पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:55 IST2025-09-07T16:50:37+5:302025-09-07T16:55:02+5:30
Sarva Pitru Amavasya 2025 Date: सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध कार्य करता येते? खंडग्रास सूर्यग्रहण काळात श्राद्ध, तर्पण विधी करावेत का? जाणून घ्या...

पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
Sarva Pitru Amavasya 2025 Date: सोमवार, ०८ सप्टेंबर २०२५ पासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच मराठी वर्षातील चातुर्मास काळात येणाऱ्या पितृ पंधरवड्याला विशेष महत्त्व आहे. यंदा २०२५ च्या पितृपक्षाचे विशेष म्हणजे खग्रास चंद्रग्रहणानंतर पितृ पंधरवड्याला सुरुवात होत असून, सर्वपित्री अमावास्या म्हणजे पितृपक्षाच्या सांगतेला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. सर्वपित्री अमावास्या कधी आहे? खंडग्रास सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार? जाणून घेऊया...
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
पितृपक्षातील सर्वांत महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्येबाबत अनेक कथा, मान्यता सांगितल्या जातात. सर्वपित्री अमावास्येबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचे पाहायला मिळते. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. सर्वपित्री अमावास्या विशेष मानली जाते. वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावास्यांमध्ये सर्वपित्री अमावास्येला वरचे स्थान असून, याला विशेष महत्त्व आहे. पितृपक्ष सुरू झाला की, वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केला जातो. आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली, त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी केला जातो. श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते. पितरांचे, पूर्वजांचे स्मरण करून, श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते. कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्यांच्या तिथीला श्राद्ध केले जाते.
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
भाद्रपद सर्वपित्री अमावास्या: रविवार, २१ सप्टेंबर २०२५
सर्वपित्री अमावास्या प्रारंभ: शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर रात्रौ १२ वाजून ०६ मिनिटे.
सर्वपित्री अमावास्या समाप्ती: रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०१ वाजून २३ मिनिटे.
खंडग्रास सूर्यग्रहण: रविवार, २१ सप्टेंबर २०२५.
भारतीय पंचांगानुसार, आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्वपित्री अमावास्येला करावयाचे श्राद्ध कार्य रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी करावे, असे सांगितले जाते. तसेच याच दिवशी सूर्यग्रहण आहे. भाद्रपद अमावास्या ही सर्वपित्री अमावास्या म्हणून ओळखली जाते. सर्वपित्री अमावास्येला करण्यात येणारे श्राद्ध कार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
सर्वपित्री अमावास्येला कोणाचे श्राद्ध कार्य करता येते?
वर्षभरात, पितृपक्षात कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकले नाहीत, कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहिती नाही किंवा आजारपण, बदली, दौरे अशा अनेक कारणांमुळे जे कुणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत. ते सर्वजण सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध कार्य करू शकतात. तसेच पौर्णिमा, अमावास्या आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांचे श्राद्ध कार्यही सर्वपित्री अमावास्येला करावे, असे सांगितले जाते. यावेळी कावळा, गाय, श्वान यांना काकबळी काढून ठेवावा, असे सांगितले जाते. पूर्वजांच्या ऋणातून उतराई होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यात येतो.
खंडग्रास सूर्यग्रहण काळात श्राद्ध, तर्पण विधी करावेत का?
सूर्यग्रहण अमावास्येला होते. सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो. पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते, तेथील निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. २०२५ चे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये सर्वपित्री अमावास्येला लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याचे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. सूर्यग्रहण लागणार त्यावेळेस भारतात रात्र असेल. त्यामुळे ते भारतातून पाहिले जाऊ शकत नाही. तसेच श्राद्ध विधींसाठी सूतक काळ ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे या काळात श्राद्ध, तर्पण विधी केले जाऊ शकतात, असे म्हटले जाते. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी विधी करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये, असे काहींचे मत असल्याचे सांगितले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे. सर्वपित्री अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिकच वाढते. पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील, यासाठी श्राद्ध पूर्ण नियमाने करावे, असे सांगितले जाते.
श्रीकृष्णांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला करा श्राद्ध, तर्पण विधी
श्रीकृष्णानेही सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला केलेले श्राद्ध कार्य करावे, असे म्हटले जाते. पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.