सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:08 IST2025-09-20T17:06:11+5:302025-09-20T17:08:58+5:30
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावास्येला काही कामे करू नये, असे म्हटले जात असले तरी काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे सांगितले जाते.

सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
Sarva Pitru Amavasya 2025: यंदाची चातुर्मासातील भाद्रपद अमावास्या अनेकार्थाने विशेष मानली जात आहे. भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू झालेला पितृ पक्ष भाद्रपद अमावास्येला म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला समाप्त होतो. यंदाच्या भाद्रपद अमावास्येला खंडग्रास सूर्यग्रहण लागत आहे. परंतु, रात्री लागणार असल्यामुळे सदर सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. रविवारी, २१ सप्टेंबर २०२५ रोजी दिवसभर सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी नेमके काय करावे, ते जाणून घेऊया...
सर्वपित्री अमावास्येला प्रामुख्याने पौर्णिमा, चतुर्दशी आणि ज्या मृतांच्या निधनाची तिथी माहिती नाही, अशा सर्वांच्या नावाने श्राद्ध कार्य केले जाते. पूर्वजांच्या नावाने तर्पण विधी करून त्यांना अन्न, जल अर्पण केले जाते. श्राद्ध कार्यात किंवा एकूणच अनावधानाने घडलेल्या चुकांबाबत पूर्वजांची क्षमायाचना या दिवशी करावी, असे सांगितले जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध कार्य, तर्पण विधी करावेत. पूर्वजांचा जेवणाचे पान काढून ठेवल्यावरनंतरच भोजन ग्रहण करावे, असे सांगितले जाते. देवतांप्रमाणे पूर्वजांकडे वरदान देण्याची शक्ती असते, असे मानले जाते.
पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच
- सर्वपित्री अमावास्येला गरजूंना मदत करावी. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये. सर्वांशी चांगला व्यवहार ठेवावा. या दिवशी एखादा भिक्षुक आपल्या द्वारी भिक्षा मागण्यासाठी आल्यास त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नये. यथाशक्ती भिक्षा द्यावी. भिक्षुकाला उपयोगी वस्तूच्या दानाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले जाते.
- सर्वपित्री अमावास्येला कोणाचाही अपमान करू नये. याशिवाय घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा, असे सांगितले जाते.
- सर्वपित्री अमावास्येला केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर प्राणी, पशु, पक्षी यांचाही आदर करावा. त्यांना तुच्छतेची वागणूक देऊ नये. शक्य असल्यास अन्न, पाणी द्यावे, असे सांगितले जाते. आपल्याकडे कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. पूर्वज कावळ्याच्या रुपात येऊन वारसांनी दिलेले अन्न, पाणी ग्रहण करतात. म्हणून काकबळी काढण्याची पद्धत रुढ आहे.
- कावळ्याने काकबळी ग्रहण केल्यास पूर्वजांनी तो ग्रहण केला. पूर्वजांची कृपादृष्टी आणि शुभाशिर्वाद लाभले, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच पूर्वजांच्या नावाने काढलेले पान गोमातेला देण्याची प्रथा आहे. याशिवाय श्वानालाही अन्न, पाणी द्यावे, असे सांगितले जाते.
- वास्तविक कुटुंबातील वडिलधाऱ्या, ज्येष्ठ व्यक्तींना नेहमी मान ठेवावे. त्यांना आदराची वागणूक द्यावी, असे सांगितले जाते. हेच संस्कार सर्वपित्री अमावास्येला विशेष करून पाळावेत, असे म्हटले जाते. कुटुंबात दोन व्यक्तींमध्ये खटके उडू शकतात. मात्र, अशावेळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होत नाही ना, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले जाते.