Paush Maas 2025: मुलांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून पौष षष्ठीला केले जाते 'हे' खास व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 07:00 IST2025-01-04T07:00:00+5:302025-01-04T07:00:01+5:30

Puash Maas 2025: मुलांचे भविष्य आणि त्याबरोबरच निरोगी आयुष्य ही कोणत्याही आईची काळजीची मुख्य दोन कारणे असतात, तिला चिंतामुक्त करणारे हे व्रत पाहा.

Paush Maas 2025: This special fast is observed on Paush Shashti to ensure healthy and long life for children! | Paush Maas 2025: मुलांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून पौष षष्ठीला केले जाते 'हे' खास व्रत!

Paush Maas 2025: मुलांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून पौष षष्ठीला केले जाते 'हे' खास व्रत!

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, असे म्हणतात. कारण वात्सल्य हा स्त्रीचा स्थायी भाव असतो. ती आपले सबंध आयुष्य आपल्या नातेवाईकांच्या संगोपनात घालवते. यातही आपल्या पाल्याप्रती तिचा ओढा जास्त असतो. शेवटच्या श्वासापर्यंत ती केवळ मुलांच्या हिताचा विचार करते. याच विचाराला आपल्या हिंदू संस्कृतीने व्रताची जोड दिली आहे आणि सांगड घातली आहे, निसर्गाशी! पौष शुक्ल षष्ठीला म्हणजे ५ जानेवारीला, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी एक व्रत सुचवले आहे. काय आहे त्या व्रताचे वैशिष्ट्य, चला जाणून घेऊया. 

या व्रताचे नावच 'सुगंधी' व्रत असे आहे.  पौष शुक्ल षष्ठीला हे व्रत केले जाते, म्हणून त्याला खसषष्ठी असेही म्हणतात. खस म्हणजे वाळा! अतिशय प्रसन्न करणारा सुवास असलेले हे एक प्रकारचे गवतच असते. शीतलता हा त्याचा गुणधर्म मानला जातो. वाळ्यापासून अत्तर, सरबत, पडदे, उदबत्या, पंखे अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

व्रतकर्त्या स्त्रीने या दिवशी उपास करावा. नंतर षष्ठीदेवीचे प्रतीक मानलेल्या वाळ्याची म्हणजे खस नामक गवताची श्रद्धापूर्वक पूजा करावी. एवढा साधा सोपा विधी या व्रतासाठी सांगितलेला आहे. या व्रतालादेखील एका कहाणीची जोड दिलेली आहे.

त्यानुसार एका बाईची सून देवाचा नैवेद्य चोरून खायची. परिणामी देवाच्या अवकृपेने तिची मुले लहान वयातच दगावत असत. त्यावेळी सासूने तिला पौष शक्ल षष्ठीला उपास घडवायचे ठरवले. त्यासाठी तिने सुनेला भरपूर कपडे धुण्यासाठी नदीवर पाठवले. एवढे सारे कपडे धुण्यात तिचा पूर्ण दिवस गेला. त्यामुळे आपोआप सुनेला उपास घडला. त्यावेळी सासूने षष्ठीदेवीच्या पूजेची सारी तयारी करून ठेवली होती. सासूने आपल्या भल्यासाठी एवढे सारे केले हे कळल्यावर सून आनंदली. मग तिने सासूच्या मार्गदर्शनाखाली षष्ठीदेवीची अतिशय श्रद्धापूर्वक पूजा केली. त्यामुळे देवी तिच्यावर प्रसन्न झाली. कालांतराने तिला पुढे जी अपत्यप्राप्ती झाली, ती सारी सुदृढ आणि दीर्घायुषी झाली.

यात देवाच्या अवकृपेचा भाग वगळता उर्वरित कथा ही निसर्गाशी जोडणारी, निसर्गाला देव मानून पूजा करा असे सांगणारी आहे. अनेकदा कथांमध्ये सांगोपांगी बदल होतात, अपभ्रंश होतात, त्यामुळे मूळ कथांचे अर्थ बदलतात. त्यामुळे पौराणिक कथांकडे आपण रूपक कथा म्हणून पाहणे योग्य ठरते. 

महाराष्ट्रात 'जरा जिवंतिका'सारखी व्रते अपत्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रचलित आहेत. तसेच हे विशेष व्रत बंगालमध्ये रूढ आहे. ते सर्वांना कळावे, म्हणून त्याचा इथे अंतर्भाव केला आहे. इतर वनस्पतीप्रमाने खस या बहुगगुणी, बहुउपयोगी सुगंधी गवताचे संवर्धन व्हावे. हा त्यामागचा उद्देश असावा. दुर्वांप्रमाणे कस म्हणजेच वाळ्यालाही पूजेत समाविष्ट करून पर्यावरणाचा किती सुक्ष्म विचार आपल्या पूर्वजांनी केला होता, हे कळल्यावर आपण आश्चर्यचकित होतो.

Web Title: Paush Maas 2025: This special fast is observed on Paush Shashti to ensure healthy and long life for children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.