नवग्रहांची ‘कुंडली’कथा: आठव्या स्थानी असेल मंगळ, तर आयुष्य संघर्षमय; दहाव्या स्थानी उत्तम फळ

By देवेश फडके | Published: March 29, 2024 02:19 PM2024-03-29T14:19:01+5:302024-03-29T14:20:59+5:30

Navgrahanchi Kundali Katha: मंगळ ग्रहाबाबत अनेक समजुती प्रचलित असून, तुम्हाला मंगळ आहे किंवा तुमची जन्मपत्रिका मंगळदोषाची आहे, असे अनेकांच्या बाबतीत ऐकायला मिळते. जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about importance of mars planet and astrology remedies of mangal graha and effect on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: आठव्या स्थानी असेल मंगळ, तर आयुष्य संघर्षमय; दहाव्या स्थानी उत्तम फळ

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: आठव्या स्थानी असेल मंगळ, तर आयुष्य संघर्षमय; दहाव्या स्थानी उत्तम फळ

- देवेश फडके.

Navgrahanchi Kundali Katha: मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेही म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. सध्या मंगळाभोवती तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. नासाच्या मार्स ग्लोबल सर्व्हेयरने केलेल्या निरीक्षणांतून मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरील बर्फ कमी होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मंगळ, पृथ्वी व सूर्य जेव्हा एका ओळीत येतात त्या स्थितीस मंगळाची प्रतियुती (अपोझिशन) म्हणून ओळखले जाते. २२ मे २०१६ रोजी अशी प्रतियुती झाली.

काही पौराणिक मान्यतांनुसार मंगळाला पृथ्वीचा मुलगा मानले जाते. तर मंगळ ग्रह उत्पन्न कसा झाला, याविषयी काही पौराणिक दाखले दिले जातात. स्कंदपुराणानुसार, उज्जयिनी पुरीवर अंधक नावाच्या राक्षसाचे राज्य होते. त्याला एक अतिशय बलवान आणि शूर मुलगा होता, त्याचे नाव कनक राक्षस होते. कनकने इंद्राला युद्धासाठी आव्हान दिले, दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. यात कनक राक्षस मारला गेला. इंद्राला अंधकांचे सामर्थ्य माहिती होते. अंधकाशी युद्ध करण्याच्या विचाराने तो भयभीत झाला. त्याने महादेव शंकरांचा आश्रय घेतला. भगवान शिव आणि अंधक यांच्यात घनघोर युद्ध झाले. युद्धादरम्यान भगवान शिवाच्या डोक्यातून घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला होता. या थेंबातून भूमिपूत्र मंगल जन्माला आला. अंगारक, रक्ताक्ष आदी नावांनी मंगळाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, ग्रहांमध्ये स्थापित झाल्यानंतर मंगळाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवाने मंगळेश्वर नावाच्या  शिवलिंगाची स्थापना केली होती. आज ते उज्जैनमध्ये मंगलनाथ मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. मंगळाच्या जन्माची आणखी एक कथा ब्रह्मवैवर्त पुराणात आढळते आणि त्याचा संबंध श्रीविष्णूंच्या वराह अवताराशी असल्याचे म्हटले जाते. 

जन्मपत्रिकेत मंगळदोष कसा पाहतात?

