Makar Sankranti 2025: काय असतो किंक्रांतीचा कुळाचार आणि महत्त्व? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:51 IST2025-01-14T17:50:01+5:302025-01-14T17:51:04+5:30
Makar Sankranti 2025: संक्रांतीच्या दुसर्या दिवशी किंक्रांत असते आणि त्या दिवशीही कुळाचार असतो, पण या दिवसाचे महत्त्व काय तेही जाणून घेऊ.

Makar Sankranti 2025: काय असतो किंक्रांतीचा कुळाचार आणि महत्त्व? जाणून घ्या!
'तिळगूळ घ्या गोड बोला' असे म्हणत एकमेकांना तिळगूळ देतात, तो दिवस- संक्रांत! आता तिळगुळाची जागा हलव्याने घेतली आहे. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला संक्रांती म्हणतात. यामुळे प्रत्येक वर्षात बारा संक्रांती येतात. यातील आषाढ अणि पौष महिन्यातील सूर्याची ही संक्रमणे जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्क राशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो, हे त्याचे संक्रमण जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्कराशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो. हे त्याचे संक्रमण उत्तरायणात होते. यातील हा दुसरा म्हणजे मकरसंक्रमणाचा दिवस पुण्यकारक मानलेला आहे. तीच ही तिळगूळ देण्याघेण्याची संक्रांत! तीळ आणि गूळ हे स्नेहाचे प्रतीक आहे, म्हणून ते यावेळी वाटण्यात येत असते.
पण तसे म्हटले तर संक्रांतीच्या सणाचा कुळाचार तीन दिवसांचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पहाटे स्त्रिया नाहतात. उंची वस्त्रे परिधान करतात. तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी यांचा नैवेद्य देवाला समर्पण करून मग सर्वजण तो भोजनाचा महाप्रसाद घेतात. असा नैवेद्य दाखवणे हा एक कुळधर्मही आहे. भोगीचा सण म्हणजे उपभोगीचा दिवस!
यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत! जुन्या पंचांगाची संक्रांत सर्वसाधारणपणे १४ जानेवारीला आणि टिळक पंचांगाची संक्रांत १० जानेवरीला येत असते. उत्तरायणाचा आरंभ संक्रांतीपासून होत असतो.
सुवर्ण आणि माती या दोन प्रकारच्या भांड्यांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे आणि म्हणून मातीच्या बोळक्यावर हळदकुंकवाच्या रेघा काढून त्यात उसाचे करवे, गहू-हळकुंड, कापूस आणि दक्षिणा ठेवून त्याचे दान करतात, हाही कुळाचार आहे. या मातीच्या बोळक्याला सुघट म्हणतात.
स्त्रिया या दिवशी हळदकुंकू करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात, त्याला वाण लुटणे म्हणतात. या दिवशी देवाच्या नैवेद्याला गुळाच्या पोळ्या करून त्याचा भोजन प्रसाद घेतात.
संकासुर आणि किंकरासुर नावाचे दोन दैत्य होते. ते ऋषिमुनिंना त्रस्त करू लागले. देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचाच एक भाग आहे.
संक्रांतीच्या सणाला तान्हा बाळाला तसेच पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना बोरन्हाण घालतात. चुरमुरे, चणे, साखरदाणे, गोळ्या, चिंचा, बोरे डोक्यावर टाकली जातात. तसेच नवीन जावई, नवीन सून यांचे कोडकौतुक करण्यासाठी त्यांना हलव्याचे दागिने घालणे हादेखील कुळाचार आहे.