पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:25 IST2025-09-12T15:18:09+5:302025-09-12T15:25:42+5:30

Pitru Paksha 2025: पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते, अशी मान्यता आहे.

pitru paksha 2025 offer 5 items worth at just rs 5 to your ancestors and will bless you for life know details | पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील

पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील

Pitru Paksha 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या चातुर्मास काळातील पितृ पंधवडा किंवा पितृ पक्षाला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये विशेष महत्त्व आहे. २०२५ मध्ये येणारा पितृ पंधरवडा अनेकार्थाने विशेष मानला जात आहे. पितृ पक्षाची सुरुवात खग्रास चंद्रग्रहणानंतर होणार आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहणात सर्वपित्री अमावास्याने पितृपक्षाची सांगता होणार आहे. केवळ पाच रुपयांत घेता येऊ शकतात, अशा पाच गोष्टी पितरांना अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. 

पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध'. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते, असे म्हटले जाते. 'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते, अशी मान्यता आहे. 

५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा

वारसांनी अर्पण केलेल्या गोष्टी ग्रहण करून पूर्वज तृप्त होतात आणि प्रसन्न चित्ताने शुभाशिर्वाद देतात, अशीही मान्यता आहे. मात्र, श्राद्ध तर्पण विधी करताना काही गोष्टी या अत्यंत आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत. या काही गोष्टी पूर्वजांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील समस्या आणि अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते. धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य घरात येऊन कोणत्याही गोष्टींची कमतरता राहू शकत नाही. पितृदोषाचा प्रभाव ओसरण्यासाही या उपयोगी ठरू शकतात, असे सांगितले जाते. 

- पितृपक्ष पंधरवड्यात तीळ अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहेत. तीळाला पितृपक्षात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. श्राद्ध विधींमध्ये याचा समावेश केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला समाधान मिळते. कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने तीळाचे दान दिले, तर त्या दानातून दानव, असुर, दैत्य यांचा भाग संपुष्टात येतो, ते दान पवित्र होते आणि त्याचे अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होते, असे सांगितले जाते.

- तांदुळाच्या पिंडाला पायस अन्न मानले आहे. तांदूळ अक्षत असावा. म्हणजे तो भंगलेला नसावा. तांदूळ कधीही खराब होत नाही. त्यामधील असलेले गुणधर्म संपत नाहीत. तांदूळ हे थंड प्रकृतीचे असतात. आपल्या पूर्वजांना शांतता लाभावी आणि दीर्घकाळापर्यंत त्यांना समाधान मिळावे, म्हणून पिंड तांदळाच्या पिठाचे केले जाते. म्हणून तीळासह तांदळाचाही समावेश श्राद्ध विधी करताना केला जातो. जवस, काळे तीळ याचेही पिंड बनवू शकतो, असे सांगितले जाते.

- दर्भ हे विशिष्ट प्रकारचे गवत असते. दर्भ हे अत्यंत पवित्र मानले जाते. याला पवित्रक असेही म्हणतात. दर्भाचे पवित्रक करून त्याचा वापर केवळ पितृपक्षातील श्राद्ध कार्यात नाही, तर शुभ पूजनावेळीही केला जातो. पुराणातील काही संदर्भांनुसार, दर्भाची निर्मिती रोमापासून झाल्याचे सांगितले जाते. दर्भाच्या माध्यमातून देण्यात आलेले जल थेट पितरांपर्यंत पोहोचते, अशी लोकमान्यता आहे. दर्भाच्या समावेशाशिवाय श्राद्ध विधीचे पुण्य प्राप्त होत नाही, असे म्हटले जाते.

- वारसांनी अर्पण केलेल्या जलामुळे पूर्वज प्रसन्न होतात, त्यांना समाधान प्राप्त होते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जल कायम माणसाला उपयोगी पडत असते. पाणी हेच जीवन, असे म्हटलेच आहे. मात्र, मृत्यूनंतरही पाणी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, असे सांगितले जाते. तर्पण विधी केल्याने पूर्वज तृप्त होतात. वारसांना आशीर्वाद देतात. यामुळे कुटुंबात धन, धान्याची कमतरता राहात नाही. दर्भात पाणी आणि पाण्यात काही तीळ घालून तर्पण विधी केला जातो, असे सांगितले जाते.

- श्राद्ध तर्पण विधी करताना सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा. श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्ध विधीनेच पुण्यप्राप्त होते, असे सांगितले जाते. श्राद्ध विधीमध्ये अन्य सर्व गोष्टी भौतिक आहेत, मात्र, एकच अभौतिक गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा. ज्याच्याशिवाय श्राद्धाला काही महत्त्व राहत नाही. श्रद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण म्हणजेच श्राद्ध होय. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वज, संस्कृती आणि देवतांविषयी श्रद्धा ठेवावी. पितृपक्षातील श्राद्ध विधी, तर्पण किंवा अगदी दान-धर्म करताना मनात कायम श्रद्धा ठेवावी, असे सांगितले जाते.

 

Web Title: pitru paksha 2025 offer 5 items worth at just rs 5 to your ancestors and will bless you for life know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.