Meaning of verses in Mahishasurmardini stotram on the occasion of Shakambhari Navratri! (Part 3) | शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ३)  

शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग ३)  

रवींद्र गाडगीळ 

महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या सहा कडव्यांचा अनुवाद पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

अयी नीज हुंकृती मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्र शते, 
समर विशोषित रोषित शोणीत बीज समुद्भव बिजलते | 
शिव शिव शुम्भ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाच रते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||७||

हे भगवती तू नुसता हुंकार जरी भरलास तरी शत्रूपक्षाला कापरे भरते. धुरकट डोळ्यांचे ते धूम्र, विलोचन यांसारखे दैत्य, त्यांचा तू सहज संहार केलास, आणि त्या रक्तबिजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून पुन्हा पुन्हा नव नवीन उत्पन्न होणार्‍या असंख्य राक्षसांना युद्ध भूमीवर ठार करून त्यांची ती अक्षय बीज मालिकाच नष्ट केलीस. शिव शिव, हे अचाट कार्य तुझे, महायुद्धात शुंभ निशुम्भांना हरवल्यामुळे जी शिवाची अतृप्त भूत पिशाच्चे होती, ती तृप्त झाली. जी तुझ्यावर संतुष्ट आहेत. म्हणून आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो. 

हेही वाचा : शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग १)

धनूर नूषंग रण क्षण संपरीद स्फुरदंक नटत्कटके, 
कनक पिशंग पृषत्कनिशंग रसत्भट शृंगहता वटुके | 
कृत चतुरंग बलक्षिति रंग घटद्वहू रंग रटद्वटूके, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||८||

युद्ध करतांना तुझा आवेश बघण्यासारखा असतो एक स्त्री असूनही, तुझ्या धनुष्याचा टणत्कार आसमंतात कंप पावतो, ज्यामुळे शत्रू गर्भगळीत तर होतातच पण त्यात तुझ्या हातातील कंकणांचा किणकणाट छातीत दहशत बसवतो. तुझा तो चतुरंग दल सैन्याचा लोंढा लढत असतांना त्यातही तू क्षणात इकडे तर क्षणात तिकडे किती सहजपणे वावरतेस, आणि त्यांना प्रोत्साहित करतेस आपल्या आवाजाने. जशी चपल विद्युल्लताच. डोळे दिपून जातात. आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो. 

सुर ललना तत थेयीत थेयीत थाभी नयोत्तर नृत्यरते, 
कूत कुकुथा कुकुथो दीड दाडीक ताल कुतूह गानरते | 
धुधू कूट धुधूट धिंधी मित ध्वनि घोर मृदंग निनाद रते, 
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||९||

हे जगदंबे, एवढी युद्धविलासिनी असूनही स्त्रीलोलुप अशा नृत्यकलेतही तू अतिशय प्रवीण आहेस. सर्व देवी अवतारांबरोबर किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या हस्तमुद्रा, मुखमुद्रा करून “ता थैय्या ता थैय्या थक थै, थक थै”, थकत कशी नै!! तुझे पदन्यास किती सुंदर!! आणि हे सर्व शांत चित्त ठेऊनच ना!! परत हसतमुख राहतेस सदा न कदा. आणि तुला शरण येणार्‍या प्रत्येकाला तू अभय देतेस, प्रेम करतेस. व्वा! तो मृदुंगाचा ह्या भल्या मोठ्या प्रांगणात तुझ्या नृत्याबरोबर “धीमीक धीमीक टांग टांग टांग” आवाज केवढा घुमतो, ऐकून आनंदाला पारावार राहत नाही, जोश येतो. ऐकणार्‍यांचे पाय आपले वय विसरून थीरकतात. म्हणून आई भगवती, महिषासुरमर्दिनी, आपल्या सुंदर लांबसडक केशसंभाराने सर्वांना आकर्षित करून घेणार्‍या गिरिजे, तुला साष्टांग माझा दंडवत. तुझा विजय असो. 

हे आई,आम्हा बालकांवरही अशीच कृपा सदैव ठेव. पुढील श्लोकांचे विवेचन उद्या. 

हेही वाचा : शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)  

Web Title: Meaning of verses in Mahishasurmardini stotram on the occasion of Shakambhari Navratri! (Part 3)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.