 2025 in marathi | सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता

सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता

Sarva Pitru Amavasya 2025: यंदाची चातुर्मासातील भाद्रपद अमावास्या अनेकार्थाने विशेष मानली जात आहे. भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू झालेला पितृ पक्ष भाद्रपद अमावास्येला म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला समाप्त होतो. यंदाच्या भाद्रपद अमावास्येला खंडग्रास सूर्यग्रहण लागत आहे. परंतु, रात्री लागणार असल्यामुळे सदर सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व अन् मान्यता जाणून घेऊया...

रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. संपूर्ण दिवसभर सर्वपित्री अमावास्या असणार आहे. भाद्रपद वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेष करून राखून ठेवला आहे. अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे दाखले आढळून येतात. सर्वपित्री अमावास्येला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे शाप आणि वरदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान, तर्पण विधी करतात.

शुभ योगात सर्वपित्री अमावास्या

सर्वपित्री अमावस्या तिथीचा प्रारंभ शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होत असून, रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०१ वाजून २४ मिनिटांनी संपेल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावास्या करावी, असे सांगितले जात आहे. या दिवशी शुभ योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. 

सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ

पितृपक्ष पंधरवड्यातील अखेरचा दिवस म्हणून सर्वपित्री अमावास्येकडे पाहिले जाते. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्णानेही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते.

सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात

पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारी व्यक्ती त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही वा करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध तर्पण विधी

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजचे तिन्ही सांजेला दिवा लावून तो घराच्या प्रवेशद्वारावर ठेवावा. यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर, वारसांवर कृपादृष्टी व शुभाशिर्वाद कायम राहावेत, अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबाबत प्रामाणिकपणे क्षमायाचना करावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परतरण्याची विनंती पूर्वजांना करावी, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावास्येला महिलांनी काय करावे?

सर्वपित्री अमावास्येला घरातील महिला वर्गाने सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वज्यांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. कावळ्यांसाठी काढून ठेवलेल्या जेवणातील भागाला काकबळी असे म्हटले जाते. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे. घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते.

 

Web Title: sarva pitru amavasya 2025 know about shubh muhurat yog shradh tarpan vidhi and significance of sarvapitri amavasya 2025 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.