Makarsankranti 2022 : संक्रांती ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 13:52 IST2022-01-14T13:52:05+5:302022-01-14T13:52:56+5:30
Makarsankranti 2022 : पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते.

Makarsankranti 2022 : संक्रांती ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जाणून घ्या!
कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. कुंकवाचा रंग लाल आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. आर्येतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते. मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्ण प्रिय असणारी आहेत.
इ.स. च्या तिसऱ्या व चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत.
कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख आहे. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जातो. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचे मानले असल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचे असते, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचे व त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत होती. विद्यमान काळातही अनेक आदिवासी जमातीत या प्रथेचे अवशेष आढळतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.
कुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाल़े लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदु स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत़ `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो' अशी उदात्त, महन्मंगल भावना त्यामागे असते. लग्नप्रसंगी वधू वरांना कुंकू लावण्याची चाल पारशी लोकांतही आहे. मांगलिक कार्यात पुरूषांनाही कुंकू लावले जाते.
कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची झाडे १२-१५ फुटापर्यंत वाढतात. साल जाड असते. पाने सदापर्णी लंबवर्तुळाकार असून पानाच्या शिरा तांबड्या असतात. फुलाचा रंग पिवळसर असून त्यांना देठ नसतात. फळे छोटी असून फळात छोटी बी असून त्यावर जी तांबडी भुकटी असते, तेच खरे कुंकू . हे कुंकू फार मौल्यवान असते. कृत्रिम कुंकू चुना व हळद यांच्या मिश्रणापासून बनवतात. तसेच हळद व हिंगुळ किंवा करडईपासून कुंकू बनवतात.
कुंकूमतिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुद्धिपूजेचे अधिष्ठान आहे. ईशपूजनानंतर तात्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे. प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि नंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन होय. तिलक आस्तिकांचेही चिन्ह आहे.
आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि चिरंतन आहे. ते लावण्याच्या पद्धतीत कालानुसार स्थित्यंतरे होत गेली. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व आता आधुनिक काळात स्त्रिया टिकल्या वापरतात. पण यात मांगल्याचे व सौभाग्याचे ओज आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे.
समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.