Ram Navami 2021: How to celebrate Shri Ram Navami? Learn which mantras, hymns, chants of Rama should be recited. | Ram Navami 2021 : श्रीराम नवमी कशी साजरी करावी? रामाचे कोणते मंत्र, स्तोत्र, जप पठण करावेत, जाणून घ्या.

Ram Navami 2021 : श्रीराम नवमी कशी साजरी करावी? रामाचे कोणते मंत्र, स्तोत्र, जप पठण करावेत, जाणून घ्या.

चैत्र शुक्ल नवमी ही प्रभू रामचंद्रांची जन्मतिथी आहे. ग.दि.माडगूळकर यांनी गीत रामायणात `राम जन्मला गं सखे' या गीतातून रामजन्माचे सुंदर वर्णन केले आहे. संत नामदेवसुद्धा लिहितात-

उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस,
शुक्लपक्षी ही नवमी, उभे सुरवर व्योमी,
माध्यान्हासी ये दिनकर, पळभरी होई स्थीर।।

अशा या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला. राम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे. राम आपल्या कुटुंबासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी झटला. त्याला `मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून आपण गौरवतो. आजही त्याचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते. 

राजा दशरथाला संतती नव्हती. पुत्रकामेष्टी यज्ञानंतर त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रूघ्न हे चार पूत्र झाले. श्रीरामचंद्र हे भावंडात वडील. त्याच्या या तिन्ही भावंडांनी वडीलकीचा मान राखून त्याच्या आज्ञेत राहणे पसंत केले. रामाच्या चरित्राला जी उज्ज्वलता प्राप्त होते, ती तो आणि त्याचे कुटुंब यांनी परस्परांना जे सहकार्य दिले, परस्परांचे मान आणि स्थान वाढवण्यासाठी जो त्याग केला, कष्ट उपसले याची कहाणी आहे. प्रभू श्रीरामचंद्राचा आदर्श आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगला आहे. `दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा' अशा शब्दात समर्थ रामदासस्वामींनी गुणाढ्य रामचंद्राचा यथोचित गौरव केला. 

चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत काळ हा `रामनवरात्र' म्हणून ओळखला जातो. या काळाता रामायणाचे पारायण करणे, रामाच्या चरित्राचे, तसेच इतर काही धार्मिक ग्रंथाचे वाचन करे असे विधी ठिकठिकाणी आचरले जातात. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी रामाचा माध्यान्ही जन्म झाला असल्यामुळे गावोगावी असलेल्या राममंदिरात त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्याला पाळण्यात घालून `दशरथनंदना कुलभूषणा बाळा जो जो रे' ह्यांसारखी पाळण्याची गाणी म्हटली जातात. 

रामाला राक्षसांचा वैरी, रावणमर्दन राम म्हणून ओळखले जाते. राक्षस हे निशाचर. भूतयोनी ही निशाचरांचीच असते, असे समजतात. भुतादिकांचा उपद्रव होऊन नये म्हणून रामनामाचा जप करणे हा उपाय सांगितला जातो. श्रीरामरक्षास्तोत्रदेखील प्रसिद्ध आहे. रोज रामरक्षास्तोत्र म्हटले, तर जिभेला चांगले वळण लागते आणि उच्चार शुद्ध होतात. गुढीपाडवा ते रामनवमी या नऊ दिवसात गीत रामायण ऐकावे किंवा रामायण वाचावे. त्यामुळे रामाच्या पराक्रमाचे, कुटुंबवत्सलतेचे, सत्यप्रियतेचे, सत्वगुणांचे आकलन होते. 

रामाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत. रामाचे मंत्रही अनेक आहेत. `दाशरथाय विद्महे, सीतावल्लभाय धीमही, तन्नो राम: प्रचोदयात!' ही सुप्रसिद्ध रामगायत्री आहे. तिचे पठण करावे. रामजन्माच्या दिवशी साधारण १२ वाजून चाळीस मिनीटांनी रामजन्माच्या मुहूर्तावर `श्रीराम जय राम जय जय राम' हा जप करावा. तसेच पाळणा म्हणून, रामाला नैवेद्य दाखवून रामजन्म भक्तिभावाने साजरा करावा. 

Web Title: Ram Navami 2021: How to celebrate Shri Ram Navami? Learn which mantras, hymns, chants of Rama should be recited.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.