महाशिवरात्री: स्वामींनी पूर्ण केली इच्छा, शिवरुपात दिले दर्शन; काय घडले? पाहा, दिव्यानुभूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:16 IST2025-02-25T11:13:47+5:302025-02-25T11:16:20+5:30
Mahashivratri 2025: स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे. स्वामींनी भाविकांची इच्छा अनेकदा पूर्ण केली आहे. जाणून घ्या...

महाशिवरात्री: स्वामींनी पूर्ण केली इच्छा, शिवरुपात दिले दर्शन; काय घडले? पाहा, दिव्यानुभूती
Mahashivratri 2025: ‘शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो। हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो॥’ बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. लाखो भाविक शिव मंदिरात जाऊन विशेष पूजन, जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्रांचा जप केला जातो. शंकर महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे, असे मानले जाते. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थ महाराजांनी एका भाविकाची इच्छा पूर्ण करून त्याला शिवरुपात दर्शन दिल्याचे म्हटले जाते. जाणून घेऊया...
काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात. स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून, उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो, असे भक्तगण सांगतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींच्या सोबत असलेल्या भक्तांनी, अनुयायांनी, सेवेकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करून ठेवलेले आहेत. स्वामींच्या तोंडी नेहमी शिवाचे नाव असे. शिवाचे स्मरण करायचे. परिस्थिती कोणतीही असो स्वामी समर्थ महाराज शिवाचे या मंत्राचे उच्चारण करायचे, असे सांगितले जाते.
काशी विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूपी दर्शन
रायराजे यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन काशीला जाऊ असा मनोमन संकल्प केला होता. परंतु रायराजे यांनी केलेल्या संकल्पानुसार ते समर्थांचे दर्शन न घेता काशीक्षेत्री आले. काशीक्षेत्री त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात शिवलिंगाऐवजी विश्वमूर्ती श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. स्वामींचे अजून एक भक्त श्रीपाद भट हे जेव्हा स्वामी आज्ञेने काशीस गेले तेव्हा त्यांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात स्वामींचे विश्वरूपी दर्शन झाले.
मुख ते देखिले नीजडोळा। गळा मोहनमाळा मध्ये हा रुद्राक्ष। देखिले प्रत्यक्ष शिवरूप॥
शिव म्हणजे कल्याणकारी. मूळ पुरुष भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच विश्वाची मूळ शक्ती शिव असल्याने ते देवाधिदेव महादेव आहेत. स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात शिव असल्याची प्रचिती अनेक भक्तांना आली आहे. आनंदनाथ महाराजांना , स्वामी समर्थ महाराजांचे शिवरूपात दर्शन झाले म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात की, “मुख ते देखिले नीजडोळा। गळा मोहनमाळा मध्ये हा रुद्राक्ष। देखिले प्रत्यक्ष शिवरूप॥”
आपणचि शिवशंकर। अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर। सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार। घडला मजलागी॥
मुंबईचे एक भक्त नंदरामजी ज्यांचा दररोजचा शिवदर्शनाचा नित्यनियम होता, ते एकदा अक्कलकोटला आले. स्वामी तेव्हा मल्लिकार्जुनाच्या देवळाबाहेर बसले होते. स्वामींनी नंदरामजींना सांगितले की, तुमचा शिव आतमध्ये आहे, जा दर्शन घेऊन या. ते मल्लिकार्जुनाचे दर्शन घ्यावयास मंदिरात गेले. आतमध्ये जाताच त्याना शिवलिंग कुठेच दिसेना. तेव्हा ते दचकले. त्याक्षणी त्यांना शिवलिंगाच्या जागी स्वामी दिसू लागले. त्यांचा अहंभाव गळून पडला व ते मंदिराबाहेर येऊन स्वामींच्या पायी येऊन वदले...
आपणचि शिवशंकर। अंतर्बाह्य व्यापक परमेश्वर। सर्व लोकांसमक्ष साक्षात्कार। घडला मजलागी॥ आपले सामर्थ्यातिशय अलौकिक। जगदुद्धारार्थ अमानुषीक। अगम्य लीला दावुनी अनेक। विश्वावरी कृपा करिता॥
॥श्री स्वामी समर्थ॥
॥हर हर महादेव॥