मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 21:07 IST2025-12-10T21:06:31+5:302025-12-10T21:07:14+5:30
Margashirsha Guruvar December 2025 Swami Seva: मार्गशीर्ष गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज आणि लक्ष्मी देवीची सेवा कशी कराल? जाणून घ्या...

मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
Margashirsha Guruvar December 2025 Swami Seva: २०२५ चा डिसेंबर महिना सुरू आहे. सन २०२५ या वर्षाची सांगता अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. मराठी वर्षातील अतिशय शुभ आणि पवित्र मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष गुरूवार हा लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरणासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी विशेष व्रताचरण केले जाते. गुरुवारी दत्तावतारी स्वामींची सेवाही शेकडो घरात नित्यनेमाने केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवी आणि स्वामींची सेवा केल्यास अनेक लाभ होऊन कालातीत कृपेचे धनी होण्याची संधी मिळू शकते, असे मानले जाते.
गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात.
‘अशी’ करा मार्गशीर्ष गुरुवारी स्वामी अन् लक्ष्मी देवीची सेवा
- मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लक्ष्मी देवी आणि स्वामींचे विशेष पूजन करावे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा.
- पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी.
- स्वामींना नैवेद्यासाठी दूध-साखर, किंवा गुळ-शेंगदाण्याचा नैवेद्य अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते.
- स्वामींचा सर्वांत प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर १ जपमाळ म्हणजे १०८ वेळा तारक मंत्रांचा जप करावा. शक्य असेल तर स्वामी अष्टक म्हणावे.
- स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे. स्वामी चरणी नतमस्तक व्हावे.
- अगदी काहीच जमले नाही तरी , ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा (१ जपमाळ) किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा.
- तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी लक्ष्मी देवी, स्वामींसमोर दिवा लावावा. तुळशीपाशी दिवा लावावा.
- शक्य असेल तर सकाळी, सायंकाळी किंवा दिवसभरात एकदा लक्ष्मी देवीचे श्रीसुक्त, कनकधारा स्तोत्र अवश्य म्हणावे. लक्ष्मी मंत्रांचा मनापासून जप करावा.
- शक्य असेल तर सायंकाळी स्वामी, लक्ष्मी देवीची आरती करावी.
- स्वामींवर दृढ विश्वास आणि अपार श्रद्धा ठेवा.
- स्वामींवरील निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका.