Margashirsh Pournima 2022: दर पौर्णिमेला शिऱ्याचा प्रसाद करून वाटल्याने पुण्य लाभते म्हणतात, सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 07:00 IST2022-12-08T07:00:00+5:302022-12-08T07:00:02+5:30
Margashirsh Pournima 2022: यंदा ७ आणि ८ डिसेम्बर अशा दोन दिवसांत मार्गशीर्ष पौर्णिमा विभागून आली आहे. दत्त जन्माचा उपास असेल तर ८ डिसेम्बर रोजी शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता.

Margashirsh Pournima 2022: दर पौर्णिमेला शिऱ्याचा प्रसाद करून वाटल्याने पुण्य लाभते म्हणतात, सविस्तर जाणून घ्या!
आपली आई, आजी, आत्या, मावशी अर्थात रीतभात सांभाळणाऱ्या मागच्या पिढीतल्या सगळ्या बायका पूजाविधींचा एक भाग म्हणून दर पौर्णिमेला शिऱ्याचा नैवेद्य दाखवत असल्याचे आपण पहिले असेल. पौर्णिमेला चंद्राची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. हा नैवेद्य त्यांच्यासाठीच असतो आणि तो सर्वांना वाटायचा असतो, त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते असे म्हणतात. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ते याबद्दल सविस्तर सांगू शकतील. परंतु साजूक तुपात केलेला शिरा अर्थात नैवेद्याचा प्रसाद श्रीमंतीची अनुभूती देतो, हे नक्की! पण ही श्रीमंती एकट्याने अनुभवू नका तर तो प्रसाद सर्वांना वाटून खा, तरच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
एक तीळ सात जणांनी वाटून खावा, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यात जर तो प्रसाद असेल, तर तो एकट्याने न खाता सर्वांना दिला तर जास्त पुण्य मिळते असे म्हणतात. परंतु, या विधानाला आधार काय? तर श्रीमद्भग्वद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे,
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्
जो जो भक्त, ज्या ज्या रूपात श्राद्धपूर्वक माझी आळवणी करेल, जो भक्त प्रेमपूर्वक फुल, फळ,अन्न, जल, इ अर्पण करेल, ते मी प्रेमपूर्वक सगुण रूपात प्रगट होऊन ग्रहण करतो. भक्ताची भावना असेल तर ईश्वर एक वेळा नाही तर वेळोवेळी येऊन भक्ताची सेवा मान्य करतो. शबरी, द्रौपदी, विदुर, सुदामा, यांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेले भोजन त्यांच्या हस्ते खाल्ले. मीराबाईच्या विषाचा प्याला स्वतः प्यायले.
काही लोक तर्क बुद्धीचा उपयोग करून म्हणतात, जर ईश्वर नैवेद्य ग्रहण करतात, मग तो कमी कसा होत नाही. तर ज्याप्रमाणे फुलावर बसलेला भुंगा फुलांचा गंध प्राशन करून उडून जातो, त्यामुळे जसे फुलांचे वजन कमी होत नाही. त्याप्रमाणे ईश्वर सुद्धा नैवेद्य ग्रहण न करता केवळ त्यामागील त्याग भावनेने संतुष्ट होतो. त्यामुळे भगवंताची कृपादृष्टी होऊन नैवेद्यात प्रसादत्व उतरते. आनंद वाटल्यावर द्विगुणित होतो, तोच आनंद प्रसाद वाटल्यानेही मिळतो. त्यामागील भावना शुद्ध असावी एवढंच!
त्याचप्रमाणे दुसरी बाजू अशी, की देवाला आपण नैवेद्य दाखवतो. परंतु त्याने प्रत्यक्ष येऊन तो प्रसाद ग्रहण करावा, एवढा आपला पारमार्थिक अधिकार नाही किंवा तेवढी आपली गाढ भक्ती नाही. अशा वेळी देवाला नैवेद्य हा एक उपचार शिवाय गोर गरीबांना, ब्राह्मणांना केलेले अन्नदान आपण इर्श्वराला पोहोचते ही आपली श्रद्धा आहे. म्हणून नैवेद्याचे प्रसादत्व वाढावे, म्हणून तो सर्वांना वाटून खावा.
म्हणूनच आपण सत्यनारायणाचा प्रसाद असो नाहीतर भंडाऱ्याचा किंवा तीर्थक्षेत्री गेल्याचा, एकट्याने कधीच खात नाही. तो सर्वांना वाटतो. दर पौर्णिमेला प्रसाद करा आणि तो सर्वांना वाटून खा, या दानाचा नक्की लाभ होईल!