मंगळ ग्रहाबाबत अनेक समजुती प्रचलित असल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला मंगळ आहे किंवा तुमची पत्रिका मंगळदोषाची आहे, असे अनेकांच्या बाबतीत ऐकायला मिळते. आपल्याला मंगळ आहे, हे समजल्यावर बहुतांश लोक चिंताग्रस्त होतात. अशा लोकांचे विवाह जुळताना अडचणी येताना अनेकदा पाहायला मिळते. मांगलिक दोष किंवा मंगळ दोष म्हणजे नेमके काय? जन्मकुंडलीतील १, ४, ७, ८ व १२ यांपैकी कोणत्याही एका स्थानी मंगळ ग्रह असेल तर ती मंगळदोषाची कुंडली, असे समजतात. ज्या व्यक्तीची कुंडलीत या स्थानांवर मंगळ ग्रह असेल, तर त्या व्यक्तीस मंगळदोष आहे असे समजतात. प्रथम स्थानी मेषेचा मंगळ, चतुर्थात वृश्चिकेचा मंगळ, सप्तमात मकरेचा मंगळ, अष्टमात कर्केचा मंगळ तर द्वादशात धनु राशीचा मंगळ असल्यास ती कुंडली दोषार्ह नाही, असे समजतात. मंगळ असलेल्या सर्व कुंडल्या दोषापूर्ण असतीलच असे नाही. यास अनेक अपवाद आहेत. काही मान्यतांनुसार, दोषार्ह मंगळ कुंडलीत १, ३, ७, ८, १२ यांपैकी कोणत्याही एका स्थानी जर शनी असेल तर त्या कुंडलीतील मंगळाचा दोष नाहीसा होतो, असे समजण्यात येते. बलवान शुक्र अथवा गुरु हा ग्रह सप्तम स्थानात अथवा लग्न स्थानी असेल तर मंगळनाशक योग होतो. मंगळ दोष राहात नाही. चंद्र केंद्र स्थानात असेल तर मंगळाचा दोष राहात नाही. चंद्र मंगळ एकत्र असताना लक्ष्मीकारक योगामुळे मंगळाचा दोष राहात नाही. मंगळासमवेत राहु ग्रह असेल, तर मंगळाचा दोष राहात नाही, अशा काही मान्यता असल्याचे सांगितले जाते.

मंगळ ग्रहाचा मंत्र आणि उपाय

धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम्॥, असा नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा मंत्र आहे. ॥ ॐ क्रां क्रों क्रौं स: भौमाय नम:॥, हा मंगळाचा बीज आणि प्रभावी मंत्र मानला जातो. ॐ मंगलाय नमः ॥, ॐ अं अंगारकाय नमः॥, हा मंगळाचा विशेष मंत्र मानला जातो. ॐ अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमहि तन्नो भोम: प्रचोदयात्॥, हा मंगळाचा गायत्री मंत्र आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर मंगळ मंत्राचा जपजाप करावा, असे म्हटले जाते. कुंडलीत मंगळ कमकुवत असेल, तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. हनुमानाची आराधना, नरसिंह देवाचे पूजन, कार्तिकेयाचे पूजन तसेच सुंदर कांडाचे पठण किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. तसेच मंगळवारी विशेष व्रत करणे, मंगळाशी संबंधित वस्तूंचे दान करणे, मंगळाचे रत्न धारण करणे, योग्य रुद्राक्ष धारण करणे, असे काही उपाय सांगितले जातात. कुंडलीतील सात ते बारा या स्थानी मंगळ असेल तर त्याचा प्रभाव कसा असू शकतो, हे जाणून घेऊया...

मंगळ ग्रहाचा कुंडलीतील एक ते सहा स्थानांवरील प्रभाव पाहण्यासाठी क्लिक करा...

७) सप्तम स्थान: कुंडलीतील सप्तम स्थान भार्यास्थान मानले जाते. यावरून जोडीदार, विवाहसौख्य, कायदा, कोर्ट-कचेरी प्रकरणातील यशापयश, वादविवादातील यशापयश अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. सप्तम स्थानातील मंगळ वैवाहिक जीवनाला काहीवेळा मारक ठरु शकतो. विलंबाने विवाह होणे, विवाह न होणे, वैवाहिक जीवन सुखमय नसणे, घटफोस्ट होणे, एकापेक्षा अधिक विवाह होणे इत्यादी फले मिळू शकतात. अर्थात ही फले मंगळाच्या बलाबलावर तसेच अन्य ग्रहांच्या दृष्टी, युतींवर अवलंबून असतात.  अशा जातकाला शत्रू फार असतात. वादविवादाचे प्रसंग वारंवार येतात. शत्रू प्रबळ असतात. जातकाला जन्मस्थानापासून दूर रहावे लागते. लागते. वैवाहिक जीवन सुखी नसते. चारित्र्य संशयास्पद असते. आचार्य गर्ग यांच्या मते मेष, वृश्चिक किंवा मकर राशीचा मंगळ सप्तमस्थानी असेल तर एकच विवाह होतो व वैवाहिक जीवन सुखी असते. जर कर्क, मिथुन किंवा कन्या राशीचा मंगळ सप्तमस्थानी असेल तर एकापेक्षा अधिक विवाहाची शक्यता असते. संतती कमी होते. स्वभाव तापट असतो. अशा जातकाने व्यापारातील प्रतिस्पर्धा टाळावी. पाश्चात्य विद्वानांच्या मते पत्नीमुळे अनेक अडचणींशी मुकाबला करावा लागतो. बहुधा सर्वमान्य ज्योतिषशास्त्रज्ञानी मेष, वृश्चिक किंवा मकर राशीचा मंगळ सप्तमस्थानी असता तो राजयोग कारक असतो, असे मानले आहे.

