सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:37 IST2025-01-26T17:36:28+5:302025-01-26T17:37:32+5:30
2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी तेही सोमवारी येणे अतिशय शुभ मानले गेले आहे. या दिवशी नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...

सोमवारी सोम प्रदोष शिवरात्रि: व्रतासह ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पितृदोषातून दिलासा, शुभ-लाभ!
2025 Pradosh Shivratri Vrat In Marathi: मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।। सन २०२५ सुरू होऊन आता पहिल्या जानेवारी महिन्याची सांगता होत आहे. तसेच मराठी वर्षातील पौष महिन्याची सांगता होत आहे. जानेवारी महिना संपताना अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो. याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्रि ही दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच वेळी आली आहे. हा एक शुभ योग मानला जात आहे. या शुभ संयोग दिनी काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे केल्याने वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्रि एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
प्रदोष-शिवरात्रि व्रतासह कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात?
- यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ॐ नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते, असे सांगितले जाते.
- घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते.
- घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते.
- घरातील उत्तर-पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असे सांगितले जाते.
- पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
- पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.