कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळणे भाग्याचे समजले जाते, अशातच १४४ वर्षांनी यंदा जुळून आलेला योग महाकुंभ (Mahakumbh 2025) म्हणून साजरा केला जात आहे, अशा योगात स्नान करण्याची संधी म्हणजे दुग्धशर्करा योगच! कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांचे निराकरण होते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक कुंभस्नानाची संधी मिळवतात. देशाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. एवढेच नाही तर कुंभस्नानदेखील करणार आहेत. मात्र शाही स्नानाची तारीख न निवडता त्यांनी ५ फेब्रुवारीचा मुहूर्त का निवडला ते जाणून घेऊ.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभ स्नान (Narendra Modi at Mahakumbh 2025) करण्यासाठी प्रयागराज येथे जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. त्याच दिवशी दिल्लीतही निवडणुका होणार आहेत. त्या झाल्यानंतरही मौनी अमावस्या आणि बसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोदींना शाही स्नान घेता आले असते. मात्र त्यांनी ५ फेब्रुवारीचाच दिवस निवडला. त्यामागे आहेत काही खास गोष्टी! कोणत्या ते जाणून घेऊ.
वास्तविक ५ फेब्रुवारी ही माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. धार्मिक दृष्टीकोनातून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. ज्यामध्ये तपश्चर्या, ध्यान आणि साधना करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच हा दिवस भीष्माष्टमीचा आहे. महाभारतातील कथेनुसार युद्धात जखमी झालेले भीष्माचार्य सूर्यदेवाच्या उत्तरायण आणि शुक्ल पक्षाची वाट पाहू लागले. जेव्हा माघ महिन्याची अष्टमी हा शुभ दिन आणि शुभ तिथी आली, तेव्हा उत्तरायणात भीष्मांनी भगवान श्रीकृष्णासमोर आपला देह ठेवला आणि प्राणोत्क्रमण केले, त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपल्या पितरांचे ध्यान करून त्यांच्या नावाने जल, तीळ, अक्षत आणि फळे, फुले अर्पण केल्यास पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो, असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच हा विधी करणाऱ्यांनादेखील मोक्ष प्राप्त होतो. तेव्हापासून माघ महिन्याची अष्टमी तिथी अत्यंत पुण्यपूर्ण आणि फलदायी मानली जाते.
हेच महत्त्व जाणून घेत मोदींनी कुंभस्नानासाठी ५ फेब्रुवारीची तिथी निवडली असावी असे म्हटले जात आहे.