८) अष्टम स्थान: कुंडलीतील अष्टमस्थान हे मृत्युस्थान मानले जाते. यावरून दुःख, आर्थिक संकट, मृत्युपत्रामुळे होणारा आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. अष्टम स्थानातील मंगळ बहुधा अशुभ मानला जातो. आयुष्याच्या दृष्टीने या स्थानी पापग्रह शुभ नसतो. 'अष्टमं पति सौभाग्य' या न्यायाने अष्टमस्थान हे स्त्रियांचे पतिसुख, सौभाग्य व समृद्धीचे आहे. तसेच पुरुषांच्या पत्नीसुख व समृद्धीचे स्थान आहे. म्हणून गुणमिलनात अष्टमस्थानाचा मंगळ शुभ मानला जात नाही. अशा जातकाला शत्रू अधिक असतात. आयुष्य संघर्षमय असते. जर इतर ग्रहांचे संरक्षण नसेल तर अष्टमातील मंगळ शुभ फले देत नाही. मानसिक अशांती असते. पत्नीचे पूर्ण सुख मिळत नाही. पत्नीचा वियोग होतो. यवन ज्योतिर्विदांच्या मते जातकाला २५ व ३२ वे वर्ष त्रासदायक व गुंतागुंतीचे जाते. विवाह साधारण कुटुंबात होतो. वडील, आजोबा व मामाचे सुख कमी मिळते. कुंडलीतील इतर ग्रस्थिती चांगली नसेल तर जातक दुराचारीही बनू शकतो.

९) नवम स्थान: कुंडलीतील नवम स्थान भाग्यस्थान मानले जाते. यावरून भाग्योदय, आध्यात्मिक प्रगती, ग्रंथलेखन, तीर्थयात्रा, वहिनी, मेहुणा, तत्त्वज्ञान, बुद्धिमता, गुरु, नावलौकिक, परदेशगमन योग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानीचा मंगळ बहुधा शुभ फले देतो. परंतु अशा जातकात दयाळूपणा, आस्तिकपणा कमी आढळतो. समाज याचा द्वेष करतो. जातक प्रतिष्ठित, राजमान्य व संपन्न असतो. उद्योग व कष्टाच्या प्रमाणात लाभ त्याच्या पदरात पडत नाही. यवन ज्योतिषाचार्यांच्या मतानुसार २६ व्या वर्षी भाग्योदय होतो. १४ व्या वर्षी पित्याला कष्ट व त्रास सहन करावा लागतो. जातक फार कामातुर असतो. आपल्या जन्मगावी प्रगती होते. पित्याचे सुख मध्यम मिळते. 

१०) दशम स्थान: कुंडलीतील दशमस्थान कर्मस्थान मानले जाते. यावरून पितृसौख्य, अधिकार योग, पत-प्रतिष्ठा, सामाजिक यश-कीर्ती, शासनाकडून होणारा सन्मान, प्रतिकूलतेविरुद्ध झगण्याची क्षमता, कार्यक्षमता, शेती, नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. ज्योतिषशास्त्रात दशमस्थानातील मंगळ शुभ मानला जातो. 'दशमंगारकोयस्य जातः कुलदीपकः' म्हणजे असा जातक ख्याती प्राप्त करतो. नाव उज्जवल करतो. असा जातक धाडसी, पराक्रमी, संपन्न व सुखी असतो. लहानशा अवस्थेतून प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोहोचतो. त्याच्या हाती विशेष सत्ता असते. आचार्य वैद्यनाथांच्या मता प्रमाणे दशम स्थानी नीचीचा मंगळ असेल तरी तो उत्तम फले देतो. जातकाला जन्मस्थानापासून दूर रहावे लागते. सहकारी अशिक्षित, अडाणी व क्रूर असू शकतात. जातक समाजाला प्रगतीची दिशा दाखवतो. पैसा मिळतो पण स्थिर राहत नाही. आचार्य पाराशरांच्या मते वाईट मार्गानेसुद्धा पैसा मिळवतो. वशिष्ठांच्या मते, जातकाचे आचरण चांगले नसते. दशमस्थ मंगळाबरोबर भाग्येश किंवा कर्मेश अथवा गुरु असेल तर उत्तम फले मिळतात. शक्तिशाली राजयोग होतो. दशमस्थ राहु, केतू, शनि, शुक्र यापैकी कोणताही ग्रह असेल तर जातकाच्या कार्यात काही अडचणी निर्माण होतात. १६ व्या वर्षी धनलाभ होतो. यवन ज्योतिर्विदांच्या मते २६ किंवा २७ व्या वर्षी शत्रूभय संभवते. स्थावराचे सुख जातकाला चांगले मिळते. पाश्चात्त्य विद्वानांच्या मते जातकाच्या जीवनात खूप चढ-उतार, नफा-नुकसानीचे व सुखदुःखाचे प्रसंग येतात. तरीसुद्धा जातकाचे जीवन सुखी असते. जातक धाडसी, स्वाभिमानी, उतावळा, लोभी व क्रूर स्वभावाचा असतो. चांगला टीकाकार असतो.

