Marathi Hindu New Year 2026 Adhik Maas: १९ मार्च २०२६ रोजी मराठी नववर्ष सुरू होत आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ४५ मिनिटांनी सूर्योदय होणार आहे. तर सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. सकाळी अमावास्या संपली की प्रतिपदा लागणार आहे. त्यामुळे १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा करावा, असे सांगितले जात आहे. यंदाचे मराठी नववर्ष अगदी खास असणार आहे. कारण या मराठी नववर्षात १२ नाही, तर १३ महिने असणार आहेत. यंदा एक अधिक महिना आहे. जाणून घेऊया...
सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाम घेऊन येते. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा असून, यंदा श्रीशालिवाहन शके १९४८ प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे.
दर तीन वर्षांनी एक महिना अधिक असतो
जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्रसौर कॅलेंडर म्हणतात. पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असतात. त्यामुळे सौर कालगणना महत्वाची ठरते. पण त्याचवेळी हेही खरे आहे की, सूर्याच्या स्थानबदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरिता चंद्र उपयोगी ठरतो. मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो, असे सांगितले जाते.
अधिक महिना नेमका येतो कसा?
पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी साधारण ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४३ सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरिता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे 'लीप वर्ष' म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे 'चांद्रमास'. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात.
अधिक मास म्हणजे नेमके काय?
पृथ्वीवरून पहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला 'सूर्यसंक्रांत' अथवा 'सूर्य संक्रमण' असे म्हणतात. हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला 'असंक्रातीमास' म्हणजेच 'अधिक मास' म्हटले जाते.
आधी अधिक मास, मग निज मास
चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित कार्तिक वा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात, अगोदरचा अधिकमास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिकमास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिकमास म्हणून येऊ शकतो. सरासरी ३२ महिने १६ दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन महिने अधिक वेळा, तर कार्तिक व फाल्गुन क्वचित अधिक येऊ शकतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाहीत, क्षयमास येतात.
२०२६ मध्ये ज्येष्ठ मास अधिक महिना
यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत अधिक ज्येष्ठ असणार आहे. तर, सोमवार, १५ जून २०२६ याच दिवशी निज ज्येष्ठ सुरू होत आहे. मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी निज ज्येष्ठ मास संपणार आहे. यापूर्वी, सन २०१८ मध्ये ज्येष्ठ मास अधिक महिना म्हणून आला होता. तर यानंतर सन २०३७ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक मास येणार आहे.
Web Summary : The Marathi New Year in 2026 will have thirteen months due to Adhik Maas. This occurs roughly every three years to align lunar and solar calendars. Jyeshtha will be the extra month, starting May 17, 2026. This adjustment ensures festivals align with seasons.
Web Summary : 2026 में मराठी नव वर्ष अधिक मास के कारण तेरह महीनों का होगा। यह चंद्र और सौर कैलेंडर को संरेखित करने के लिए लगभग हर तीन साल में होता है। ज्येष्ठ मास अतिरिक्त महीना होगा, जो 17 मई, 2026 से शुरू होगा। यह समायोजन सुनिश्चित करता है कि त्योहार मौसम के साथ मेल खाते हों।