पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:52 IST2025-09-15T16:50:21+5:302025-09-15T16:52:56+5:30

Pitru Paksha 2025 Rules: पितृपक्ष सुरू असताना काही गोष्टी करणे योग्य मानले गेलेले नाही. जाणून घ्या...

pitru paksha 2025 rules know about these things should not do in pitru pandharwada follow some these tradition | पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...

पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...

Pitru Paksha 2025 Rules: भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या कालावधीत पितृपक्ष असतो. पितृ पंधरवाड्यात पूर्वजांचे स्मरण केले जाते. पितरांच्या नावे श्राद्ध, तर्पण विधी केला जातो. पूर्वजांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांना काकबळी ठेवला जातो. आपल्या सेवेने पूर्वज प्रसन्न होत असतात. देवांप्रमाणे पितरांमध्ये वरदान देण्याची क्षमता असते, असे मानले जाते. पितृदोष असेल, तर पितृपक्षात विशेष विधी करून तो दूर करण्यासाठी उपाय केले जातात. या पितृपक्षात काही गोष्टी करणे चुकीचे मानले गेले आहे. या गोष्टी केल्यास त्याची अशुभ फळे मिळू शकतात, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

पितृपक्ष पंधरवड्यात वारसांना भेटण्यासाठी पितृलोकातून पूर्वज पृथ्वीतलावर येतात, असा समज आपल्याकडे प्राचीन काळापासून रुढ आहे. पूर्वजांच्या नावाने तर्पण विधी करून त्यांना अन्न, जल अर्पण केले जाते. श्राद्ध कार्यात किंवा एकूणच अनावधानाने घडलेल्या चुकांबाबत पूर्वजांची क्षमायाचना या दिवशी करावी, असे सांगितले जाते. 

‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ

- मद्यपान, मांसाहार करू नये. सात्विक आहार घ्यावा. पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध कार्य, तर्पण विधी करावेत. पूर्वजांचा जेवणाचे पान काढून ठेवल्यावरनंतरच भोजन ग्रहण करावे, असे सांगितले जाते.

- गरजूंना मदत करावी. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये. सर्वांशी चांगला व्यवहार ठेवावा.

- या दिवशी एखादा भिक्षुक आपल्या द्वारी भिक्षा मागण्यासाठी आल्यास त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नये. यथाशक्ती भिक्षा द्यावी. भिक्षुकाला उपयोगी वस्तूच्या दानाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले जाते. 

- कोणाचाही अपमान करू नये. याशिवाय घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये. प्रत्येक जीवाचा आदर करावा, असे सांगितले जाते.

- केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तर प्राणी, पशु, पक्षी यांचाही आदर करावा. त्यांना तुच्छतेची वागणूक देऊ नये. शक्य असल्यास अन्न, पाणी द्यावे, असे सांगितले जाते. 

- आपल्याकडे कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक मानले जाते. पूर्वज कावळ्याच्या रुपात येऊन वारसांनी दिलेले अन्न, पाणी ग्रहण करतात. म्हणून काकबळी काढण्याची पद्धत रुढ आहे.

- कावळ्याने काकबळी ग्रहण केल्यास पूर्वजांनी तो ग्रहण केला. पूर्वजांची कृपादृष्टी आणि शुभाशिर्वाद लाभले, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच पूर्वजांच्या नावाने काढलेले पान गोमातेला देण्याची प्रथा आहे. 

- कुटुंबातील वडिलधाऱ्या, ज्येष्ठ व्यक्तींना नेहमी मान ठेवावा. त्यांना आदराची वागणूक द्यावी. कुटुंबात दोन व्यक्तींमध्ये खटके उडू शकतात. मात्र, अशावेळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होत नाही ना, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले जाते. 

- घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा अपमान केल्यास पूर्वज नाराज होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींची अवहेलना होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांची आवड जोपासावी, असे म्हटले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: pitru paksha 2025 rules know about these things should not do in pitru pandharwada follow some these tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.