Ritual: नैवेद्याचा स्वयंपाक करताना चव घेणं योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराज सांगतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:51 IST2025-03-26T16:50:19+5:302025-03-26T16:51:56+5:30
Ritual: नैवेद्याचा स्वयंपाक करताना अनेकींच्या मनावर दडपण असते, प्रेमानंद महाराजांच्या मार्गदर्शनामुळे ते दूर होण्याची शक्यता आहे.

Ritual: नैवेद्याचा स्वयंपाक करताना चव घेणं योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराज सांगतात...
आजच्या झोमॅटो, स्वीगीच्या काळातही अनेक मुलींना रोज शक्य झाले नाही तरी सणासुदीला स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करण्याची हौस असते. घरच्यांचाही त्याला पाठिंबा असतो. मात्र स्वयंपाक करण्याचा रोजचा सराव नसल्याने मीठ, साखरेचा, तिखटाचा योग्य अंदाज येत नाही. त्यामुळे पदार्थाची चव घेऊनच शाहनिशा करावी लागते. अशात नैवेद्याचा स्वयंपाक करायचा म्हटले की दडपण येते. कारण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याही पदार्थाची चव घेऊ नये असे शास्त्र सांगते. अशा वेळी स्वयंपाक योग्य झाला आहे की नाही याबाबत मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यावर अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी छान उत्तर दिले आहे,
प्रेमानंद महाराज म्हणतात, 'स्वयंपाकाची चव घेणे यात अयोग्य काहीच नाही. मात्र त्यामागील भाव महत्त्वाचा आहे. आपण केलेला पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून देताना त्यात काही उणे राहू नये, या भावनेने एका वाटीत थोडासा भाग घेऊन चवीपुरता अंदाज घेणे यात गैर नाही, तर देवाप्रती असलेली आपुलकीची भावना आहे. आम्ही ब्रिजवासी यात गैर मानत नाही. देवाला चांगल्याच गोष्टी अर्पण करण्याचा ध्यास असेल तर चवीपुरते चाखणे आणि मग देवाला नैवेद्य अर्पण करणे यात गैर नाही.'
महाराजांनी दिलेली पुष्टी पाहता भक्त शबरीचा आठव झाल्यावाचून राहत नाही. शबरीने आपले आयुष्य श्रीरामांच्या आगमनाची वाट बघण्यात घालवले. ते येतील या ध्यासाने ती रोज ताजी फळे आपल्या टोपलीत गोळा करून आणत असे. एक दिवस खरोखरीच रामचंद्र आले तेव्हा शबरीने फळांची टोपली पुढे केली. मात्र तिला बोरांचा गुणधर्म लक्षात आल्याने तिने बाहेरून अखंड दिसणारे बोर आतून किडलेले तर नाही ना, या भावनेने तोडून पाहिले आणि चांगली बोरे देवाला अर्पण केली. या तिच्या वागण्यात बोर उष्ट करणे हा हेतू नव्हता तर देवाला कीड लागलेले फळ दिले जाऊ नये हा शुद्ध हेतू होता.
प्रेमानंद महाराज आणि माता शबरी यांच्या उदाहरणावरून लक्षात घ्या, नैवेद्याच्या पदार्थांची चव घेणे गैर नाही, फक्त त्यामागील भाव निर्मळ हवा, शुद्ध हवा, तर आणि तरच पाप लागणार नाही याची खात्री बाळगा.