पौराणिक कथांमध्ये शुक्राचार्य यांची ओळख असुरांचे गुरू म्हणून आहे. तरीदेखील त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, कारण ते संजीवनीविद्येचे जाणकार होते. महर्षी भृगू यांचे पुत्र असलेले शुक्राचार्य हे त्यांच्या ज्ञानामुळे, ज्योतिष विद्या, नक्षत्र आणि काव्य शास्त्रातील रुचीमुळे प्रसिद्ध होते. त्यांना 'एकाक्ष' म्हणजेच एका डोळ्याचा असेही म्हटले जाते. पण त्यांची ही अवस्था कशामुळे झाली? ते जन्मांध होते की त्यांचा एक डोळा जन्मानंतर निकामी झाला? जाणून घेऊ त्यामागची कथा.
शुक्राचार्य एकाक्ष होण्यामागे पौराणिक कथा :
कथा अशी आहे की, जेव्हा महान आणि दानशूर राजा बली एका भव्य यज्ञाचे आयोजन करत होते, तेव्हा भगवान विष्णूने वामन अवतारात (Vamana Avatar) लहान बटूचे रूप धारण करून राजा बलीकडे तीन पाऊल जमीन दान म्हणून मागितली.
राजा बली दान देण्यासाठी तयार झाला, पण दानवांचे गुरु शुक्राचार्यांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने जाणले की, हा बटू ब्राह्मण नसून, स्वतः भगवान विष्णू आहेत. राजा बलीने हे दान देऊ नये, कारण यामुळे त्याचे सर्व साम्राज्य संपुष्टात येईल, असा सल्ला शुक्राचार्यांनी बलीला दिला. मात्र, दानशूर राजा बलीने गुरूचा सल्ला मानला नाही.
राजा बली दान देण्यासाठी संकल्प करण्याची तयारी करत असताना, शुक्राचार्यांनी ते दान थांबवण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी सूक्ष्म रूप धारण केले आणि संकल्प करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमंडलूच्या नळीमध्ये/ झारीमध्ये जाऊन बसले, जेणेकरून संकल्प करण्यासाठी पाणी बाहेर पडू नये. पाणी न पडल्यास दान पूर्ण होऊ शकले नसते.
शुक्राचार्यांची ही कृती भगवान वामनाच्या लक्षात आली. तेव्हा भगवान वामनाने, जे हरी विष्णूंचेच अवतार होते, त्यांनी दर्भाचे एक लहान तण घेतले आणि ते कमंडलूच्या नळीत घातले. हे तण थेट शुक्राचार्यांच्या एका डोळ्यात घुसले, ज्यामुळे त्यांना असह्य वेदना झाल्या. वेदनेमुळे ते तत्काळ कमंडलूच्या नळीतून बाहेर आले. पाणी बाहेर पडले आणि राजा बलीने दान पूर्ण केले. वामनाने एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग आणि तिसऱ्या पावलासाठी जागा शिल्लक नसल्याने, बलीने आपले मस्तक अर्पण केले. वामनाने बलीला पाताळात स्थापित केले. या घटनेमुळे, शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि तेव्हापासून त्यांना 'एकाक्ष' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याबरोबरच मराठीत वाक्प्रचार तयार झाला, तो म्हणजे 'झारीतले शुक्राचार्य'- जे लोक चांगल्या कामात विघ्न घालतात त्यांना झारीतले शुक्राचार्य संबोधले जाते.
शुक्राचार्य नावामागील कथा
शुक्राचार्यांच्या नावामागेही एक वेगळी कथा आहे. एकदा देवा-असुरांमध्ये युद्ध झाले. जेव्हा भगवान शिवांना संजीवनी विद्येचा दुरुपयोग होत असल्याचे कळले, तेव्हा त्यांनी शुक्राचार्याला गिळून टाकले. शुक्राचार्य हजारो वर्षे महादेवाच्या पोटात राहिले आणि शेवटी बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने त्यांनी पोटातच शिवाची तपस्या सुरू केली.
शुक्राचार्यांची भक्ती पाहून शिवजी प्रसन्न झाले. त्यांनी शुक्राचार्याला वीर्य (शुक्र) रूपात बाहेर काढले. या घटनेमुळे त्यांचे नाव शुक्राचार्य पडले. अशा प्रकारे, ते महर्षी भृगूंचे पुत्र असले तरी, शिवपुत्र म्हणूनही ओळखले जातात.
Web Summary : Shukracharya, guru of Asuras, lost his eye when Vamana pierced it with Darbha grass. He's also considered Shiva's son, emerged as 'Shukra'.
Web Summary : असुरों के गुरु शुक्राचार्य ने वामन द्वारा दर्भ घास से आँख भेदे जाने पर अपनी आँख खो दी। उन्हें शिव का पुत्र भी माना जाता है, 'शुक्र' के रूप में उभरे।