११) एकादश स्थान: कुंडलीतील अकरावे स्थान लाभस्थान मानले जाते. यावरून मित्र, सुना, जावई, होणारे लाभ, भेटवस्तु, मित्र स्त्रिया यांकडून होणारा लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. लाभस्थानातील मंगळाची फले आर्थिकदृष्ट्या चांगली मिळतात. जातक धाडसी, संभाषणचतुर, पत्नीचे सौख्य असणारा, वचनाचा पक्का व प्रतिष्ठित असंतो. महर्षी गर्ग यांच्या मते जातकाचा गळा मधुर व सुरेल असतो. आर्थिक लाभ होतात. पण चोरी व अग्नीचे भय असते. जातक शत्रूभंजक, स्वकर्तबगारीने प्रगती करणारा, रागीट-तापट, स्पष्टवक्ता, कटुसत्य बोलणारा असतो. भागीदारीत कोणताही व्यवसाय केला तर नुकसान होते. ट्रान्स्पोर्ट संबंधी कार्य, सैन्य, पोलीस इत्यादी धाडसी कार्यात, अग्नी व शस्त्रासंबंधी तसेच सोने, रत्ने, इत्यादी व्यवसायांत चांगला फायदा होतो. २४ वे वर्ष विशेष महत्वाचे व भाग्योदयकारक असते. जातक विद्वान, सुखी व श्रीमंत बनतो. पाश्चात्त्य ज्योतिर्विदांच्या मते याला खरे मित्र कमी असतात. मित्र बनून धोका देणारे अधिक असतात.

१२) द्वादश स्थान: कुंडलीतील द्वादशस्थान म्हणजेच बारावे स्थान हे व्ययस्थान मानले जाते. यावरून कर्ज, नुकसान, व्यसन, तुरुंगवास, पावलांना होणारा त्रास, संन्यास, अनैतिकता, उपभोग अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. मंगळ व्ययस्थानी असेल तर जताक भ्रमंती प्रवासाची आवड असलेला, चंचल बुद्धीचा, कामातुर, परस्त्रीलंपट, निशाणेबाज, शस्त्रविद्या निपुण, कोर्टात साक्ष देण्यात चतुर असा असतो. प्रसन्नचित्त असतो. धर्म-अधर्म, कर्तव्याकर्तव्य यांचा सारासार विचार कमी असतो. स्वार्थासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. लोक आपल्या कामासाठी याचा उपयोग करून घेतात. यामुळे दुसऱ्यांसाठी स्वतःला त्रास सहन करावा लागतो. धन स्थिर राहत नाही. इतर ग्रहांचे सहकार्य नसेल तर जातक कर्जबाजारी होतो. यवन ज्योतिर्विदांच्या मते जातक तापट असतो. याला मित्र फार कमी असतात. ४५ व्या वर्षी आर्थिक नुकसान होते. आयुष्यात मतभेद, वाद-विवादाचे प्रसंग वारंवार येतात. खोटा कलंक किंवा आरोप येतो. शत्रू फार असतात. संततीचे व पत्नीचे सुख कमी मिळते.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: navgrahanchi kundali katha know about importance of mars planet and astrology remedies of mangal graha and effect on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.