मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: ‘असे’ करा व्रत, २०२५ची सुरुवात दमदार, महादेवांची अपार कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 09:48 IST2024-12-29T09:47:56+5:302024-12-29T09:48:29+5:30
Margashirsha Somvati Amavasya December 2024: २०२४ची सांगता सोमवती अमावास्येच्या व्रताचरणाने होत आहे. जाणून घ्या, महत्त्व आणि मान्यता...

मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: ‘असे’ करा व्रत, २०२५ची सुरुवात दमदार, महादेवांची अपार कृपा!
Margashirsha Somvati Amavasya December 2024: सन २०२४ या वर्षाच्या सांगतेला सोमवती अमावास्येचा शुभ योग जुळून आला आहे. सन २०२४ या वर्षातील हे शेवटचे व्रत आहे. यानंतर सन २०२५चा जानेवारी महिना आणि पौष मासारंभ होणार आहे. सन २०२५ ची सुरुवात शानदार आणि सुख-सौभाग्याची व्हावी, अशी इच्छा असेल, तर आवर्जून सोमवती अमावास्येचे व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे. महादेव शिवशंकराचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. अनेकविध लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते. सोमवती अमावास्येचे महत्त्व, व्रताचरण पूजा विधी आणि काही मान्यता जाणून घेऊया...
सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे सोमवती अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त होते. सोमवती अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. गंगास्नान शक्य नसलेल्या व्यक्तींनी नदी किंवा तलावात स्नान करावे, असे सांगितले जाते.
मार्गशीर्ष सोमवती अमावास्या: सोमवार, ३० डिसेंबर २०२४
मार्गशीर्ष सोमवती अमावास्या प्रारंभ: सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ०४ वाजून ०१ मिनिट
मार्गशीर्ष सोमवती अमावास्या सांगता: सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ५६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे मार्गशीर्ष सोमवती अमावास्येचे व्रताचरण ३० डिसेंबर २०२४ रोजी करावे, असे सांगितले जात आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावास्या भाग्याची असल्याचे सांगितले आहे. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, नामस्मरण, आराधना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे.
सोमवती अमावास्येचे महत्त्व अन् मान्यता
अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारी अमावास्या सुरू होणे, भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे.
सोमवती अमावास्येला शिव पूजनाचे महत्त्व
सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. म्हणूनच सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
सोमवती अमावास्येला दानाचे महत्त्व
सोमवती अमावास्या तिथीला केल्या जाणाऱ्या दानाला विशेष महत्त्व प्राप्त होते, अशी मान्यता आहे. सोमवती अमावास्येला गरजूंना गरजेच्या वस्तू दान कराव्यात. यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींच्या राशीत चंद्र ग्रह कमकुवत असतो. त्या व्यक्तींनी सोमवती अमावास्येला गोमातेला अन्नदान करावे, असा सल्ला दिला जातो. चंद्र ग्रहाशी संबंधित व्याधी यामुळे दूर होतात, अशी मान्यता आहे.