Navratri 2024: नवरात्रीच्या नवव्या दिवशी करावी सिद्धीदात्री देवीची पुजा; मागावे 'हे' मागणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 07:00 IST2024-10-11T07:00:00+5:302024-10-11T07:00:02+5:30
Navratri 2024: आज नवरात्रीचा शेवटचा दिवस; नऊ दिवस केलेली पुजा फलद्रूप व्हावी म्हणून सिद्धीदात्री देवीकडे काय मागचे ते जाणून घेऊ.

Navratri 2024: नवरात्रीच्या नवव्या दिवशी करावी सिद्धीदात्री देवीची पुजा; मागावे 'हे' मागणे!
>> आचार्य विदुला शेंडे
नवरात्रीचा नववा दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध नवमी , विश्वाच्या सुरूवातीला शिवाने शक्तीची उपासना केली, की जिला आकार नव्हता, निर्गुण स्वरुपात होती अशी ही आदिशक्ती शिवशक्ती सिद्धीदात्री रूपात व्यक्त झाली असे म्हटले जाते. केतू या ग्रहाला दिशा देण्याचे काम या शक्तीने केले.
चतुर्भुज स्वरुपात प्रकट झालेल्या हिच्या एका हातात गदा, दुसर्या हातात चक्र, तिसर्या हातात कमळ व चौथ्या हातात शंख आहे. भगवान शंकराने तप करून या शक्तीला प्रसन्न केले म्हणून शंकराला अर्ध नारी नटेश्वर नाव प्राप्त झाले, ही सिद्धीदत्री कमलासनावर विराजमान आहे. आणि हिचे वाहन सिंह आहे.
या शक्तीच्या साधनेने साधकास अष्टसिद्धी (मार्कंडेय पुराण) व अठरा सिद्धि (ब्रह्मावर्त पुराण) प्रमाणे सिद्ध होतात. लौकिक व अलौकिक सिद्धि प्राप्त होताना व्यक्तिस कोणतीही इच्छा व आकांक्षा राहात नाही. या शक्तीच्या साधनेत व्यक्ति सर्व सुख प्राप्त करून संसार चक्रापासून अलिप्त होतो.
सिद्धिदात्री हा शब्द सिद्धि आणि दात्री या दोन शब्दापासून बनला आहे, म्हणजेच सर्व अलौकिक शक्ति प्रदान करणारी देवी, जी शक्ति साधकाला पूर्ण ज्ञान प्रदान करून हृदयात संपूर्ण आनंद आणि प्प्रसन्नता जागृत करते. भक्तामधील विकार, कमतरता, वेदना दूर करण्याचे मार्ग ही शक्ति दाखविते.
ही शक्ति प्रत्येकाच्या कर्माला फल प्रदान करते, साधकाला अलौकिक सिद्धि दिल्यावर त्याची जबाबदारी लोक कल्याणसाठी कशी करावी याचेही ज्ञान प्रदान करते. प्राप्त झालेल्या सिदधींचा गर्व न करिता परम तत्वाकडे कसे जावे याचेही ज्ञान देते. या शक्तिनेचे सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी ही रुपे प्रकट केली की ज्या ब्रह्मा , विष्णु आणि महेश यांच्या कार्यात मदत करतील.
या शक्तीचे स्थान हे सहत्रार चक्राच्या वर निर्वाण चक्रमध्ये आहे, जे धारणा, ध्यान व सविकल्प समाधी प्रदान करते. शून्य स्थिति, शांतता व आनंद ही शक्ति प्रदान करते.
या देवी सर्व भुतेषू सिद्धि दात्री रूपेण संस्थिता
नमः स्त्स्येही नमः स्त्स्येही नमः स्त्स्येही नमो नमः |