संकल्प हवा साधेपणाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 03:20 IST2020-08-16T03:20:03+5:302020-08-16T03:20:31+5:30
दरवर्षी अबालवृद्ध स्त्री-पुरुष, सर्वच बाप्पाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत असतात. मग इथे खर्चाचा विचार केला जात नाही. परंतु, या वर्षी तसे नाही.

संकल्प हवा साधेपणाचा!
- दा. कृ. सोमण
गणपती सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे. यंदा कोरोना प्रादुर्भावाचे विघ्न जगावर आहे. ते दूर करण्यासाठी, प्रादुर्भाव टाळण्यासाठी या वर्षी आपण आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साधेपणाने, नियमांचे पालन करूनच साजरा करू या. लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन या वर्षी शनिवार, २२ आॅगस्ट रोजी होत आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. पार्थिव म्हणजे मातीच्याच गणेशमूर्तीचे पूजन या दिवशी करायचे असते. दरवर्षी अबालवृद्ध स्त्री-पुरुष, सर्वच बाप्पाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत असतात. मग इथे खर्चाचा विचार केला जात नाही. परंतु, या वर्षी तसे नाही.
या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन वेगळ्या परिस्थितीत होत आहे. कोरोना साथीमुळे अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. स्वयंशिस्तीचे पालन करावे लागणार आहे. गणेशमूर्ती न मिळणे, पूजा साहित्य न मिळणे, पूजा सांगायला पुरोहित न येणे, मूर्तीचे विसर्जन बाहेर न करता येणे इत्यादी अनंत अडचणींशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा आहे. तसा संकल्प प्रत्येकानेच मनाशी करायचा आहे.
गणपती हा विघ्नहर्ता आहे. तोच आपल्या अडचणी दूर करणार आहे. नदीकाठी जायचे, तिथलीच माती घेऊन स्वत:च मूर्ती बनवायची, तिथेच पूजा करून विसर्जन करायचे अशी साधेपणाने गणेशपूजनाची प्रथा सुरू झाली.
आता शास्त्रात काय सांगितले आहे ते आपण पाहू या. एखाद्या वर्षी अडचणींमुळे गणपती आणता आला नाही तरी चालते. अमुकच दिवस गणेशपूजन करायला पाहिजे असेही नाही. दरवर्षी परंपरेप्रमाणे आपण पाच-दहा दिवस गणेशोत्सव साजरा करीत असलो तरी या वर्षी दीड दिवस पूजन केले तरी चालेल. मातीची लहान मूर्ती आपणच तयार करावी हे उत्तम! ती एकाच रंगात रंगविली तरी चालेल. मूर्ती छोटी असावी; पण श्रद्धा-भक्ती मोठी असावी. पूजेला मिळेल ते साहित्य वापरावे. नाहीतर, त्याऐवजी अक्षता अर्पण कराव्यात. पूजा सांगायला पुरोहित मिळाले नाहीत तर स्वत: पुस्तकावरून पूजा करावी. पुस्तक नसेल तर जमेल तशी मनोभावे साधी पूजा करावी. या वर्षी गणेश दर्शनासाठी आप्तेष्टमित्रांना बोलवू नये.
आॅनलाइन अॅपवरून गणेशाचे दर्शन उपलब्ध करावे. त्यामुळे सर्वांना पूजा-आरती, अथर्वशीर्ष पठन यामध्ये सहभागी होता येईल. गणेशमूर्तीचे विसर्जन बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात करावे. तेही आप्तेष्ट-मित्रांना आॅनलाइन अॅपवरून पाहता येईल. या वर्षी साधेपणाचा संकल्प करून शिस्त पाळून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे.
आपण पूजा का करतो? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी! प्रगल्भ बुद्धिमत्ता, उत्कृष्ट नेतृत्वगुण, क्षमाशील वृत्ती, मातृभक्ती, शिस्तप्रियता इत्यादी गुण गणपतीपाशी होते. ते आपल्या अंगी यावेत यासाठी पूजन करायचे आहे. गणपती सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे. तो सर्व काही जाणतो. या वर्षी गणपती आपली सर्वांची परीक्षाच पाहत आहे. गणेशोत्सव साधेपणाने व शिस्त पाळून आपण साजरा करून त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ या.
(लेखक पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत.)