Ratha Sapatami 2025: सूर्यादेवाचे आपल्यावर कोणकोणते उपकार आहेत? ते रथसप्तमीनिमित्त जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 07:05 IST2025-02-03T07:00:00+5:302025-02-03T07:05:02+5:30

Ratha Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, त्यानिमित्त सूर्यपुजा तर आपण करणारच आहोत, त्याबरोबरीने जाणून घेऊया महत्त्व!

Ratha Sapatami 2025: What are the blessings of Suryadev on us? Let's find out on the occasion of Ratha Saptami! | Ratha Sapatami 2025: सूर्यादेवाचे आपल्यावर कोणकोणते उपकार आहेत? ते रथसप्तमीनिमित्त जाणून घेऊया!

Ratha Sapatami 2025: सूर्यादेवाचे आपल्यावर कोणकोणते उपकार आहेत? ते रथसप्तमीनिमित्त जाणून घेऊया!

सूर्य हा पृथ्वीप्रमाणे एक ग्रह. तरीदेखील सूर्याला देव मानून त्याची पूजा करणे, हा संस्कार केवळ भारतीय मनातच रुजू शकतो. कारण, त्याच्यात देवत्त्व पाहण्याची दृष्टी आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली आहे. त्याचेच यथार्थ वर्णन कवी गंगाधर महाम्बरे यांनी सदर भूपाळीत केले आहे. वीणा चिटको यांचे सुमधूर संगीत आणि ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरसाजाने पहाट अधिकच रम्य झाली आहे. 

पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव, 
प्रभातीस येशी सारा, जागवीत गाव।।

तो आलाच नाही तर? त्याने सुटी घ्यायची ठरवली तर? त्याला यायला उशीर झाला तर? आधीच अंध:कारमय झालेले आपले जीवन काळवंडून जाईल. तो नाही, ही कल्पनाही करवणार नाही. आपल्याला जीवनरस देणारा तो आहे, म्हणून त्याला आदराने सूर्यदेव म्हटले आहे. त्याच्या येण्याबरोबर सारा गाव जाागा होतो. मात्र, आपण ठरलो सूर्यवंशी. सूर्यदेवाच्या आगमनासाठी उठून, अंघोळ करून, हात जोडून सज्ज राहायचे सोडून, तोच बिचारा आपल्याला उठवायला येतो. परंतु, कधी चुकून, पहाटे जाग आलीच, तर खिडकीबाहेर जरूर डोकावून पहा. तेव्हा असे दृष्य नजरेस पडेल.

विधाता जगाचा तूचि उधळीत आशा,
उजळिशी येतायेता सभोवती जगदिशा,
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव।।

प्रत्येकाच्या आयुष्यात 'नवा दिवस, नवी आशा' जागवण्याचे कार्य सूर्यदेव करतो. देवपूजेआधीही सूर्यदेवाला पूजेचा मान आहे.  कारण, तोच तर देवालाही उठवत येतो. त्याचे येणेही किती रुबाबदार? आसमंतात लालसर, पिवळा, केशरी, गुलाबी रंगांची उधळण, जणूकाही सप्तरंगाच्या पायघड्याच. त्यावर दिमाखात धावत येणारा सूर्यदेवांचा सोनेरी रथ. दशदिशांना पसरलेली प्रभा आणि झुंजूमुंजू झालेली नभा. 

अंधारास प्रभा तुझी, मिळे प्रभाकर,
दिवसा तू ज्ञानदीप, लावी दिवाकर,
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव।

अंधाराचे साम्राज्य फार काळ टिकून राहत नाही. अंधार केवळ सृष्टीतलाच नव्हे, तर मनातला, तनातला, जनातला. तो दूर करण्याचे कार्य सूर्यदेव करतात. कठीण प्रसंगात दिवस निघून जातो, कारण ज्ञानसूर्य सोबतीला असतो. मात्र, रात्र काढणे कठीण असते. परंतु, सूर्यदेव येताच, सृष्टीला नवपेहराव मिळतो आणि सर्व सजीवांना नवचैतन्य मिळते. 

पुष्पपत्रदानाची रे, तुला नसे आस,
तूच चालुनिया येशी, माझिया घरास, 
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव।।

निष्काम कर्मयोगी म्हणून सत्कार करावा, अशी सत्कारमूर्ती म्हणजे सूर्यदेव. आपले पूर्वज त्याच्या सन्मानार्थ भल्या पहाटे उठून त्याला अर्घ्य देत, सूर्यनमस्कार घालत, गायत्री मंत्र म्हणत असत. मात्र, अलीकडच्या काळात आपल्यापैकी किती जण या गोष्टींचे पालन करत असतील, हे सूर्यदेवच जाणो. तरीदेखील, तो निरपेक्षपणे आपले कार्य करत आहे. आपल्याला झोपेतून उठवत आहे. हे उठवणे साधेसुधे नाही, तर स्वयंप्रकाशी होण्यासाठी प्रेरणा देणारे आहे. कोणी आपल्या बरोबर येवो न येवो, आपण आपले काम चोख बजवावे आणि आपल्या तेजाने विश्व व्यापून टाकावे, हा सूर्यदेवाचा संदेश. हे लक्षात घेता, जो भक्त भक्तीभावाने त्याच्या सूचनेचे पालन करतो, त्याला सूर्यदेवाप्रमाणे तेज प्राप्त झाल्यावाचून राहत नाही.

Web Title: Ratha Sapatami 2025: What are the blessings of Suryadev on us? Let's find out on the occasion of Ratha Saptami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.