Mokshada Ekadashi 2023: मोक्षप्राप्तीसाठी मृत व्यक्तीलाही लावतात गोपीचंदनाचा टिळा; जाणून घ्या महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 15:58 IST2023-12-22T15:57:19+5:302023-12-22T15:58:15+5:30
Mokshada Ekadashi 2023: भगवान श्रीहरीला गोपीचंदन अतिशय प्रिय, त्याशिवाय त्याची पूजा अपूर्ण राहते; मोक्षदा एकादशीनिमित्त त्याचे महत्त्व जाणून घेऊ.

Mokshada Ekadashi 2023: मोक्षप्राप्तीसाठी मृत व्यक्तीलाही लावतात गोपीचंदनाचा टिळा; जाणून घ्या महत्त्व!
भगवान विष्णूंची पूजा चंदन लेपनाशिवाय अपूर्ण मानली जाते. कारण विष्णूंच्या वर्णनात 'सर्वांगे हरिचंदनं सुललितं कण्ठे चा मुक्तावली' असे वर्णन आढळते. हे चंदन साधे नाही, तर गोपीचंदन लावण्याचा प्रघात आहे. ही प्रथा केव्हापासून रुजू झाली याबद्दल एक कथा सांगितली जाते-
रुक्मिणी कृष्णाला विचारते, "आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही.असे का?" कृष्ण काहीही ऊत्तर देत नाही.
एकदा कृष्णाच्या छातीचा दाह होत असतो. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करुनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. "आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही त्वरित अंमलात आणू."
श्रीकृष्ण म्हणतात "जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा.मला बरं वाटेल."
महालातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्व जण नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते "मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ? माझी योग्यताच नाही. सात जन्म मी नरकात जाईन."
हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते.इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुक्मिणी सारखाच विचार करतात. आणि चरण रज राजवाड्यावर पोहचत नाही.
दवंडी पिटणाऱ्यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एकजण गोकुळात जातो. दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात काय करायला लागेल ते सांगा !
एका घमेल्यात बारीक रेती आणलेली असते.त्यात उभे रहायचेआणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभुंच्या वक्षस्थळी लावू. 'माती तुडवणारा प्रभूंचा खरा भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल. गोपी विचारतात रुक्मिणी मातेने नाही केले?'
दवंडीवाला सांगतो, "प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल" असं त्या म्हणाल्या. सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या "जर श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती इकडे." आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.'
पुढे ही माती प्रभुंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो आणि आजही आयुर्वेदिक उपचार म्हणून गोपीचंदन लावायला सांगितले जाते.
अशा गोपीचंदनचा महिमा काय आहे? महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ-
- दररोज कपाळावर गोपीचंदनचा टिळक लावण्याचे पुण्य वर्णन करताना श्रीकृष्णाचे विधान आहे- जो प्रतिदिन आपल्या शरीरात गोपीचंदन टिळक लावतो, तो शेकडो पापांपासून मुक्त होतो आणि श्री हरिच्या गोलोकधामाकडे जातो.
- कपाळावर गोपीचंदनचा टिळा रोज लावल्याने नराची नारायण होते. तसेच अशा व्यक्तीवर लक्ष्मीची कृपादृष्टी होते.
- मृत्यूच्या वेळी ज्याच्या बाहूवर, कपाळावर, अंतःकरणावर आणि डोक्यावर गोपीचंदन लावले जाते, तो लक्ष्मीपतीच्या जगात जातो.
- ग्रह, राक्षस, पिशाच, यक्ष, साप आणि भूत इत्यादींचा दंश झाल्यास गोपीचंदन लावले जाते.
- गोपीचंदनाचा टिळा लावणाऱ्याला दररोज महानद्यांमध्ये स्नान केल्याचे आणि सर्व तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य लाभते.