Mahashivratri 2024: शिवरात्री अन् महाशिवरात्री यात फरक काय? पाहा, यंदाचे अद्भूत शुभ योग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 03:10 PM2024-02-29T15:10:36+5:302024-02-29T15:15:17+5:30

Mahashivratri 2024: प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मग महाशिवरात्रीचे वेगळेपण काय, ते जाणून घ्या...

mahashivratri 2024 know about auspicious yoga and the difference between shivratri and mahashivratri | Mahashivratri 2024: शिवरात्री अन् महाशिवरात्री यात फरक काय? पाहा, यंदाचे अद्भूत शुभ योग

Mahashivratri 2024: शिवरात्री अन् महाशिवरात्री यात फरक काय? पाहा, यंदाचे अद्भूत शुभ योग

Mahashivratri 2024: मराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. मराठी वर्षांत श्रावणानंतर शिवपूजनासाठी महाशिवरात्रीचा दिवस अनन्य साधारण महत्त्वाचा मानला गेला आहे.

सन २०२४ मध्ये ०८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत.  रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यांपैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. देशभरात शेकडो शिवमंदिरे असून, या सर्व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. जाणून घेऊया शिवरात्री आणि महाशिवरात्री यातील नेमका फरक...

शिवपुराणात महाशिवरात्रीसंदर्भात एक कथा आढळून येते

प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री पर्व साजरे केले जाते. वर्षातील सर्व शिवरात्रींमध्ये या महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून हा दिवस महाशिवरात्री नावाने प्रसिद्ध झाला, अशी कथा सांगितली जाते. शिवपुराणात महाशिवरात्रीसंदर्भात एक कथा आढळून येते. सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव आणि पालनहार श्रीविष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून जोरदार वाद झाला. दोघांचे भांडण सुरू असताना, त्यांच्यासमोर एक महाकाय अग्निस्तंभ प्रकटला. या अग्निस्तंभाचे तेज पाहून दोघे जण स्तिमित झाले.

हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला

प्रकटलेल्या अग्निस्तंभाचा शोध घेण्यासाठी विष्णू देवांनी वराह रुप, तर ब्रह्मदेवांनी हंसाचे रुप धारण केले. काही केल्या या दोघांचा त्याचा आदि-अंत समजेना. अखेर त्या अग्निस्तंभातून शिवशंकर प्रकट झाले. शिवतत्त्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जाऊ लागला. पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची कथा आढळून येते. यानुसार, समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले. या विषामुळे भूमीवरील जीव-जंतूंचा मृत्यू होऊ लागला. यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केले. यामुळे त्यांचा कंठ नीळा पडला. यावरून शंकराला नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली.

शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो

शंकराची अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीला सरसावले. त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून, शंकरावर पाण्याचा अभिषेक केला. यामुळे शंकराचे डोके शांत झाले. बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पानाचा सर्वाधिक वापर केला जातो.

सन २०२४ मधील अद्भूत शुभ योग

महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग जुळून येत असून, कुंभ राशीत सूर्य, शनि आणि बुध यांचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तसेच यंदाच्या महाशिवरात्रीला शुक्र प्रदोष आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्टिने यंदा २०२४ मधील महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष मानली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: mahashivratri 2024 know about auspicious yoga and the difference between shivratri and mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.