Rathasaptami 2025: मकरसंक्रमण काळात दानधर्म राहून गेला असेल तर रथसप्तमीला दवडू नका संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:36 IST2025-02-03T12:36:34+5:302025-02-03T12:36:54+5:30

Rathasaptami 2025: मकरसंक्रमण काळ ४ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे, त्यादिवशी कोणते दान कोणाला केले असता काय लाभ मिळतात ते पाहू.

Rathasaptami 2025: If you have neglected charity during the Makar Sankram period, don't miss the opportunity on Rathasaptami! | Rathasaptami 2025: मकरसंक्रमण काळात दानधर्म राहून गेला असेल तर रथसप्तमीला दवडू नका संधी!

Rathasaptami 2025: मकरसंक्रमण काळात दानधर्म राहून गेला असेल तर रथसप्तमीला दवडू नका संधी!

सतत घेत राहणाऱ्या हाताला देण्याची सवय लागायला हवी, म्हणून आपल्या संस्कृतीने दान ही संकल्पना आखली. ज्याप्रमाणे आपल्या गरजेच्या वेळी कोणी येऊन आपली मदत करावी, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे आपणही कोणाच्या उपयोगी पडले पाहिजे. आपली छोटीशी मदत कोणाच्या जगण्याचा आधार बनू शकते. म्हणून यथाशक्ती दान करत राहावे आणि त्याची मोजदाद करू नये. म्हणतात ना, 'नेकी कर और दर्या मे डाल!' यंदा रथसप्तमी ४ फेब्रुवारी रोजी आहे. मकरसंक्रांती ते रथसप्तमीच्या काळात गुप्त दान करावे असे शास्त्र सांगते, त्याला गरुड पुराणाचा आधार घेऊन दान नेमके कसे, कुठे व कोणाला करावे ते जाणून घेऊ. 

>> दानाच्या विविध प्रकाराचे आणि त्यामुळे मिळणाऱ्या फळाचे वर्णन गरुड पुराणात दिले आहे. त्यानुसार-

>> न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी. आणि स्वकमाईवर दानधर्म करावा. जे दान योग्य माणसाला दिले जाते, त्याला सात्विक दान म्हटले जाते. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि विमल हे दानाचे प्रकार होत.

>> कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणालाही शक्य असेल, ते दान जो रोज देतो, त्याला नित्य दान म्हणतात.

>> पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालवणयासाठी जे दान दिले जाते, त्याला नैमित्तिक दान म्हणतात.

>> संतति, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती अशा हेतूसाठी जे दान दिले जाते, त्याला काम्य दान म्हणतात.

>> परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्त्वसंपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमल दान असे म्हणतात.

दानाच्या प्रकारानुसार त्याचे फळ पुढीलप्रमाणे प्राप्त होते- 

  • जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो. 
  • अन्नदान करणारा कधी न संपणारे सुख प्राप्त करतो. 
  • तीळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो. 
  • दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो. 
  • भूमीदान करणारा सर्व पदार्थांची सौख्य प्राप्त करतो. 
  • सोने दान करणारा दीर्घायुष्य प्राप्त करतो. 
  • चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो. 
  • अंथरूण दान करणारा चांगला जोडीदार प्राप्त करतो. 
  • अभय दान देणारा ऐश्वर्य प्राप्त करतो. 
  • धान्य दान देणारा चिरसौख्य प्राप्त करतो. 
  • विद्या दान देणारा स्वर्गप्राप्ती करतो. 
  • गायीला घास घालणारा सर्व दोषांपासून मुक्त होतो. 
  • सरण दान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो.
  • दुसऱ्यांसाठी तन्मयतेने जो श्रमदान करतो, त्याला परमसौख्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 
  • मात्र, जो मनुष्य आपल्याकडे साठवणीत वस्तू असूनसुद्धा गरजवंतांना देत नाही, तो पापाचा भागीदार होतो. 

थोडक्यात काय, ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे, ते देत राहा. त्याने आनंद वाढतो. आपलाही आणि समोरच्याचाही! जे कमावलं आहे, ते इथेच ठेवून जायचे आहे. जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा, हाच दानाचा पवित्र हेतू!

चाहे समजलो पैसे को हिरे या मोती, 
जानलो एक बात, कफन पर जेब नही होती।

Web Title: Rathasaptami 2025: If you have neglected charity during the Makar Sankram period, don't miss the opportunity on Rathasaptami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.